अभिनय क्षेत्रातील ‘अजिंक्य’ कलाकार

    11-May-2024
Total Views |
Ajinkya Deo


ज्येष्ठ अभिनेते रमेश देव आणि अभिनेत्री सीमा देव यांनी ६०-७०च्या दशकात मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. कालांतराने त्यांचा मुलगा अजिंक्य देव हा देखील आई-व़डिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून अपघातानेच अभिनय क्षेत्राकडे वळला खरा; पण देव दाम्पत्याचा मुलगा म्हणून नाही, तर अभिनयाच्या जोरावर आणि स्वबळावर स्वत:ची ओळख अजिंक्य देव यांनी निर्माण केली. दै. ‘मुंबई तरुण भारत’शी अभिनेते अजिंक्य देव यांच्याशी साधलेला हा सुसंवाद...

व्हायचं होतं पायलट झालो हिरो...

अजिंक्य देव म्हणाले की, “मला मुळात चित्रपटसृष्टीत येण्याची अजिबात इच्छा नव्हती. मला पायलट व्हायचं होतं. पण, माझ्या वडिलांना रमेश देव यांना मला हिरो बनवायचेच होते. बरं, माझी इच्छा नसूनही माझ्यातही अभिनयाचा किडा होता. कारण, जेव्हा ‘शोले’ चित्रपट प्रदर्शित झाला होता, तेव्हा त्या चित्रपटाच्या संवादाची एक टेप बाजारात आली होती. तर, मी आणि माझा भाऊ आम्ही दोघे ती टेप लावून सर्व डायलॉग बोलत, ते अ‍ॅक्ट करायचो. माझा भाऊ त्यातली प्रत्येक भूमिका करायचा; पण मी फक्त अमिताभ बच्चन यांचीच भूमिका साकारायचो. असा माझा कल हळूहळू अभिनयाकडे वळायला लागला,” असे अभिनय क्षेत्राकडे कसे वळले, याविषयी बोलताना अजिंक्य यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, “चित्रपटसृष्टीतील माझे गुरु हे ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त होते. आमचे घरचे संबंध जरी असले, तरी त्यांनी माझ्यातील कला ओळखून नकळतपणे माझ्यातील कॅमेर्‍याची भीती घालवली आणि ‘अर्धांगी’ हा माझा पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला,” असा पहिल्यावहिल्या चित्रपटाचा त्यांनी अनुभव सांगितला.
 
जेव्हा अमिताभ बच्चन म्हणाले होते, ‘हमे भी घर चलाना पडता हैं...’

मराठी चित्रपटसृष्टीचा ५०-६० दशकाचा काळ गाजवणारे अभिनेते रमेश देव आणि सीमा देव यांनी अनेक सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांना बहाल केले. मराठीतील या जोडीने अनेक सदाहाबर गाणीदेखील देऊ केली. याशिवाय, त्यांनी अजिंक्य देव यांच्या रूपात एक उत्तम नटदेखील मनोरंजनसृष्टीला दिला. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘वासुदेव बळवंत फडके’ या चित्रपटात अजिंक्य देव यांनी फडके यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचा आणि अमिताभ बच्चन यांचा विशेष किस्सा सांगताना ते म्हणाले की, “ ‘वासुदेव बळवंत फडके’ या मराठी चित्रपटासाठी अभिनेते विक्रम गोखले यांनी ‘व्हॉईस ओव्हर’ दिला होता आणि हिंदीत ज्यावेळी आम्ही ‘शेमारु’ला तो विकला, तेव्हा त्यांनी सांगितलं की, तुम्ही अमिताभ बच्चन यांच्याकडून हिंदीत ‘व्हॉईस ओव्हर’ करून घ्या. वडील म्हणाले करून घेतो. मग, बाबा अमिताभ बच्चन यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं काय काम आहे. ते म्हणाले, करुयात. ज्या दिवशी रेकॉर्डिंग होतं, ते सकाळी ६ वाजता स्टुडिओत आले आणि म्हणाले की, “मी तासाभरात काम संपवून निघेन. कारण, मला आणखी काम आहे.”

सर्व नीट रेकॉर्ड झालं. त्यानंतर बच्चन साहेब आम्हाला म्हणाले की, “रमेशजी, मला वाटलं नव्हतं की, मराठी चित्रपट असेही बनतात.” मला हा चित्रपट पाहायचा आहे, असं म्हणून त्यांना तासाभरात निघायचं होतं. त्या बच्चन साहेबांनी तीन तास बसून ‘वासुदेव बळवंत फडके’ हा चित्रपट पूर्ण पाहिला आणि आमचं कौतुकदेखील केलं,” असा अमिताभ बच्चन यांचा त्यांच्या कामाविषयीच्या आस्थेचा किस्सा अजिंक्य देव यांनी सांगितला. पुढे त्यांनी याच चित्रपटाचा किस्सा सांगताना म्हटले की, “काही दिवसांनी मी बाबांसोबत अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर त्यांचे आभार मानण्यासाठी गेलो. त्यावेळी गमतीत बाबा बच्चन साहेबांना म्हणाले की, “आता अजून किती कामं करणार तुम्ही बच्चन साहेब, थांबा आता.” यावर अमिताभ बच्चन यांनी माझ्या बाबांकडे पाहिले आणि ते म्हणाले की, “रमेशजी, मुझे भी घर चलाना पडता हैं.” ही वाक्ये ज्यावेळी मी अमिताभ बच्चन यांच्या तोंडून ऐकली, त्यावेळी माझ्या डोक्यात हा विचार आला की, जर हा माणूस इतके यश मिळवल्यानंतर असं म्हणत असेल, तर आपणही सातत्याने कामं केलेच पाहिजे.”

...तर २०० आठवडे ‘माहेरची साडी’ चित्रपट पुढे गेला असता!

मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील अजरामर चित्रपट म्हणजे ‘माहेरची साडी.’ विजय कोंडके यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने महाराष्ट्रातील प्रत्येक सासू-सुनेच्या डोळ्यांत पाणी आणलं. अजिंक्य देव यांनी ‘नेसली माहेरची साडी’ या गाण्याची विशेष आठवण सांगताना म्हटले, “पुण्यात ‘नेसली माहेरची साडी’ या गाण्याचे चित्रीकरण सुरू होते. या गाण्याचे सहा अंतरे असल्यामुळे एकूण सात मिनिटांचं गाणं होतं. माझं इतर चित्रपटांचंही काम सुरू होतं. त्यामुळे मला लवकरात लवकर मुंबई गाठायची होती. आम्हाला सांगण्यात आलं की, तीन दिवस या गाण्याच्या चित्रीकरणात जातील. मग काय आम्ही दिग्दर्शकांना बाजूला घेऊन समजावलं की, तीन अंतरे करुयात. दीड दिवसांत तीन अंतरे शूट करून आम्ही सगळे आमच्या कामांसाठी गेलो. ज्यावेळी ‘माहेरची साडी’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्या गाण्याला प्रेक्षकांचा जो उदंड प्रतिसाद लाभला, तो काही औरच होता. आजही दिग्दर्शक विजय कोंडके आम्हाला भेटले तर म्हणतात की, “जर का सात अंतरे पूर्ण केले असते, तर आणखी २०० आठवडे हा चित्रपट पुढे गेला असता.”
माझ्या रूपात त्यांना रमेश देव दिसले!
 
आजवर अजिंक्य देव यांनी अनेक चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारल्या. प्रेक्षकांनी त्यांच्या कलेची वाहवादेखील केली. पण, कायम स्मरणात राहणारी एक दाद अजिंक्य देव यांनी सांगितली. “दिग्दर्शक मुकेश भट्ट आई गेल्यानंतर आम्हाला भेटायला घरी आले होते. त्यावेळी मी आवरत होतो. थोड्या वेळाने मी बाहेर हॉलमध्ये आलो आणि मुकेश भट्ट उभे राहिले. कुणालाच काही समजलं नाही. मी त्यांना हात मिळवला आणि बोललो नमस्कार मी अजिंक्य देव. ते शांतपणे खाली बसले आणि म्हणाले, “मला एका क्षणासाठी रमेश देवच आले असं वाटलं.” त्यांची ती प्रतिक्रिया ऐकून मी पण थक्क झालो. त्यामुळे आजवर अनेक प्रतिक्रिया लोकांकडून मिळाल्या, पण मला पाहून जर का लोकांना रमेश देव यांचा भास होत असेल, तर त्याहून मोठी दाद माझ्यासाठी नक्कीच नाही आहे,” असे अजिंक्य देव यांनी म्हटले.