मला उमजलेले आद्य शंकराचार्य...

    11-May-2024
Total Views |
Adi Shankaracharya
आज दि. 12 मे रोजी अद्वैत वेदान्ताच्या तत्वज्ञानाचे प्रवर्तक आद्य शंकराचार्य यांची जयंती. त्यानिमित्त त्यांचा संक्षिप्त परिचय करून देणारा लेख...

संस्कृतच्या विद्यार्थ्यांच्या जीवनातला सर्वात आनंददायी तास कोणता असं विचारलं तर मला वाटतं, बरेच जण ‘ब्रह्मसूत्रा’चा असं सांगतील. ‘ब्रह्मसूत्र’ हे ‘ब्रह्मसूत्रशांकरभाष्य’ या शब्दाचं संक्षिप्त रूप म्हणून आम्ही वापरत असू. खरं म्हटलं तर 18-20 वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांना मानवी भावना शब्दांमधून जीवंत करणारा कालिदास अधिक प्रिय व्हायला हवा. नाटकांमध्ये काव्यात्म दृश्य रेखाटणारा भास भावायला हवा. परंतु, या कवी आणि नाटककारांवर मात करत असत ते आद्य शंकराचार्य. वेदान्त शिकण्याचं वय नसतानाही त्यांचं परिणामकारक भाषेतलं तर्काच्या कसोटीवर घासलेलं आणि गणिती बुद्धीला पेलणारं तत्त्वज्ञान मोहित करून टाकत असे. ‘विषयविषयिण्योः तमःप्रकाशवत् विरुद्धस्वभावयोः’ हे शब्दच पाहा ना किती आरस्पानी. त्यात शिकवणारे जीव ओतून शिकवत असतील, तर दुधात साखर. विषय म्हणजे सभोवतालचं जग जे आपण प्रत्यक्ष पाहतो, तर कधी अनुमानाने समजून घेतो. पण, हे जग पाहतो कोण? आत्मा, म्हणजे ‘विषयिन्.’ पण, हे जग आणि तो आत्मा यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. जसा अंधार आणि प्रकाश एकमेकांहून एकदम विरुद्ध त्याचप्रमाणे विषयापासून म्हणजे जगाहून ‘विषयिन्’ म्हणजे आत्मा वेगळा. विषय जड तर आत्मा चेतन. कठीण आणि रुक्ष विषय नाण्यासारख्या खणखणीत भाषेत मांडावा शंकराचार्यांनी.

 
‘आचार्य’ ही पदवी प्राचीन काळी मिळवणं सोपं नव्हतं. प्रस्थानत्रयीवर म्हणजे मोक्षमार्गाची दारं उघडून देणार्‍या तीन प्रकारच्या ग्रंथांवर स्वतंत्र मत मांडणारी टीका लिहिणार्‍यालाच ‘आचार्य’ ही पदवी मिळत असे. बादरायणांनी रचलेली ब्रह्मसूत्रे, भगवद्गीता आणि उपनिषदे यांना ‘प्रस्थानत्रयी’ म्हणत असत. शंकराचार्यांनी या तीनही प्रकारच्या ग्रंथांवर टीका लिहून अद्वैताची पताका संपूर्ण भारतात फडकवली.केरळ प्रांतामध्ये एका ब्राह्मण कुटुंबात आठव्या शतकात शंकराचार्यांचा जन्म झाला. कालडी हे त्यांचं जन्मगाव. सुरुवातीला वडील शिवगुरु आणि नंतर गोविंद गुरूंकडे (गौडपादाचार्यांचे शिष्य) त्यांनी शिक्षण घेतलं. प्रत्येक व्यक्तींमधलं चैतन्य आणि जगाचं परमसत्य एकच आहे, हे तत्त्व उपनिषदांचा अभ्यास करताना त्यांच्या लक्षात आलं. ते वेगळं नाही, त्यांच्यामध्ये अद्वैत आहे. हे त्यांचं मुख्य तत्त्वज्ञान. त्यांनी हे चार शिष्यांना शिकवलं, भारताच्या चार दिशांना चार मठांची स्थापना केली आणि हे चारही मठ आपल्या शिष्यांच्या हातात सुपूर्द करून इहलोकीची यात्रा अवघ्या 36व्या वर्षी संपवली.

आसेतुहिमाचल अद्वैत वेदान्ताची पताका फडकवणार्‍या आदिशंकराचार्यांचं तत्त्वज्ञान त्यांच्या ग्रंथांमध्ये उपलब्ध आहे. परंतु, त्यांचं जीवनचरित्र नेमकेपणानं सांगणारे प्रबळ पुरावे उपलब्ध नाहीत. ‘शंकरदिग्विजय’ किंवा ‘शंकरविजय’ या एकाच नावाच्या चार ग्रंथांची नोंद आहे. त्यापैकी एक अनुपलब्ध आहे. उरलेल्या तीनपैकी प्रमाणभूत मानला गेलेला ग्रंथ म्हणजे माधवाचार्य किंवा विद्यारण्यस्वामी यांनी लिहिलेलं ‘शंकरविजय’ किंवा ‘शंकरदिग्विजय’ हे महाकाव्य. सर्वतोमुखी शंकराचार्यांचं जे चरित्र सांगितलं जातं, त्याचा नकळत बनलेला मुख्य आधार म्हणजे हे काव्य.माधवाचार्य हे वेदभाष्यकार सायणाचार्यांचे थोरले बंधू. हरिहर आणि बुक्क यांना विजयनगरच्या उभारणीमध्ये मदत करणारे हे दोघे बंधू राजकारणाबरोबरच ग्रंथनिर्मितीतही सहभागी होते. 14व्या शतकातला भारतीय समाज परकीय सत्तेमुळे आणि धर्मरूढींमुळे ग्रस्त झाला होता. त्या भारतीय मनाला उभारी देण्यासाठी एकतेचा मार्ग दाखवणार्‍या औपनिषदिक तत्त्वज्ञानाची गरज होती. हिंदू धर्माचं पुनरुज्जीवन करतांना शंकराचार्यांना विसरून कसं चालेल? जरी आजचा हिंदू धर्म पुराणांमधून विकसित झालेला असला तरी आद्य शंकराचार्यांनी हिंदू धर्माचं पुनरुज्जीवन केलं, त्याला मूर्तिपूजेची विशेषतः पंचायतन पूजेची चौकट घालून दिली, असे मत सर्व लोकांमध्ये प्रसृत आहे. चौदाव्या शतकातल्या मरगळलेल्या हिंदू मनाला तजेलदार आणि आशावादी बनवण्यासाठी माधवाचार्यांनी हे काव्य लिहिलं असावं.
 
अद्वैत वेदान्त मताचा पुरस्कार शंकराचार्यांनी केला. त्यासाठी विविध ठिकाणी जाऊन वादसभा जिंकल्या. इतर मते खोडून काढून अद्वैत मतांची स्थापना केली. त्यापैकी एक महत्त्वाची वादसभा झाली ती मंडनमिश्र नावाच्या मीमांसकांबरोबर. या वादाची कथा माधवीय शंकरदिग्विजयामधल्या आठव्या सर्गात येते.मंडनमिश्र माहिष्मतीनगरीमध्ये राहत होते. माहिष्मती म्हणजे सध्याचे महेश्वर. शंकराचार्य त्यांचं घर शोधत असताना पाणी भरायला जाणार्‍या मंडनमिश्रांच्या दासीशी त्यांची गाठ पडली. मंडनमिश्रांचं घर कुठे, असा प्रश्न दासीला विचारल्यावर तिनं त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. ‘ज्या घरातल्या नवं नवं नवं श मैना स्वतःप्रमाण, परतःप्रमाण असे शब्द उच्चारतात ते मंडनमिश्रांचं घर’. तो श्लोक आहे-


स्वतःप्रमाणं परतःप्रमाणं कीराङ्गना यत्र गिरं गिरन्ति!
द्वारस्थनीडान्तरसंनिरुद्धा जानीहि तन्मण्डनपण्डितौकः!!
...शंकरदिग्विजय, विद्यारण्यस्वामी
 
 
जे शब्द सतत कानावर पडतात, तेच शब्द लहान मुलं आणि पिंजर्‍यातले पोपट उच्चारतात. मंडनमिश्रांच्या घरात सतत वादसभा होत. शिष्यांना मीमांसामत शिकवलं जाई.‘प्रामाण्यवाद’ हा भारतीय तत्त्वज्ञानाचा महत्त्वाचा भाग. ज्ञान सिद्ध करायला इतर साधनांची आवश्यकता आहे का? हा यातला मुख्य प्रश्न. ज्ञान किंवा वेद सिद्ध करण्यासाठी इतर कोणत्याही साधनांची आवश्यकता नाही, या मताला ‘स्वतः प्रामाण्य’ म्हणतात तर ज्ञान सिद्ध करण्यासाठी इतर साधनांची आवश्यकता आहे या मताला ‘परतः प्रामाण्य’ म्हणतात. मीमांसा स्वतः प्रामाण्यवादी होते. त्यामुळे मंडनमिश्रांच्या घरात शिष्यांना ‘स्वतःप्रमाण’ ही संकल्पना शिकवली जात असे. तसंच ‘परतः प्रामाण्यवादी’ नैयायिकांचं मतही खोडलं जात असे. त्यामुळे हे शब्द सतत कानावर पडल्यामुळे ‘पिंजर्‍यातले पोपट’ हे शब्द उच्चारतात. ‘इतरांच्या घरातले पोपट’ असे शब्द उच्चारत नाहीत. त्यामुळे मंडनमिश्रांचं घर ओळखणं तुम्हाला सोपं जाईल, असं ती दासी शंकराचार्यांना म्हणाली. अशा प्रकारच्या अनेक मनोरंजक कथा शंकरदिग्विजयात सांगितल्या आहेत.

‘प्रस्थानत्रयी’वरची त्यांची भाष्ये प्रसिद्ध आहेतच; पण शंकराचार्यांनी जनमानसात अधिक स्थान मिळवलं ते त्यांच्या स्तोत्रांमुळे. ती स्तोत्रे त्यांनीच लिहिलीत की, दुसर्‍या कोणी, हा अनिर्णित वाद आहे. काहीही असो, आपल्यासारखी सामान्य माणसं मात्र ही स्तोत्रं शंकराचार्यांनीच लिहिली असं मानतात. सुमारे 35-80 स्तोत्रे आद्य शंकराचार्यांनी रचली असं जनमत आहे. या स्तोत्रांमध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेली काही स्तोत्रे आहेत. गणपतीचं ‘गणेशपञ्चरत्नस्तोत्र’, ‘भज गोविन्दम्’, ‘सौंदर्यलहरी’, ‘नर्मदाष्टकम्’, ‘पाण्डुरङ्गाष्टकम्’ इत्यादी अनेक स्तोत्रे प्रसिद्ध आहेत. यापैकीच एक ‘देव्यपराधक्षमापन’ स्तोत्र आहे.देवीच्या बाबतीत घडलेल्या अपराधाची क्षमा मागणारं हे स्तोत्र आहे. सामान्य अज्ञानी माणसाची व्यथा मांडणारं. ‘क्षमापन’ या संस्कृत समासात दोन शब्द आहेत, ‘क्षमा’ आणि ‘आपन.’ ‘क्षमा’ शब्दाचा अर्थ मराठीनं स्वीकारलेल्या पर्शियन शब्दात ‘माफी’ तर ‘आपन’ शब्दाचा अर्थ मिळवणारे, क्षमा मिळवणारे, ‘देवीबाबत केलेल्या अपराधांबाबत क्षमा याचना करणारं स्तोत्र’ असा या शीर्षकाचा अर्थ होईल.

देवतेच्या बाबतीत मनुष्याकडून अपराध घडणे आणि त्याबद्दल क्षमा याचना करणे, हे तत्त्व अगदी वैदिक वाङ्मयातही दिसते. वरुण देवतेला वैदिक प्रजाजन घाबरून असत. त्याचा कोप होऊ नये म्हणून काळजी घेत. एखाद्याला दृश्य कारणाशिवाय काही अघटित घटनांना सामोरं जावं लागलं, तर आपल्या हातून कोणतातरी अपराध घडला आहे आणि म्हणून कोणत्यातरी देवाचा विशेषतः वरुणाचा कोप झाला आहे, असे वाटून वैदिक कवी त्याची करुणा भाकत असत. नंतरच्या काळातही देवदेवतांचा कोप शमवण्यासाठी काही स्तोत्रे रचली गेली. ‘शिवमहिम्नस्तव’ रचण्यामागची हीच प्रेरणा होती. अगदी मराठीतही दत्तगुरूंची आरती झाल्यावर ‘अपराध क्षम आता केला पाहिजे’ अशी हट्टवजा विनंती केली जाते.आद्य शंकराचार्यांनी ‘देव्यपराधक्षमापन’ स्तोत्र आणि ‘शिवापराधक्षमापन’ स्तोत्र अशी क्षमा याचना करणारी दोन स्तोत्रे रचली. आज अनायासे जागतिक मातृदिन आहे. म्हणून जगन्मातेच्या स्तोत्राबद्दल विचार करू.

‘देव्यपराधक्षमापन’ स्तोत्र हे देवीकडे क्षमा याचना करणारे स्तोत्र आहे. मातेच्या उदरातून मनुष्यजन्म होतो, हे सत्य प्राचीन मानवाला समजले होते. या घटनेकडे तो आश्चर्याने, कुतूहलाने आणि कृतार्थतेनेही पाहत असे. यातूनच त्याने ‘देवी’ ही संकल्पना निर्माण केली. घट किंवा कुंभ हे मातेच्या उदराचं प्रतीक मानू लागला. देवी हा मातृतत्त्वाचा आविष्कार आहे. या देवीबद्दलची कृतज्ञता आपल्या अनेक सणांमध्ये व्यक्त होत असते. गौरी, नवरात्री, लक्ष्मीपूजन असे अनेक सण आणि उत्सव या मातृतत्त्वाच्या अनेक आविष्कारांचे पूजन करत असतात.परंतु, आपण या मातेला गृहीत धरून चालतो. कळत नकळत आपल्याकडून अनेक चुका होत असतात. कधी पूजाविधी न समजल्यामुळे झालेल्या असतात, कधी अज्ञानामुळे, कधी आळसामुळे चुका होतात. असे सर्व अपराध तिने माफ करून टाकावे अशी विनंती या 12 श्लोकांच्या स्तोत्रात केली आहे. ‘कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति’ ( मुलगा वाईट निपजेल, पण वाईट आई कधीही नसते) हे प्रसिद्ध पालुपद तीन श्लोकांमध्ये आले आहे. एक स्वतंत्र तत्त्वज्ञानशाखा स्थापन करणार्‍या, आपल्या धर्मातल्या उणिवा दूर करून त्या धर्माकडे चिकित्सक बुद्धीने पाहण्याची दृष्टी देणार्‍या, पण याचबरोबर सामान्य माणसाच्या भावनांचा आदर करून त्याला भावणारी अत्यंत गेय स्तोत्रे रचणार्‍या आद्य शंकराचार्यांना त्यांच्या जयंती दिवशी सादर आणि सविनय प्रणाम.

डॉ. निर्मला कुलकर्णी
(लेखिका संस्कृत प्रगत अध्ययन केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निवृत्त प्राध्यापिका आहेत.)