काँग्रेसच्या तुष्टीकरणाविरोधात भाजपची कर्नाटकमध्ये लढाई...

    24-Apr-2024
Total Views |
congress karnataka
 
‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणातून काँग्रेसच्याच नगरसेवकाच्या कन्येचे हत्या प्रकरण हुबळीमध्ये घडले. केवळ कर्नाटकच नाही तर अवघ्या देशांत हळहळ व्यक्त झाली. या प्रकरणाला काही दिवसही उलटत नाही तोवर आरक्षणाचा लाभ देण्यासाठी कर्नाटक सरकारने मुस्लिमांना मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गात समाविष्ट करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे यंदाही मुसलमान मतपेढीचे लांगूलचालन आणि तुष्टीकरणाचा डाव काँग्रेसने खेळला आहे. त्यानिमित्ताने कर्नाटकमधील राजकीय परिस्थितीचे विश्लेषण करणारा हा लेख...
 
आयटी हब’ अशी ओळख असलेल्या कर्नाटकमधील निवडणुका दोन टप्प्यांत होत असून, येथे उद्या, शुक्रवार, दि. २६ एप्रिल आणि मंगळवार, दि. ७ मे रोजी मतदान होत आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत येथील मुस्लीम मतांच्या ध्रुवीकरणाचा भाजपला ६५ जागांवर फटका बसला आणि भाजपच्या हातून कर्नाटकची सत्ता गेली. मुस्लिमांची एकगठ्ठा मते काँग्रेसला मिळाल्याने, भाजपला या ६५ जागांवर निसटता पराभव पत्करावा लागला होता. म्हणूनच, कर्नाटकात काँग्रेसने पुन्हा एकदा मुस्लिमांचा अनुनय करण्याचे धोरण अवलंबिलेले दिसते.
 
सर्वेक्षणातून काँग्रेसच्या मतात वाढ होईल, अशी एक शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, भाजपने जेडीएससोबत केलेली युती भाजपचा जनाधार कमी होणार नाही, अशी खात्री देणारे ठरु शकते. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने कर्नाटकमध्ये २५ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेस आणि जेडीएसला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. एका जागेवर भाजप समर्थित अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. म्हणूनच २०२४ मध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा रोखण्यासाठी भाजपने डावपेच आखले असून, येथे भाजप किती जागांवर विजयी होते, याकडे विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शाह, तसेच माजी मुख्यमंत्री बीएस येडिपुरप्पा मेहनत घेताना दिसून येतात. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे मूळचे कर्नाटकचे. त्यामुळे आपल्या गृहराज्यात त्यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे.
 
लोकसभेच्या दुसर्‍या टप्प्यात कर्नाटकमधील १४ जागांसाठी शुक्रवार, दि. २६ एप्रिल रोजी मतदान होईल. यात उडुपी, चिकमंगळूर, हसन, दक्षिण कन्नड, चित्रदुर्ग, तुमकूर, मंड्या, म्हैसूर, चामराजनगर, बंगळुरु ग्रामीण, बंगळुरु उत्तर, बंगळुरु मध्य, बंगळुरु दक्षिण, चिक्कबल्लापूर आणि कोलार या मतदारसंघात मतदान होणार आहे. तिसर्‍या टप्प्यात उर्वरित १४ जागांसाठी मंगळवार, दि. ७ मे रोजी मतदान होईल. यामध्ये चिक्कोडी, बेळगाव, बागलकोट, विजापूर, गुलबर्गा, रायचूर, बिदर, कोप्पल, बेल्लारी, हावेरी, धारवाड, उत्तर कन्नड, दावणगेरे आणि शिमोगा या मतदारसंघांचा समावेश आहे. दि. ४ जून रोजी मतमोजणी होईल. कर्नाटकातील पाच जागा अनुसूचित जातींसाठी आणि दोन जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. राज्यातील ५८ हजार, ८३४ मतदान केंद्रांवर ५३.७ दशलक्ष मतदार आपला हक्क बजावतील. १८-१९ वयोगटातील दहा लाखांहून अधिक नवमतदारांचा यात समावेश आहे. कर्नाटकची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार ६.११ कोटी इतकी आहे.
 
अशा या राज्यात भाजप २५ जागा लढवत असून, जेडीएसने तीन जागांवर उमेदवार दिले आहेत. काँग्रेसी ‘इंडी’ आघाडी २८ जागा लढवत आहे. यादगीर जिल्ह्यात असलेल्या सुरपूर (शोरापूर) मतदारसंघाची कर्नाटक विधानसभेची पोटनिवडणूकदेखील सार्वत्रिक निवडणुकीसोबतच होणार आहे. फेब्रुवारीत काँग्रेसचे आमदार राजा व्यंकटप्पा नाईक यांचे निधन झाल्याने, ही जागा रिक्त झाली होती. काँग्रेसने त्यांचा मुलगा राजा वेणुगोपाल नाईक यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपने नरसिंह नायक यांना उमेदवारी दिली आहे. मंगळवार, दि. ७ मे रोजी पोटनिवडणूक होणार आहे. सप्टेंबर महिन्यात, जेडीएसबरोबर युती करण्याचा निर्णय भाजपने घेतला. जेडीएसने २०१९ मध्ये काँग्रेससोबत आघाडी केली होती. गेल्यावेळी लोकसभा निवडणुका दि. १८ एप्रिल आणि दि. २३ एप्रिल अशा दोन टप्प्यात पार पडल्या होत्या. मंड्यामध्ये सर्वाधिक ८०.२४ टक्के आणि बंगळुरु दक्षिणमध्ये सर्वांत कमी ५३.४८ टक्के मतदान झाले होते. सुशासनासाठी भाजपबरोबर युती करण्याचा निर्णय घेतला, असा दावा माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी केला आहे. कर्नाटकातील जनतेच्या हिताचा विचार करून, हा निर्णय घेतला, असे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनीही पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्याशिवाय अन्य कोणताही समर्थ पर्याय देशात नसल्याचे माध्यमांनी सांगितले होते. जेडीएस हसन, मंड्या आणि कोलार येथून निवडणूक लढवत आहे.
 
काँग्रेसने ‘मोफत’ या संकल्पनेवरच याही निवडणुकीत भर दिला असून, कर्नाटकी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी “आम्ही सत्तेवर आलो तर देशाची संपत्ती मुस्लिमांमध्ये वाटू,” असे वादग्रस्त विधान केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी राजस्थानमध्ये बोलताना, काँग्रेसी मानसिकतेवर प्रहार करत, “शहरी नक्षलवादी विचारसरणी तुमच्या मंगळसूत्रालाही हात घालेल,” असे विधान करत, काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणावर प्रहार केला. काँग्रेसी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही २००६ मध्ये, देशातील संसाधनांवर पहिला हक्क मुस्लिमांचा असेल, असे म्हटले होते. काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात मुस्लिमांसाठी भरघोस सवलती जाहीर केल्या आहेत. काँग्रेसचा जाहीरनामा अथपासून इतिपर्यंत केवळ आणि केवळ मुस्लीम समाजासाठी भरभरून योजना देणारा आहे. एकीकडे देश ‘विकसित भारता’कडे वाटचाल करत असताना, काँग्रेसने जातीय आधारावर जनगणना करण्याचे आश्वासन दिले आहे. जातपात विरहित समाजाकडे प्रगल्भतेने वाटचाल होत असताना, पुन्हा एकदा समाजाला जातींच्या आधारावर विभागण्याचेच हे षड्यंत्र आहे.
 
२०१९ मध्ये भाजपने २८ पैकी २५ जागांवर ५१.२ टक्के मतांसह विजय मिळवला होता. कर्नाटकातील भाजपची ही आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. २०१४ आणि २००९च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने अनुक्रमे १७ आणि १९ जागा जिंकल्या होत्या. २००४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला १८ जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला केवळ आठ जागांवर विजय मिळवता आला होता, तर जेडीएसला दोन जागांवर विजय मिळाला होता.
 
मंड्यामध्ये एचडी कुमारस्वामी हे काँग्रेसचे वेंकटरामणे गौडा यांच्याविरोधात लढत आहेत, तर बंगळुरु दक्षिणमध्ये भाजपचे युवा नेते तेजस्वी सूर्या पुन्हा निवडणूक लढवत आहेत. म्हैसूरमध्ये राजघराण्यातील यदुवीर वाडियार भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. डीके शिवकुमार यांचे बंधू डीके सुरेश हे काँग्रेसच्या तिकिटावर बंगळुरु ग्रामीणमधून आणखी एका टर्मसाठी निवडणूक लढवत आहेत. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढण्याची संधी भाजपला यानिमित्ताने मिळाली आहे. म्हणूनच, जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे. कर्नाटकातील विजयाचे एक वेगळे महत्त्व आहे. ‘दक्षिणेचे द्वार’ म्हणून कर्नाटककडे पाहिले जाते. गेल्यावेळी भाजपने जी चमकदार कामगिरी केली होती, त्याची पुनरावृत्ती करण्यावर भाजपचा भर असेल, तर काँग्रेसी अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात खर्गे यांना प्रभावी कामगिरी करून दाखवावी लागेल. कर्नाटक राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर, राजधानी बंगळुरुत गडद झालेले जलसंकट हे काँग्रेसी नाकर्तेपणाच्या धोरणाचा परिणामाचे उदाहरण आहे. त्याचा फटका बंगळुरुच्या नागरिकांना बसतो आहे. पाणीटंचाईमुळे विस्कळीत झालेले तेथील जनजीवन काँग्रेसला किती जागांवर नुकसान करणारे ठरते, याचे उत्तर दि. ४ जून रोजीच मिळेल.
 
तसेच हुबळी येथे काँग्रेसी नेत्याच्या मुलीची फैयाजने ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणातून केलेल्या हत्येचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. कर्नाटकात काँग्रेसी सरकार असल्यानेच, बंगळुरु येथील रामेश्वरम कॅफेतील बॉम्बस्फोट तसेच ‘लव्ह जिहाद’च्या घटना राज्यात घडू लागल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे कर्नाटकमधील काँग्रेसच्या तुष्टीकरणाला तेथील मतदार पुन्हा भुलतात की भाजपचे कमळ फुलते, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

-संजीव ओक