मॉस्को : (Russia-Ukraine War) रशिया-युक्रेन युद्धादरम्यान रविवार, दि. १ जून रोजी युक्रेनने 'ऑपरेशन स्पायडरवेब' अंतर्गत रशियातील विविध लष्करी हवाई तळांवर एक अत्यंत सुनियोजित आणि यशस्वी ड्रोन हल्ला केला. हा युक्रेनने केलेला आजवरचा सर्वांत मोठा हल्ला असल्याचे बोलले जात आहे. यावेळी युक्रेनने ‘ट्रोजन हॉर्स’ रणनीती वापरून ट्रक आणि ड्रोनने रशियावर हवाई हल्ला केला.
ग्रीक पौराणिक कथेतून हल्ल्याची प्रेरणा
ट्रोजन हॉर्सच्या प्रसिद्ध ग्रीक कथेने प्रेरित होऊन, युक्रेनने रशियाच्या आत ड्रोन पाठवले. युक्रेनला माहित होते की रशियाची हवाई संरक्षण प्रणाली सीमेजवळ खूप मजबूत आहे, म्हणून थेट रशियन हवाई तळावर ड्रोन उडवणे कठीण होते. या कारणास्तव, युक्रेनच्या गुप्तचर संस्थेने रशियाच्या पाच वेगवेगळ्या भागात अनेक नागरी ट्रक रस्त्याने पाठवले. या ट्रकच्या बाहेरील छत (झाकण) फसव्या बनवण्यात आल्या. ट्रकच्या आत ड्रोन लपवण्यात आले होते, ज्यामध्ये बॉम्ब आणि स्फोटक पदार्थ देखील होते. सीमा पोलिसांना फसवून युक्रेनने हे ट्रक रशियाच्या चार मोठ्या आणि महत्त्वाच्या हवाई तळांजवळ उभे केले. त्यानंतर रिमोट कंट्रोलने दूरवरून ट्रकच्या छत उघडून ड्रोन सोडण्यात आले आणि ड्रोनने रशियन हवाई तळावर उभ्या असलेल्या बॉम्बर्सवर हल्ला केला. या ड्रोन हल्ल्यात रशियन अण्वस्त्रे वाहून नेणारी विमाने जाळली गेली. रशियाच्या पाच वेगवेगळ्या हवाई तळांवर असेच हल्ले करण्यात आले. या हल्ल्यामुळे रशियाची मोठी हानी झाली असून ४० हून अधिक स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स नष्ट झाले आहेत.
ट्रोजन हॉर्स म्हणजे काय?
ही रणनीती प्राचीन ग्रीक पौराणिक कथांतील ‘ट्रोजन हॉर्स’ (Trojan horse)वर आधारित होती. ग्रीक सैन्याने लाकडी घोड्याच्या आत लपून ट्रॉय शहरात प्रवेश केला होता, त्याचप्रमाणे युक्रेनने ड्रोन नागरी ट्रकमध्ये लपवून रशियामध्ये सखोल घुसखोरी केली. हे ड्रोन ट्रकच्या छताखाली बनवलेल्या खोट्या लाकडी केबिनमध्ये लपवले गेले होते. हे ट्रक रशियाच्या मुर्मन्स्क, इर्कुत्स्क, इवानोवो, रियाझान आणि अमूर या पाच प्रमुख हवाई तळांजवळ पार्क करण्यात आले होते.युक्रेनची गुप्तचर संस्था एसबीयू गेल्या दीड वर्षांपासून या मोहिमेची तयारी करत होती. ट्रक रशियामध्ये पाठवण्यासाठी स्थानिक नागरिकांचा वापर करण्यात आला. ट्रक चालकांना याबाबत काहीच माहिती नव्हती. ट्रक एकदा निर्धारित स्थळी पोहोचले की, त्यांचे छप्पर रिमोटने उघडले गेले आणि ड्रोन बाहेर येऊन थेट तळांवर तैनात असलेल्या विमानांवर हल्ला करू लागले.
या कारवाईत रशियाची अण्वस्त्रवाहक Tu-95 आणि Tu-22M3 बॉम्बर्स आणि A-50 हवाई चेतावणी विमानांचेही नुकसान झाले. ही विमाने सध्या उत्पादनात नसल्याने त्यांची पुनर्निर्मिती शक्य नाहीSBU चा अंदाज आहे की या हल्ल्यामुळे रशियाचे $2 अब्ज पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. युक्रेनने केवळ हवाई तळांवरच नव्हे, तर रशियन रेल्वे पुलांवरही हल्ला केला. कुर्स्क आणि ब्रायन्स्क भागात बॉम्बहल्ल्यांमुळे रेल्वे मार्ग उद्ध्वस्त झाले व दोन मोठे अपघात घडले. शिवाय, एका ट्रकमध्ये स्फोटक ठेवण्यात आले होते, जे ड्रोन उडून गेल्यानंतर उडवण्यात आले. यामुळे तपासासाठी आलेले रशियन सैनिक मोठ्या स्फोटाचा बळी ठरले.
या हल्ल्याने भारतासाठीही एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. कारण नेपाळ, भूतान, बांगलादेश यांसारख्या देशांतून अनेक नागरी ट्रक दररोज भारतात प्रवेश करतात. सीमांवर या ट्रकांची तपासणी होत असली तरी युक्रेनप्रमाणेच अशा वाहनांतून गुप्त शस्त्रास्त्रांची तस्करी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. युक्रेनच्या या मोहिमेने आधुनिक युद्धपद्धतीची नवी दिशा दाखवली आहे. तसेच, भारतासह इतर देशांसाठी अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीनेही ही कारवाई एक गंभीर इशारा ठरू शकते.