संगीत ते समाधी भाग ३३

    17-Apr-2024
Total Views |
dhyan
 
आर्यजन भोगवस्तूच्या पलीकडे जाऊन म्हणजे एका अर्थाने भोगघटनेला चिरीत जाऊन त्यापलीकडील सत्य जाणण्याचा सर्वदा प्रयत्न करतात. म्हणून ते आर्य. कधीच थांबत नाहीत आणि कधीच नष्ट होत नाही. सतत पुढे जाणारा, भोगातून अमर आनंद प्राप्त करणारा तो ‘आर्य असतो मा सद्मय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय’ म्हणून जो सामर्थ्यवान असेल तोच भोग भोगू शकेल. शक्तिहीनांना काहीच प्राप्त होऊ शकत नाही. ’नायमात्मा बलहीनेन लभ्यः’ पदार्थ वा वस्तूतील शब्द, स्पर्श, प्रकाश, रस आणि गंध असले पंचगुणात्मक भ्रमभोगातच जो स्वतःला धन्य मानील तो बलहीनच आहे. त्याहीपलीकडील परमानंद प्राप्त करून देणारे भोग भोगण्याकरिता परम बलाची आवश्यकता असते. म्हणून आर्यधर्म सांगतो, ’बलमुपास्व’ बल प्राप्त करा. लहानसहान भोग चघळून चोथ्याप्रमाणे फेकून द्या आणि त्यापलीकडील परमभोग भोगण्यास शक्तिसंपन्न व्हा. आत्मभोग हाच परमभोग होय. देहभोग, अप्सरा, गंधर्व भोग, देवत्व भोग आणि आत्मभाग या भोगाच्या क्रमशः पायर्‍या होत. कोणत्या भोगावर थांबायचे हा ज्याच्या त्याच्या कुवतीचा प्रश्न आहे.
 
सोमपान
आज सोमपान म्हणजे पौराणिक कल्पनाविलास म्हणून कथारुपाने शिल्लक आहे. ती सत्यघटना होती काय आणि असल्यास त्याचे रहस्य काय, याचा नीट बोध अजून झाला नाही. सोमपान म्हणजे काय, यांचे संशोधन करणार्‍यांत भांगेपासून तो तहत ब्रह्मरंध्रातील रसपानापर्यंतच्या योगमार्गातील प्रक्रियेपर्यंतचा उल्लेख करणारे सापडतात. पण, सोमपान म्हणजे काय असावे हे अनुत्तरितच राहते. कोणी सोम म्हणजे चंद्र मानून चंद्राच्या अमृतमय किरणांचे पान म्हणजे सोमपान मानतात किंवा कोणी सोम नावाची एखादी वनस्पती असून आज ती दुर्मीळ झाली, असावी असेही मानतात. वॉस्सान यांनी त्यावर बरेच परिश्रम घेऊन १९६८ साली एक ग्रंथ प्रसिद्ध केला, त्याचे नाव ’सोम दि डिवाइन मश्रूम ऑफ इम्मॉर्टलिटी’ असे आहे. ग्रंथ दुर्मीळ आहे. वॉस्सान यांचे मते सैबेरियातील ‘मुखमोर’ म्हणजेच सोमवल्ली असून त्याच्या देठातील रसाचे पान म्हणजेच सोमपान होय.
 
“वेदकाळात सोमपान याच ‘मुखमोर’ वल्लीचे करीत की आणखी कोणत्या वल्लीच्या रसाचे होत असे याबद्दल आज तरी निर्णय लागला नाही.” लोकमान्य टिळकांनी आपल्या ’आर्कटिक होम इन दी वेदाज’ या जगप्रसिद्ध ग्रंथात आर्यलोक उत्तर धृवीय प्रदेशात राहत असावेत, असे प्रतिपादन केले आहे. याचा अर्थ काही जण असा लावतात की, आर्यांचे वसतिस्थान केवळ उत्तर धृवच होते आणि तेथून ते हिमवर्षावामुळे सर्व जगभर पसरले. आर्य सर्व जगभरच वसत होते, याचे अनेक पुरावे आहेत. आर्य म्हणजे कोणी वंश नसून सुसभ्य आणि प्रगतिशील समाजाचे ते विशेषण होय. असे असता सोमपान करणारे आर्य आणि त्यांची सोमवल्ली केवळ सैबरियातच असावी, असा निष्कर्ष काढता येत नाही. सोमपानाकरिता केवळ विशिष्ट वल्लीच्या रसाचे पान करून भागणार नाही, तर त्या वल्लीरसावर सामगायनाचे संस्कार झाल्याशिवाय त्या रसाला ‘सोमरस’ ही संज्ञा प्राप्त होऊ शकत नसावी. आज पाश्चात्य संगीत वैज्ञानिक विशिष्ट चवीच्या पेयावर विशिष्ट स्वराची कंपने आवर्तून त्यातून निराळी चव उत्पन्न करतात असले प्रयोग सिद्ध झाले आहेत. तद्वत् सोमवल्लीच्या रसावर सामगायनाने संस्कार करून जे एक अमरपेय उत्पन्न हात असेल, त्यालाच ‘सोमरस’ म्हणत असावेत आणि असल्या सोमरसाचे पान म्हणजे सोमपान असावेत. असला संस्कारित अमृतरस प्राशन केल्यावर पिणारा साधक अमर झाल्यास आश्चर्य ते काय? गानयोगानेच सोमरस अमृत तत्वाला प्राप्त होऊ शकत असावा. गानयोगाचा एवढा अमर अधिकार आहे. यावर अजून बरेच संशोधन व्हायला पाहिजे. अंगुलीनिर्देश केला आहे. एवढ्यावरच काम भागणार नाही.
 
वेदात एक ऋचा आहे ’अप्सुमे सोमोअंब्रवीदंतर्विश्वानि भेषजा अग्निच विश्वशंभुवम’ सोमाने साधकाला सांगितले की, औषधीत विश्वशंभुवम् नावाचा अग्नी असतो. यावरून सोमपान करणारा साधक योगमार्गातील सुश्रुत अवस्थेत जात असला पाहिजे. असली सुश्रुत अवस्था सविकल्प अवस्थेतील दृश्यानुविद् आणि शब्दानुविद् या विधायक अवस्थेचे द्योतक आहे. सविकल्प अवस्थेतील दृश्ये शब्द प्रयत्नाने ज्ञात होतात, तर शब्दसमुच्चय दृश्य अवस्थेने ज्ञात होतात. यावर अधिक स्पष्टीकरण दिल्यास असे सांगता येईल की, विश्वातील प्रत्येक पदार्थ किंवा घटना त्यातील अणुरेणुच्या स्पंदनामुळे अंतर्बाह्य प्रकाशमान असते. स्पंदनामुळे प्रकाश उत्पन्न होतो, तर नाद किंवा शब्दही उत्पन्न होत असतो. नाद किंवा प्रकाश वस्तुच्या अस्तित्वाचे भिन्न परंतु एकच पर्याय असल्याने कोणत्याही वस्तूचा नाद साधकाच्या दृष्टीत एक चित्र उत्पन्न करेल किंवा वस्तूचे प्रकाशमय म्हणजेच दृश्य अस्तित्व नादाने प्रत्ययाला येईल. म्हणून योग्याच्या सविकल्प अवस्थेतील दृश्ये, शब्द प्रत्ययाने ज्ञात होतात, तर शब्द समुच्चय दृश्य अवस्थेने ज्ञान देतात. ऋषी तुरीय अवस्थेत जे ऐकत असत ते त्यांना दिसत असे आणि म्हणून ऋषींना द्रष्टे म्हणत असत. काहींना दृश्ये ऐकू येत असत. अशांना सुश्रुत म्हणत. सोमाचे वरील कथन साधकांची सुश्रुत अवस्था दर्शविते. गानयोगाची ही एक अवस्था आहे. यावरून गानयोगाचा महिमा अणि सीमाप्रदेश लक्षात येईल.
योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
९७०२९३७३५७