सौंदर्य जतन वर्धन आयुर्वेदासंगे भाग-२२

    01-Apr-2024
Total Views |
Saundary Jatan Vardhan


मागील लेखातून पादाभ्यंग व शिरोभ्यंग याविषयीची आपण माहिती घेतली. आजच्या भागात त्वचेचे व केसांचे सौंदर्य जतन व वर्धन करण्यासाठीचे आयुर्वेदातील अन्य उपायांबद्दल सविस्तर या लेखातून जाणून घेऊया.

आयुर्वेदातील विविध उपचारांपैकी पंचकर्म उपचार पद्धती ही एक सर्वश्रुत चिकित्सा आहे. यालाच ‘डिटॉक्स थेरपी’किंवा 'Body cleansing therapy' असे ही संबोधिले जाते. जेव्हा शरीरात विकृती/ आजार उत्पन्न करणारे घटक अति प्रमाणात वाढतात, तेव्हा केवळ शमनोपचाराने त्यांचे निहरण होत नाही, त्यासाठी त्या घटकांचे शरीरातून निष्कासन करणे गरजेचे ठरते यासाठी पंचकर्मा चिकित्सा सांगितली आहे. ऋतूमानानुसार विविध वयामध्ये व प्रदेशामध्ये त्रिदोषांची स्थिती बदलत असते. स्वस्थ व्यक्तीने ही वर्षातून एकदा विशिष्ट ऋतूंमध्ये पंचकर्माने शरीर शुद्धी करून घ्यावी, असे शास्त्रवचन आहे. तसेच रुग्णावस्थेत दोषांची स्थिती व तीव्रता याबद्दल तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पंचकर्म केल्याने जीर्ण स्वरुपाच्या स्वास्थ्याच्या कुरबुरी लवकर आराम पावतात. केसांवर व चेहर्‍यावर आपल्या शरीराचे व मनाचे स्वास्थ्य प्रतिबिंबित होत असते. तेव्हा केसांच्या आणि त्वचेच्या तक्रारींवरही पंचकर्म उपचार अवलंबावे लागतात. तज्ज्ञ वैद्यांच्या देखरेखीखाली ते करून घ्यावे. वमन, विरेचन, बस्ती, नस्य व रक्तमोक्षण या पाचही कर्माचा उपयोग केसांच्या व त्वचेच्या उत्तम स्वास्थ्य रक्षण, जतन व वर्धनासाठी उत्तम प्रकारे करता येतो.

नस्याचे विविध प्रकार चिकित्सेमध्ये केले जातात. त्यातील गाईच्या तुपाने केलेले नस्य हे दिनचर्येमध्येदेखील रोजच्या रुटीनमध्ये करावे असे आहे. त्वचेवरील डाग, काळवंडलेली त्वचा असल्यास नस्याचा उपयोग होतो. त्याचबरोबर त्वचेचा पोत सुधारून, चमकणार्‍या त्वचेसाठी देखील नस्य उपयोगी आहे. केस गळणे, अकाली पिकणे, केस पातळ होणे इ. सर्व तक्रारींमध्ये ही नस्य उत्तम कार्य करते. यासाठी विविध औषधांनी सिद्ध केलेली तेल व घृतांचा वापर केला जातो. जीर्ण स्वरूपाच्या केसाच्या व त्वचेच्या तक्रारींसाठी वमन करणे गरजेचे असते. वासतिक वमन (म्हणजे वसंत ऋतूमध्ये वमन) हे स्वस्थ व्यक्तींसाठीदेखील सल्ला दिला आहे. आयुर्वेदातील वमन पंचकर्म हे योगातील जलधौती किंवा निसर्गोपचारातील वमनापेक्षा खूप भिन्न आहे. ते कोणी करावे, कधी करावे याचे विशिष्ट नियम आहेत. तसेच वमनापूर्वीचे काही शेड्युल (ज्याला पूर्वकर्म म्हणतात) व वमनानंतरचे पथ्य (पश्चात कर्म) हे सगळं आयुर्वेदशास्त्रात सुस्पष्ट रितीने सांगितलेले आहे. रोज पाणी पिऊन उल्टी काढणे म्हणजे आयुर्वेदिक वमन नव्हे. वमनामुळे कफाच्या विकृतीमुळे होणारे विविध विकार उपशम पावतात, बरे होतात. विविध त्वचाविकारांमध्ये सर्दी-पडसं-दम लागणे इ.मध्ये ही वमनाचा उत्तम गुण पाहायला मिळतो.

विरेचन हे विकृतीत/बिघडलेल्या पित्ताच्या तक्रारींमध्ये रोगांमध्ये केले जाते. वमन तसे वरील भागातील दोष मुख मार्गाने बाहेर काढते. तसेच विरेचनाने शरीरातीलमध्य भागातील दोषांचे उत्तम र्निहरण होते. केस गळणे, पिकणे, त्वचेवर विविध रंग छटा (SKIN TONE-UNEVEN) उमटणे, मुरूमे वारंवार येणे, अकाली टक्कल पडणे, शरीरातील अतिरिक्त उष्णता वाढणे, अकाली चेहरा सुरकुतणे इ. व अन्य अनेक तक्रारींमध्ये विरेचन ही सद्य फलदायी चिकित्सा सिद्ध होते.

बस्तीला आयुर्वेदशास्त्रात अर्ध चिकित्सा म्हटली आहे. एवढा मोठा अवाका या पंचकर्मातील उपक्रमाचा आहे. बस्ती म्हणजे SOAP WATER ENEMA/GLYCERINE ENEMA /HOT WATER ENEMA नव्हे. हे तिन्ही प्रकार आयुर्वेेदिक पंचकर्मातील बस्तीमध्ये येत नाहीत. देण्याचा मार्ग सारखा असणे एवढेच साम्य बस्ती आणि प्रकारच्या ‘एनेमा’मध्ये आहे. बस्तीचे अनेकविध प्रकार आहेत. विविध व्याधींमध्ये विविध प्रकारचे बस्ती चिकिस्तेत अंतर्भावित केल्या जातात. तेलाची बस्ती, काढ्याची बस्ती, दुधामध्ये विशिष्ट औषध घालून त्याचे सिद्ध केलेली बस्ती, मांसरसाचा वापर करून तयार केलेले बस्ती इ. अनेकविध बस्ती प्रकार आयुर्वेदशास्त्रात उल्लेखले आहेत. रुग्णाची प्रकृती, रोगातील दोषांची स्थिती, ऋतू व अन्य घटकांचा विचार करून तज्ज्ञ वैद्य बस्तीची चिकित्सा सूचवितात. तेव्हा स्वयंनिदान आणि सेल्फ उपचार टाळावे. तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालील आयुर्वेदिकपंचकर्म, उपचारांचा अवलंब करावा.

पंचकर्मातील पाचवे कर्म हे रक्तमोक्षण होय. अशुद्ध रक्त शरीरातून काढणे हे रक्तमोक्षणाद्वारे केले जाते. रक्तमोक्षणाचे पाच उपप्रकार आहेत. त्यातील सिरावेध व जलौकावचरण यांचा चिकित्सेत अधिक उपयोग/ वापर केला जातो. स्थानिक लक्षणांमध्ये त्रासांमध्ये जलौकावचरण (leech throrapy) व सार्तदैहिक लक्षणांमध्ये सिरावेध अधिक गुणकारी ठरते. विविध त्वचा विकार, कोड, चाई, नागीण इ. विकारांमध्ये रक्तमोक्षणाचा उत्तम गुण येताना बघायला मिळतो. तसेच varicose veins, संधिशूल व सूज, उच्च रक्तदाब इ.मध्येदेखील रक्तमोक्षण यशस्वीरित्या केले जाते. कोणी करावे,कधी करावे, किती वेळा करावे, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तज्ज्ञ वैद्य रक्तमोक्षण सुरू करतो.

तेव्हा पंचकर्माचा उत्तम गुण हवा असल्यास तज्ज्ञ वैद्यांकडून करून घ्यावे. शरीरातील विकृत दोष निघून गेल्यामुळे उत्तम प्रतिचे त्रिदोष व सप्तधातूंची निर्मिती होऊ लागते. यामुळे केवळ रोगांची तीव्रता कमी होत नाही, तर तो रोग समूळ जाण्यास ही मदत होते व उत्तम प्रतीचे शरीर घटक निर्माण झाल्यामुळे त्या रोगापासून मुक्ती व स्वास्थ्य प्राप्ती होते. म्हणजे ’Recurrence of disease’ (रोगाचे चक्र) तोडण्यासही पंचकर्म उपयुक्त ठरते. त्याचबरोबर उत्तम शरीर घटक निर्माण झाल्यास निरोगी व मन होते व पुन्हा पुन्हा रोगोत्पती टाळली जाते. म्हणजेच, अपुनर्भव चिकित्सादेखील होते. निरोगी शरीर व मनाचा परिणाम सर्वांगावर दृष्य होतोच, तसेच रुग्णाला जाणवते की शरीर हल्के होणे, ताजेतवाने वाटणे, ताजे आणि हलके वाटणे हे स्वत:ला जाणवते व त्वचेतील व केसांतील फरक हा दिसतोसुद्धा.

पंचकर्माबरोबर उत्तम स्वास्थ्य व आरोग्यासाठी षडसात्मक आहार, योग्य वेळेस व योग्य प्रमाणात आहार सेवन आणि योग्य काळजी घेतलेली निद्रा व व्यायाम या सगळ्याची जोड दिल्यास जीवनशैलीशी संबंधित आजारांपासून नक्कीच सुटका होऊ शकते. कारण, वरील उपाय म्हणजेच जीवनशैली सुधारणे होय.

सुंदर त्वचा व केसांसाठी व्यसनमुक्त असणे हेदेखील अत्यंत गरजेचे आहे. धूम्रपानाने, मद्यपानाने आतील अवयवांमध्ये बिघाड, विकृती निर्माण तर होतेच, पण, त्याचबरोबर त्वचेची व केसांची समस्या ही उत्पन्न होऊ लागतात. धूम्रपानामुळे फुप्फुसांना व अन्य आभ्यंतरीक अवयवांना खूप मोठी इजा, दुखणी होतात. पण, सौंदर्याचा जर विचार केला, तर त्वचा काळवंडणे, ओठ काळसर होणे, नखे अधिक ठिसूळ होऊन तुटणे, केसांचा रंग व पोट बदलले-रुक्ष, खरखरीत, राठ होणे, त्वचेचा वर्ण बदलणे, त्वचा रुक्ष व शुष्क होणे, कंड येणे इ. शारीरिक स्तरावरील लक्षणे उत्पन्न होतात. धूम्रपानाच्या व्यसनामुळे अधिक अस्वस्थता, मनाची घालमेल, चिडचिड, गोंधळलेले विचार, एकाग्रतेत अडचण इ लक्षणे उत्पन्न होतात. अन्य व्यसनांबद्दल सविस्तर पुढील लेखात... (क्रमश:)


वेैद्य कीर्ती देव