मुंबई : उबरने मुंबईसाठी काही नवीन सुविधा जाहीर केल्या आहेत. या सुविधांमुळे प्रवास आणखी सोपा होणार आहे.पहिली सेवा आहे ‘मेट्रो तिकीट बुकिंग’. आता उबर अॅपमधून मेट्रो तिकीट खरेदी करता येणार. प्रवाशांना एकाच अॅपमधून कॅब आणि मेट्रोची योजना करता येईल. सुरुवातीला ही सेवा मुंबई मेट्रोच्या 1, 2A, 3 आणि 7 या लाईनसाठीच असेल.
दुसरी महत्त्वाची सेवा म्हणजे ‘एअरपोर्ट प्रायोरिटी अॅक्सेस’. आता टर्मिनल २ वरून बाहेर पडताना प्रवाशांना उबरची गाडी लगेच मिळेल. त्यामुळे वेळेची बचत होईल आणि गर्दीत उभं राहावं लागणार नाही.उबरने आणखी एक नवी सुविधा दिली आहे ‘प्राइस लॉक’. यामध्ये प्रवासाचं भाडं आधीच ठरवता येईल. त्यामुळे दरवाढीचा त्रास होणार नाही. हे फीचर रोजच्या प्रवासासाठी उपयुक्त आहे.
याशिवाय उबरने ‘वेट अॅण्ड सेव्ह’ नावाची सेवा सुरू केली आहे. ज्यांना थोडा वेळ थांबायला हरकत नाही, त्यांना स्वस्त भाडं मिळेल. हे फीचर सध्या भारतात १० शहरांत आहे.मुंबईत आता ‘उबरPet’ ही सेवा देखील उपलब्ध झाली आहे. प्रवाशांना आता पाळीव प्राण्यांसोबत प्रवास करता येणार. ही सेवा विशेषतः कुत्रा किंवा मांजरीसह प्रवास करणाऱ्यांसाठी आहे.
उबरने वृद्ध प्रवाशांसाठी एक विशेष मोड दिला आहे – ‘Senior Mode’. यात मोठे बटण, सोपे डिझाईन आणि कमी टॅप लागतो. ज्येष्ठ नागरिकांना यामुळे सहज सेवा वापरता येईल.उबर कंपनीचे दक्षिण आशिया प्रमुख प्रभजीत सिंग यांनी सांगितले की, “या सर्व सुविधा लोकांच्या गरजा आणि सूचना लक्षात घेऊन तयार करण्यात आल्या आहेत.”
ते पुढे म्हणाले की, “मुंबईसारख्या शहरात प्रवास सोपा, वेगवान आणि सुलभ व्हावा यासाठी उबर हे बदल करत आहे.” याशिवाय कंपनीने ‘uber XL Plus’, ‘Courier XL’ यांसारख्या नव्या सेवा भारतात आणण्याची योजना जाहीर केली आहे.