मुंबई : गिरणी कामगारांच्या आंदोलनातून अनेक लोकांनी राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला, अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. गुरुवार, १० जुलै रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.
मंत्री उदय सामंत म्हणाले की, "काल आझाद मैदानावर गिरणी कामगारांचे आंदोलन झाले. गिरणी कामगारांचा प्रश्न कोकणाशी निगडीत आहे. हे आंदोलन पक्षविरहित होते. परंतू, या निष्पाप लोकांचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. आज ४.३० वाजता गिरणी कामगारांच्या घरांसाठी बैठक आयोजित केली आहे. त्यांना अपेक्षित असलेला न्याय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देतील, अशी मला खात्री आहे."
"या आंदोलनातून अनेक लोकांनी राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना न्याय देण्याऐवजी आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी आम्हाला काही फायदा होईल का, या भूमिकेतून काही लोक काम करत आहेत. पण महायुतीसरकारवर गिरणी कामगारांचा विश्वास असल्याने आजच्या बैठकीला अनेक संघटना येणार असून यात गिरणी कामगारांच्या घरांसंदर्भात सकारात्मक निर्णय होईल," असे त्यांनी सांगितले.
अजून पुलाखालून बरेच पाणी जायचे बाकी
"ठाकरे बंधूंची युती झाल्यावर आणि आणिस्वतःची इच्छा पूर्ण झाल्यानंतर कदाचित इतर पक्षांबद्दल ते हीच भूमिका घेऊ शकतात. त्यामुळे मराठी माणसाच्या मेळाव्याला युतीचे वलय देऊ नका, असे मी सुरुवातीपासूनच सांगतो आहे. अजून पुलाखालून बरेच पाणी जायचे बाकी आहे. राज ठाकरेंचा स्वतंत्र विचार आहे. त्यांची काम करण्याची स्वतंत्र कार्यशैली आहे. त्यांनी मराठीच्या मुद्द्यावर राजकारण केले नसून मराठीला न्याय देण्याचे काम केले. बाकीच्यांनी मनसेच्या जीवावर आणि जमलेल्या गर्दीच्या जीवावर एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याचे काम केले," असेही ते म्हणाले.
"उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी काय भूमिका घ्यायची हा त्यांचा स्वतंत्र राजकीय विचार आहे. उबाठा गटाचे लोक ज्या मराठीचा पुळका दाखवतात त्या मराठीला न्याय देण्याचे काम स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केले. काँग्रेसचे लोक स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिवीगाळ करत असताना उबाठाने आपली भूमिका का स्पष्ट केली नाही? हा प्रश्न भविष्यात राज ठाकरे त्यांना विचारतील, अशी खात्री आहे," असेही मंत्री उदय सामंत म्हणाले.