काँग्रेसचे ‘भारत तोडो!’

    05-Feb-2024   
Total Views |
article on Congress India Todo Yatra
तिकडे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी न झालेल्या अन्यायासाठी ‘भारत जोडो न्याय यात्रा’ काढत आहेत आणि इकडे त्यांच्याच पक्षाचे खासदार भारत तोडण्याची राष्ट्रद्रोही भाषा करताना दिसतात. कर्नाटकातील काँग्रेस खासदार डी. के. सुरेश यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प हा पक्षपाती असल्याचे सांगत, केंद्र सरकार दक्षिण भारतीय राज्यांना निधी देत नसल्याचा आरोप केला. त्याहीपुढे जाऊन त्यांनी असाच प्रकार सुरू राहिल्यास, ’दक्षिण भारत’ नावाच्या वेगळ्या देशाचीच मागणी करू, अशी धमकी दिली. विशेष म्हणजे, हे सुरेश महाशय कर्नाटकचे विद्यमान उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे बंधू. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर कर्नाटक सरकार कितपत कारवाई करेल, हा प्रश्नच. खरं तर डी. के. सुरेश हे कुणी सामान्य नेते नाही, तर ते लोकसभेचे खासदार आहेत. बंगळुरु ग्रामीण लोकसभा मतदारसंघाचे ते संसदेत प्रतिनिधित्व करतात. सर्वच खासदारांना निवडून आल्यानंतर लोकशाहीच्या मंदिरात शपथ दिली जाते. ती शपथ घेतानाही, ‘मी या देशाच्या सार्वभौमतेचे आणि एकतेचे निर्धाराने रक्षण करीन’ अशी संविधानाच्या साक्षीने शपथ घेतली जाते. ही शपथ केवळ कागदोपत्री किंवा कोणतीही औपचारिकता नसून, ती सर्वार्थाने पाळायची असते, खासदाराने जगायची असते. पण, दुर्देवाने डी. के. सुरेश यांना त्याचा सपशेल विसर पडलेला दिसतो. म्हणूनच अन्याय होतोय, असा आटापिटा करुन स्वतंत्र दक्षिण भारत राष्ट्राची मागणी करेपर्यंत त्यांची मजल गेली. सुरेशसारख्या लोकप्रतिनिधींची म्हणून खासदारकीच रद्द करणे आणि त्यांना आजन्म निवडणूक लढविण्यावर बंदी घालणे, अशीच कडक शिक्षा व्हायला हवी. त्यामुळे विरोध जरुर करावा, मागण्याही मांडाव्या. पण, आम्हाला निधी मिळत नाही, म्हणून देशाचे असे तुकडे तुकडे करण्याची भाषा अशोभनीयच. राहुल गांधी सुरेश यांना समज देतील, हे शक्यता धुसर. कारण, 2021 साली खुद्द राहुल गांधींनीही दक्षिणेचे मतदार उत्तरेकडील मतदारांपेक्षा अधिक सुज्ञ असल्याचे वादग्रस्त विधान केले होते. केंद्र सरकारने तामिळनाडूला अधिक अधिकार द्यावेत; अन्यथा पुढील टप्प्यात वेगळ्या राष्ट्रासाठी लढा द्यावा लागेल, असा इशारा द्रमुकचे खासदार ए. राजा यांनी केंद्र सरकारला दिला होता. त्यामुळे याच देशाचे खाऊन, याच देशाला तोडण्याची भाषा करणार्‍यांना भारतीयांनीच मतपेटीतून धडा शिकवावा!

वडिलांच्या पावलावर पाऊल


ग्रेसचे बर्‍यापैकी अडगळीत पडलेले नेते मणिशंकर अय्यर यांच्या मुलीनेही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत, नव्या वादाला तोंड फोडले. अय्यर यांच्या सुरन्या या लेकीने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निषेधार्थ चक्क तीन दिवस उपोषण केले होते. बरं हे उपोषण देशातील मुस्लिमांसाठी केल्याचा अजब दावाही तिने केला. त्यानंतर हे उपोषण मध देऊन आईने सोडवले. यासंदर्भातील पोस्टदेखील सुरन्या हिने सोशल मीडियावर अपलोड केली होती. त्यामुळे अय्यर यांच्या लेकीने हे उपोषणाचे हत्यार उपसून नेमके काय मिळवले, हे तिचे तीच जाणो! बरं सुरन्याने मुस्लीम समाजासाठी उपोषणाचे हत्यार उपसले; मात्र तिच्या मदतीसाठी आता कुणीही पुढे यायला तयार नाही. कारण, राम मंदिराला विरोध दर्शवून, सुरन्याने स्वतःच्याच अडचणीत वाढ करून घेतलीय. तिच्याविरोधात आता दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम ब्रांचमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, सोसायटीच्या ‘आरडब्ल्यूए’ने तिला माफी मागण्यासाठी नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि भाजप नेते अजय अग्रवाल यांनी शनिवारी ही तक्रार दाखल केली. त्यांनी दिल्ली पोलिसांना 36 मिनिटांचा व्हिडिओ सुपुर्द केला आहे आणि तो दाहक असल्याचे वर्णन केले आहे. सुरन्यावर तिच्या कॉलनीतील नागरिकदेखील संतापले असून एकतर तिने माफी मागावी किंवा दुसर्‍या सोसायटीत जावे, अशी मागणी लावून धरली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृह मंत्रालयाने मणिशंकर अय्यर यांची दुसरी मुलगी यामिनी हिच्याशी संबंधित ’सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च’चा ‘एफसीआरए’ परवाना बेकायदेशीर कामांमध्ये गुंतल्यामुळे रद्द केला होता. त्यातच या सुरन्याने नाहक कसलेही कारण नसताना, राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसारख्या ऐतिहासिक सोहळ्याला घरातूनच उपोषण करून दृष्ट लावण्याचा प्रयत्न केला. अशीच दृष्ट तिचे वडील मणिशंकर अय्यर यांनी 2014 साली लावण्याचा प्रयत्न केला होता. 2014च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपले पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यावेळी काँग्रेसमध्ये बर्‍यापैकी वजन राखून असलेले मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदींना ‘चायवाला’ असे म्हणून हिणवले होते आणि पुढे त्याच चायवाल्याने काँग्रेसला चहापुरतेही शिल्लक ठेवले नाही, हा तर इतिहास!

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.