मेंदू माझा वेगळा!

    03-Feb-2024
Total Views |
Elon Musk’s Neuralink brain chip

नुसता मेंदूने विचार केला आणि कोणतीही हालचाल न करता, त्या विचाराचे आज्ञेत तंतोतंत पालनही झाले! अगदी एखाद्या ‘सायन्स फिक्शन’ चित्रपटातील हा प्रसंग. पण, सुप्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांनी हे तंत्रज्ञान विकसित केल्याची नुकतीच घोषणा केली. मस्कच्या ‘न्यूरालिंक’ कंपनीने विकसित केलेल्या या नवतंत्रज्ञानामुळे ‘मेंदू माझा वेगळा’ असेच म्हणण्याची माणसावर वेळ लवकरच येऊ शकते!

जानेवारी महिन्याच्या शेवटी एलॉन मस्क या अमेरिकी उद्योजकाने दावा केला की, त्यांनी असे एक मशीन/उपकरण तयार केले आहे की, ते थेट मानवी मेंदूत बसवले जाऊ शकते आणि त्या उपकरणाच्या साहाय्याने आपण कोणतीही हालचाल न करता, हे उपकरण माणसाला फक्त विचार करून फोन किंवा संगणक नियंत्रित करण्यास अनुमती देईल. म्हणजेच उदाहरण द्यायचे झाले, तर एखाद्या व्यक्तीच्या मेंदूत हे उपकरण बसवले आणि ते त्याच्या घरातील टीव्हीला ब्लूटूथ किंवा इतर तत्सम लहरींच्या साहाय्याने जोडले आणि त्या व्यक्तीने फक्त विचार केला की, टीव्हीचा चॅनेल बदलला पाहिजे, तर ते सहज शक्य होईल. हे फक्त टीव्हीसाठी नसून आपला फोन, कॉम्प्युटर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांना सुद्धा नियंत्रित करेल. हे उपकरण एलॉन मस्कच्या ‘न्यूरालिंक’ या कंपनीने विकसित केले असून, त्याला उपकरणाला किंवा चिपला त्यांनी ’टेलिपॅथी’ नाव दिले आहे. ‘न्यूरालिंक’ कंपनीच्या माहितीनुसार, या ब्रेन चिपचा उपयोग पार्किन्सन रोग, एपिलेप्सी, नैराश्य, मेंदूच्या दुखापती, तीव्र वेदना, अंधत्व आणि बहिरेपणा यांसारखे आजार असणार्‍या रुग्णांसाठी होणार आहे.

‘हे’ उपकरण महत्त्वाचे आहे का?

सर्वप्रथम ‘न्यूरालिंक’बद्दल जाणून घेऊया, ज्याची निर्मिती शास्त्रज्ञ, एलॉन मस्क आणि इतर उद्योजक यांनी केली. ही कंपनी मुख्यत्वेकरून संगणक इंटरफेस विकसित करण्याचे काम करते. ‘न्यूरालिंक’ म्हणते की, त्याच्या रोपण प्रक्रियेमध्ये मानवनिर्मित अतिसूक्ष्म सुया वापरल्या जातात. या सुयांची किंवा टीपची रुंदी फक्त दहा ते १२ मायक्रॉन आहे. या छोट्या सुया केवळ लाल रक्तपेशीच्या व्यासापेक्षा किंचित मोठ्या आहेत. या सुयांच्या लहान आकारामुळे हे उपकरण मेंदूत बसवताना, मेंदूच्या इतर भागाला कमीत हानी होते, असा कंपनीचा दावा आहे.

‘न्यूरालिंक’च्या म्हणण्यानुसार, या छोट्या चिपमध्ये ज्याला वैद्यकीय भाषेत ’इम्प्लांट’ म्हणतात, तर या ‘इम्प्लांट’मध्ये १ हजार, २४ केसांपेक्षा लहान आकाराचे इलेक्ट्रोड समाविष्ट आहेत आणि ते ६४ भागात वितरित केलेले आहेत. ‘इम्प्लांट’ हा ‘टेलिपॅथी’ उपकरणाचा मुख्य हार्डवेअर घटक आहे; यामध्ये इतर इलेक्ट्रॉनिक छोटी उपकरणे असून, त्यामध्ये छोटासा सर्जिकल रोबोटदेखील आहे. त्याच जोडीला हे उपकरण वापरण्यासाठी पण विकसित केले असून जे संगणक किंवा अन्य उपकरणाशी वायरलेस पद्धतीने कनेक्ट होते.

याच ‘इम्प्लांट’मध्ये (छ१) नावाचा अनेक छोटा घटक असून, तो बाहेरून वायरलेस चार्जेरच्या साहाय्याने चार्ज करता येतो आणि हे सर्व उपकरण कोठूनही सहज वापरता येऊ शकते आणि मानवी मेंदूमध्ये स्थापित केले जाऊ शकते. हे उपकरण माणसाला फक्त विचार करून फोन किंवा संगणक नियंत्रित करण्यास अनुमती देईल. त्यामुळे मानवी मेंदू आणि बाह्य तंत्रज्ञान यांच्यात थेट संवाद साधण्यासाठी, शेवटी मानवी आकलनशक्ती वाढवण्यासाठी हे उपकरण तयार करण्यात आले, असा या कंपनीचा दावा आहे. ’न्यूरोसायन्स’साठी म्हणजेच मानवी मेंदूचा अभ्यास करणार्‍यांसाठी, हे उपकरण म्हणजे ’ग्राऊंडब्रेकिंग’ उपलब्धी नव्हे, तर एक प्रकारची वैद्यकीय उपकरण क्षेत्रातील उत्क्रांती आहे, असा दावा केला जात आहे. न्यूरोलॉजिकल रोग बरे करण्यासाठी अशा प्रकारची नवकल्पना खूप महत्त्वाची भूमिका बजावते. हे रुग्णांना हालचाल नियंत्रण पुन्हा मिळविण्यात किंवा न्यूरल क्रियाकलाप आज्ञा अनुवादित करण्यात मदत करू शकते.

अजून कोणी स्पर्धक आहेत का?
 
अशा प्रकारची नावीन्यता असणारी वैद्यकीय उपकरणे बनवणारी एलॉन मस्कची ‘न्यूरालिंक’ ही पहिलीच कंपनी नसून, याआधी २०२३ मध्ये स्वित्झर्लंडमधील लॉसने (EPFL) येथील ‘Scole Polytechnique Fuduamio’ या विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी असे उपकरण बनवले आहे की, ज्याने अर्धांगवायू झालेल्या माणसाला फक्त विचार करून चालण्यास यशस्वीपणे सक्षम केले आहे. अर्धांगवायू झालेल्या रुग्णाचा मेंदू आणि मणक्यावर इलेक्ट्रॉनिक प्रत्यारोपण करून हे साध्य केले गेले, जे त्याच्या पाय आणि पायांना वायरलेसपणे विचारांचे संप्रेषण करतात. किंग्ज कॉलेज लंडनच्या प्रोफेसर न व्हॅनहोस्टेनबर्गे म्हणाले की, ”वैद्यकीय उपकरणे तयार करणार्‍या कोणत्याही कंपनीसाठी, मानवांमध्ये पहिली चाचणी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.”
 
महत्त्वाचे म्हणजे, ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस समुदायासाठी ही बातमी खूपच आशादायी आहे. पण, एवढे असूनही जगातील अनेक कंपन्या अशा प्रकारच्या रोमांचक उत्पादनांवर काम करत असताना, फक्त काही इतर कंपन्या आहेत, ज्यांनी त्यांची उपकरणे मानवांमध्ये प्रत्यारोपित केली आहेत, त्यामुळे ‘न्यूरालिंक’ एका लहान गटात सामील झाली आहे. जगातील अनेक शास्त्रज्ञांनी मात्र सावधगिरीची नोंद असणे आवश्यक आहे, असे सूचवले आहे. कारण, खरे यश केवळ दीर्घकालीन मूल्यांकन केले जाऊ शकते.
 
‘या’ तंत्रज्ञांवरून जगात वाद-विवाद का सुरु झाले आहेत?

‘न्यूरालिंक’ने पूर्वी त्याचे संशोधन कसे चालते आणि एलॉन मस्क ते कसे कार्य करते, याबद्दलच्या आरोपांमुळे वादाचा सामना करावा लागला आहे. २०२२ आणि २०२३ मध्ये काही अहवाल समोर आले, ज्यामध्ये कंपनीने केलेल्या क्लिनिकल चाचणीमध्ये वापरल्या जाणार्‍या माकडांवर आणि इतर प्राण्यांवर दुर्बल प्रभाव पडला. ज्यात त्याच्या संशोधनाचा एक भाग म्हणून तब्बल १२ माकडांना अधू केल्याचा किंवा मारल्याचा आरोप आहे. कंपनीवर प्राण्यांशी गैरवर्तन केल्याचा आणि दूषित हार्डवेअरद्वारे संसर्गजन्य रोगजनकांच्या मानवी संपर्कास धोका निर्माण केल्याचा आरोप आहे. ’रॉयटर्स’ या जागतिक मीडिया संशोधन संस्थेच्या म्हणण्यानुसार, अंतर्गत कर्मचार्‍यांच्या तक्रारींमध्ये असा आरोप आहे की, प्राण्यांच्या चाचणीत घाई केली गेली असून, परिणामी अनावश्यक त्रास आणि प्राण्यांचा मृत्यू झाला. ’रॉयटर्स’च्या म्हणण्यानुसार, या सर्व प्रकाराची अमेरिकन कृषी विभागाकडून तपासणी करण्यात आली. २०२२ मध्ये ’रॉयटर्स’ने पुनरावलोकन केलेल्या नोंदी दर्शवतात की, कंपनीने २०१८ पासून २८० मेंढ्या, डुक्कर आणि माकडांसह १ हजार, ५०० प्राणी मारले आहेत. वैद्यकीय संशोधनामध्ये प्राण्यांचा नियमितपणे वापर केला जातो आणि अनेक चाचण्यांमध्ये टर्मिनल प्रक्रिया समाविष्ट असतात. ’न्यूरालिंक’ने त्यांच्या अनेक ब्लॉग पोस्टमध्ये प्राण्यांवरील उपचारांचा बचाव केला असून, तर मस्कने असा दावा केला आहे की, ‘इम्प्लांट’च्या परिणामी एकही माकड मरण पावले नाही. याउलट मस्कच्या दाव्यांची कोणतीही स्वतंत्र पडताळणी झालेली नाही किंवा ‘न्यूरालिंक’ने त्यांनी सांगितलेल्या प्रक्रियेबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. यामुळे त्यांच्यावरील संशय अजूनच बळावत चालला आहे.
 
अमेरिकन काँग्रेसच्या सदस्यांनी ’सिक्युरिटीज अ‍ॅण्ड एक्सचेंज कमिशन’ला मस्कने ’न्यूरालिंक’च्या ‘इम्प्लांट्स’च्या चाचणीसाठी प्राण्यांच्या वापराचे चित्रण कसे केले, हे पाहण्यास सांगितले आहे आणि विशेषतः त्याने ‘इम्प्लांट’च्या विक्री योग्यतेचा अतिरेक केला असेल का, हेसुद्धा पडताळण्यास सांगितले आहे.

त्याच जोडीला अमेरिकेतील अनेक कायदेतज्ज्ञांनी गेल्या मे महिन्यात अमेरिकन सरकारला विनंती केली आहे, ज्यामध्ये त्यांनी अमेरिकन कृषी विभागाला प्राण्यांच्या चाचणीवर देखरेख करणार्‍या पॅनेलमधील लोकांमधील हितसंबंधांच्या संभाव्य संघर्षांची चौकशी करण्यास सांगितले.

लोकांमध्ये या मेंदूच्या चिपबद्दल ‘इम्प्लांट’बद्दल उत्साह आणि संशयदेखील आहे.

जगातील अनेक सर्वसामान्य लोकांच्यामध्ये या मेंदूत बसवल्या जाणार्‍या, चिपबद्दल जो समज झाला आहे, त्यारून लोक उत्साही आहेत, असेही दिसून येते. सध्या चालू असलेल्या बहुतेक संशोधनांनी अर्धांगवायू आणि अंधत्वग्रस्त लोकांना जगाशी संवाद साधण्याचे नवीन मार्ग तयार करण्याचे प्रयत्न चालू आहेत, हे खरेच कौतुकास्पद आहे.
 
परंतु, ‘इम्प्लांट’मध्ये अशा गंभीर परिस्थितीमुळे प्रभावित नसलेल्या लोकांना वाढवण्याची क्षमता असल्याचे देखील पाहिले गेले आहे. तुमच्या प्रिय व्यक्तींशी ‘कनेक्ट’ होण्यात, वेब ब्राऊझ करणे किंवा फक्त तुमचे विचार वापरून गेम खेळण्याच्या आनंदाची कल्पना करा, असे ’न्यूरालिंक’ने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे आणि हे काही लोकांना आवडलेले दिसून येते. मेंदू आणि पाठीचा कणा जोडणार्‍या या ‘इम्प्लांट’सह माणसाला पुन्हा चालण्यास मदत करणे, हे वैद्यकीय क्षेत्रातील एक उत्क्रांतीचाच भाग आहे, असे लोकांना वाटते. पण, यामुळे भविष्यात लोकांच्या मेंदूमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करता येऊ शकते आणि ती त्यांच्याच मेंदूत विलीन पण करता येऊ शकते आणि असे झाले तर आपण लोकांच्या नैसर्गिक मेंदूशी किंवा बुद्धिमतेशी बाहेरून खेळू शकतो, असा धोका तज्ज्ञांनी वर्तविलाआहे. यामध्ये ‘गूगल’चे माजी कर्मचारी ज्यांनी ‘सेंटर फॉर ह्यूमन टेक्नोलॉजी’ची स्थापना केली, त्यांनी या चिपचा उपयोग इतका परिणाम होऊ शकतो की लोक त्याचे व्यसनाधीन होतील आणि ते खूप हानिकारक असेल, तर हे नवीनतेबद्दल आहे, असे ‘न्यूरालिंक’चे म्हणणे आहे. एलॉनच्या ’इन्व्हेंटरी’ मनासह नावीन्यतेचा शोध घेणार्‍या मनाचा विचार करा. काही म्हणतात की, तो एलियन आहे किंवा काही त्याला ‘उत्कट विचारवंत’ म्हणतात. काहीतरी महान किंवा वेगळे करण्याची इच्छा बाळगून या ग्रहावर राहणारी ही व्यक्ती आहे. तो ज्या प्रकारे विचार करतो आणि त्यानुसार करतो असेदेखील काही लोक म्हणतात. शेवटी याचे खरे परिणाम दिसायला काही वर्षे लागतील, हेही तितकेच खरे. तोपर्यंत आपण हे तंत्रज्ञान अलौकिक आहे, असेच समजूया! येणारा काळ याचे खरे काय ते उत्तर देईल!

डॉ. नानासाहेब थोरात
(फेलो ऑफ द रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिन, लंडन)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.