कलियुगातील कल्की अवतार

    28-Feb-2024
Total Views |
Kalki Avatar

कलियुगाच्या अखेरच्या टप्प्यात देव ‘कलंकी’ अर्थात ‘कल्की’ या नावाने अवतार घेणार आहे. कल्कीचे पुराणातील वर्णन म्हणजे एक ब्रह्मचारी बटू हातात तलवार घेऊन पांढर्‍या घोड्याच्या मागून चालत आहे. बटूचे हे चित्र सांकेतिक असून, अर्थगर्भ आहे. कलियुगात जिकडे तिकडे अधर्माची, असत्याची शिरजोरी पाहायला मिळेल. राजसत्ताही त्याला रोखण्यात अपयशी ठरेल. सज्जनांना, भक्तांना जीणे नकोसे होईल. अशावेळी क्रांती झाल्याशिवाय गत्यंतर नाही.

मागील श्लोक क्र. १२४ मध्ये कलियुगात भगवंताने मौन पत्करले आहे, असा अभिप्राय समर्थांनी व्यक्त केला आहे. शास्त्रात विश्वाच्या कालगणनेसाठी जी चार युगे सांगितली आहेत, त्यातील कलियुग हे चौथे युग आता चालू आहे. कलियुगाची कालमर्यादा ४ लाख, ३२ हजार सौर वर्षे अशी सांगितली आहे.इसवी सन पूर्व ३१०२ या वर्षापासून कलियुगाची सुरुवात झाली, असे मानले जाते. प्रगत अवस्थेप्रत पोहोचलेला भारतीय संस्कृतीच्या उत्कर्षाचा आलेख कलियुगाच्या काळात खाली घसरलेला पाहायला मिळतो. अध्यात्म आणि त्याग यावर आधारित असलेली भारतीय संस्कृती कलियुगात खालावत जाणार असे मानले जाते आणि त्याचा प्रत्यय आज आजूबाजूला घडणार्‍या घटनांमधूनयेत असतो. संस्कृतीच्या उन्नतीचे किंवा अवनतीचे टप्पे सहस्त्र वर्षांत मोजण्याची प्रथा आहे. शास्त्रातील वर्णनानुसार, कलियुगात भारतीय संस्कृतीतील त्यागाची परंपरा आणि धार्मिकता कमी कमी होत जाऊन लोप पावेल. समाजातील सभ्यता कमी होईल. भोगवाद, स्वार्थ, द्वेष, मत्सर वाढल्याने कलह होतील. भांडणाचे पर्व सुरू होईल. सगळीकडे असंतोष पसरेल. त्याग आणि परमार्थ हे गुण कमी कमी होऊन त्यांचे अस्तित्व राहते की नाही, अशी परिस्थिती निर्माण होईल. त्याग, परमार्थ या गुणांतील आनंद लोक विसरतील. असे कलियुगाचे वर्णन आढळते. विश्वाची कालक्रमणा चार युगात विभागली आहे, हे आपण पाहिले. दुष्टांचा संहार आणि सज्जनांचे रक्षण या कार्यासाठी तसेच भक्तांसाठी प्रत्येक युगात भगवंत अवतार घेतो, अशी हिंदूंची श्रद्धा आहे. या कलियुगातील परिस्थिती भगवंत कशी सावरणार आहे, हे समर्थ पुढील श्लोकात सांगत आहेत-


अनाथां दिनाकारणें जन्मताहे।
कलंकी पुढे देव होणार आहे।
जया वर्णिता सीपली वेदवाणी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२५॥


‘देव भक्ताची उपेक्षा करीत नाही, भक्ताचा त्याला अभिमान असतो’ हे सांगण्यासाठी समर्थांनी यापूर्वीच्या श्लोकांतून मत्स्य, कर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, श्रीकृष्ण हे भगवंताचे अवतार थोडक्यात सांगितले आहेत. प्रत्येक अवतारामागील प्रेरणा स्पष्ट करणारा कथाभाग यापूर्वीच्या लेखांतून आला आहे.सध्या आपण कलियुगात वावरत आहोत. कलियुगाची एकंदर कालमर्यादा ४३२ सहस्र सौरवर्षे इतकी आहे, हे आपण पाहिले. त्यापैकी फक्त पाच सहस्र वर्षे पार पडली आहेत. सध्या आपली वाटचाल कलियुगातील प्रथम चरणातून सुरू आहे. या पुढील प्रत्येक सहस्र वर्षांत माणसांची जीवनशैली, तसेच समाजाची विचार करण्याची पद्धत यात बदल होत जाईल. थोडक्यात, आगामी सहस्रकांत समाजाच्या आचाराविचारात बदल होत जातील. कलियुगाचा प्रभाव वाढत जाईल त्याचा परिणाम सज्जन, दुर्जन, भक्त, अभक्त, ज्ञानी, अज्ञानी सर्वांना भोगावा लागणार आहे. अशावेळी लोकांना यापासून सोडवणार्‍या महान नेत्याची शक्तीची गरज भासेल, भगवंताच्या अवताराची जरुरी भासेल, देव या जगात अवतीर्ण होण्यासंदर्भात भगवद्गीतेत भगवंताचे वचन आहे की,

 
यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युस्थानमधर्मस्य
तदात्मानं सृजाम्यहम्॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे॥ (४.७ व ८)


भगवंतांनी या ठिकाणी आपल्या अवताराचे प्रयोजन सांगितले आहे. दिव्यावर काजळी यावी, तशी काही काळ धर्मावर अधर्माची, असत्याची छाया येऊन धर्माला ग्लानी येते. अर्धाचा नाश करण्यासाठी भगवंताला मायारुपाने शरीर धारण करून अवतारात प्रगट व्हावे लागते. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश, हे त्याचे कार्यक्षेत्रही भगवंताने सांगितले आहे. याचा अर्थ सज्जन अणि दुर्जन दोघांकडे देवाचे लक्ष असते. तरीही देव दुर्जनांना एकदम नष्ट करीत नाही. दुष्ट, दुर्जन कसेही असले तरी भगवंत त्यांना सुधारण्यासाठी संधी देत असतो. या सृष्टीत देवाने मानवाला विचार, स्वातंत्र्य व कर्म स्वातंत्र्य दिले आहेे. तथापि अतिस्वार्थी अतिअहंकारी, दुष्ट दुर्जनांत जेव्हा बदल अशक्य होतो, तेव्हा तो जगाच्या चिंतेचा विषय ठरतो. कलियुगात सुष्टांचे, सज्जनांचे या जगातील प्रमाण कमी असते. भावी काळात त्यात फारसा फरक पडेल असे वाटत नाही. समाजातील संतसज्जनांचे आचरण नि:स्वार्थी परोपकारी, सुस्वभावी, शांतताप्रिय असल्याने दुष्ट दुर्जनांना ते पाहवत नाही, ते सज्जनांचा द्वेष-मत्सर करू लागतात, त्यांची हेटाळणी करतात. त्यांचा छळ करतात. त्यांना त्रास देतात. सज्जनांचा कोणी पाठीराखा न उरल्याने त्यांची अवस्था अनाथ, दीन अशी होऊन जाते. अशावेळी अनाथ, दीन भक्तांच्या, सज्जनांच्या साहाय्यासाठी भगवंताला जगात अवतार रूपाने जन्म घ्यावा लागतो. देव अधर्माची स्थिती आटोक्यात आणून धर्माची स्थापना करतो. लोकांना सन्मार्गाला लावतो. ही अवताराची कल्पना स्वामींनी ’अनाथां दिनाकारणें जन्मताहे’ या ओळीत मांडली आहे.


दुर्जनांकडून झालेला सज्जनांचा, भक्तांचा छळ हे जरी भगवंताच्या अवतारासाठी निमित्त कारण असले तरी अनाथ, दीन सज्जन भक्त यांच्याकडून जी आर्तपणे विनवणी केली जाते, ती आर्त व्याकूळ हाक भगवंतापर्यंत पोहोचते, अन्यथा कलियुगातील देव मौन धारण करीत असतो. देवाशिवाय कोण आधार नाही, देवाशिवाय कोणी माता नाही, अशी भक्तांची अवस्था पाहिल्यावर भगवंत हाकेला प्रतिसाद देतो. तो भक्ताची उपेक्षा करीत नाही. कलियुगाच्या अखेरच्या टप्प्यात देव ‘कलंकी’ अर्थात ‘कल्की’ या नावाने अवतार घेणार आहे. कल्कीचे पुराणातील वर्णन म्हणजे एक ब्रह्मचारी बटू हातात तलवार घेऊन पांढर्‍या घोड्याच्या मागून चालत आहे. बटूचे हे चित्र सांकेतिक असून, अर्थगर्भ आहे. कलियुगात जिकडे तिकडे अधर्माची, असत्याची शिरजोरी पाहायला मिळेल. राजसत्ताही त्याला रोखण्यात अपयशी ठरेल. सज्जनांना, भक्तांना जीणे नकोसे होईल. अशावेळी क्रांती झाल्याशिवाय गत्यंतर नाही. बटू हा धर्माचे प्रतीक आहे. त्याने हातात तलवार घेतली आहे, हे धर्मक्रांती दाखवते. दुष्ट दांभिकांना तो धडा शिकवेल, पांढरा घोडा हे स्वच्छ धर्माधिष्ठित भ्रष्टाचाररहित राज्यसत्ता दाखवते. म्हणजे कल्की धर्मक्रांती व राज्यक्रांती घडवून आणेल. परमेश्वर अत्यंत पराक्रमी आहेच, परंतु त्याच्या ठिकाणी असलेल्या अगाध गुणांचे व परमेश्वर स्वरूपाचे वर्णन वेदही करू शकत नाहीत. तेथे वेदही ‘नेती नेती’ म्हणजे ‘जाणता येत नाही’ असे सांगतात. ज्याचे माहात्म्य वेदही सांगू शकत नाही, असा सर्वसामर्थ्यवान गुणवान भगवंत भक्ताची उपेक्षा करीत नाही. भक्ताचा देवाला अभिमान असतो. म्हणून आपण त्याचे भक्त होऊन राहा,असा संदेश समर्थ आपल्याला देत आहेत. आपण त्याची साधना निष्ठेने करावी. त्यातच आपले भले आहे.


-सुरेश जाखडी


अग्रलेख
जरुर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121