‘एआय’ क्षेत्रातील भरारीसाठी भारत सज्ज

    11-Dec-2024   
Total Views | 42
 
AI
 
‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ अर्थात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’बद्दल अजूनही दोन मतप्रवाह आढळून देतात. एक ‘एआय’ला वरदान मानणारा, तर दुसरा नोकरी-उद्योगधंद्यांसाठी ‘एआय’ला शाप मानणारा. पण, शेवटी वास्तव हेच की, आगामी युग हे ‘एआय’चे असेल. भारतानेही अत्यंत वेगाने ‘एआय’ तंत्रज्ञान आत्मसात करुन भरारी घेतली आहे. त्याचे आकलन...
 
त्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) म्हणजेच ‘एआय’ नोकर्‍या खाणार का? ‘एआय’मुळे बेरोजगारी ओढावणार, अशी आवई आजही उठवली जाते. मात्र, हे खोटे ठरवत भविष्यात हे तंत्रज्ञान भरपूर संधी निर्माण करणार आहे.
 
भारत हा भविष्यात जनरेटिव्ह ‘एआय’च्या क्षेत्रात मोठी भूमिका निभावणार आहे, असा विश्वास नुकताच ‘अमेझॉन वेब सर्व्हिस’चे भारतातील बिझनेस पार्टनर हेड, प्रवीण श्रीधर यांनी व्यक्त केला. भारतातीत 6 कोटी, 50 लाख उद्योगांचे भविष्य ‘एआय’मुळे बदलणार आहे, असेही ते म्हणाले. तशी क्षमता भारताकडे असून, भविष्यात हा बदल निश्चित दिसेल. केवळ देशांतर्गतच नव्हे, तर जगाच्या अर्थव्यवस्थेसाठीही योगदान असेल. ‘एआय’चा वापर आता केवळ व्हिडिओ आणि फोटोनिर्मितीसाठी मर्यादित राहणार नसून तो शिक्षण, आरोग्य आणि बँकिंगसह इतर महत्त्वाच्या क्षेत्रातही केला जाईल.
 
संगणकयुगाची जेव्हा सुरुवात झाली, त्यावेळीही नोकर्‍यांवर कुर्‍हाड येईल, हजारो बेरोजगार होतील, अशी आवई उठवण्यात आली होती. कालसुसंगत राहणार्‍यांसाठी संगणकाचे स्वागत करणे भाग होते. मात्र, ज्यांनी ते केले नाही, त्यांच्या नोकर्‍या आपसूकच गेल्या. मात्र, ज्यांनी संगणकाशी मैत्री केली, तत्संबंधीचा अभ्यासक्रम पूर्ण केला, त्यांच्यासाठी अगदी परदेशातही कुशल मनुष्यबळासाठी ‘रेड कार्पेट’ अंथरण्यात आले. भारतात इंटरनेट सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्यानंतर देश डिजिटलायझेशनकडे वळला. इथवरचा इतिहास आपण पाहिला. मात्र, आता वेळ आली आहे, ती एक पाऊल आणखी पुढे टाकण्याची.
 
‘एआय’ आणि ‘मशिन लर्निंग’ आणि ‘डेटा सायन्स’ आणि ‘एआय’ हे अभ्यासक्रम आता विविध विद्यापीठ आणि संस्थांमार्फत शिकवण्यासही बरेच ठिकाणी सुरुवात झाली आहे. भारताची तरुण देश म्हणून याची गणना केली जाते. या तरुणांनी गरज आहे ते या मिळणार्‍या संधीचे अधिकाधिक सोने करण्याची. जसा अपप्रचार इतर कुठल्याही क्षेत्राबद्दल केला जातो, तसा तो शिक्षण क्षेत्राबद्दलही हमखास केला जातो. मात्र, शिक्षण क्षेत्रात ‘एआय’च्या वापरामुळे मोठा क्रांतिकारी बदल घडणार आहे. ‘एआय’कडे आव्हान म्हणून पाहणार्‍या शिक्षण व्यवस्थेलाच शिक्षणात मूलभूत बदल घडवून आणण्याची गरज भासणार असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांचे आहे. अनेक शिक्षकांच्या तक्रारी याच असतात की, काही विद्यार्थ्यांनी त्यांचा संपूर्ण शालेय प्रकल्प हा मुळात ‘चॅट-जीपीटी’सारख्या ‘जनरेटिव्ह एआय’द्वारे बनवला. यापूर्वी अशाच तक्रारी गुगल आणि अन्य सर्च इंजिनबद्दल केल्या जात होत्या. दुसरी बाजू म्हणजे, विद्यार्थ्यांनी किमान त्याचा वापर करण्याचा प्रयत्न तरी केला, असा असायला हवा. अशा गोष्टी ओळखण्यासाठीही वेगवेगळी टूल्स उपलब्ध आहेतच, हा भागही वेगळा.
 
‘एआय’चा वापर करून अनेक उद्योजकांनी आपल्या स्वतःची स्टार्टअप्सही सुरू केली. दैनंदिन व्यवहारात लागणार्‍या ई-मेल्स, फोटो एडिट, व्हिडिओ एडिट्ससह अन्य प्रकारच्या सर्वच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. वृत्तपत्रांतही आता ‘एआय’वर आधारित फोटो सर्रास प्रकाशित केले जातात. पण, मग त्यामुळे छायाचित्रकारांच्या नोकर्‍या गेल्या का? तर नाही. उलट ‘एआय’वर काम करणार्‍या व्यक्तीलाही वृत्तपत्रांसह, चॅनलमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. हाच बदल आगामी दहा वर्षांत पाहायला मिळणार आहे.
 
भारतातील कित्येक छोटेखानी उद्योगही हळूहळू हे तंत्रज्ञान आत्मसात करू लागतील. ग्राफिक डिझायनरपासून ते कोडिंगपर्यंत ‘एआय’चे जग व्यापले आहे. आज इंटरनेट हा सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनला, तसा तो ‘एआय’ही बनणार आहे. सुरुवातीला काही व्हिडिओ क्रिएटर किंवा डिजिटल आशयनिर्मिती करणार्‍यांपासून टेक्नोसेव्हींनी याचा वापर केला. मात्र, भविष्यात प्रत्येकजण याचा भाग असेल. या संधीचे सोने कसे करता येईल आणि त्याला कल्पकतेची जोड कशी देता येईल, याचा विचार आता सृजनशील वापरकर्त्यांवर आहेच. शिवाय, तो उद्यमींनाही करायचा आहे.
 
याचा प्रत्यय नेहमी सोशल मीडियाद्वारे येतच असतो. ‘एआय’च्या वापराद्वारे बनवलेला सिनेमा असो, गाणी असो वा रिल्सचा महापूर आहे. याला जे व्यावसायिक जोड देतील आणि त्याचे मार्केटिंग जमेल, त्यांनाच हा खेळ खेळता येईल. ज्याप्रकारे संगणकयुग अवतरल्यानंतर हॅकर्सना रोखण्यासाठी एक मोठी व्यवस्था उभी राहिली, त्याचप्रकारे ‘एआय’साठीही मोठी शासकीय आणि खासगी क्षेत्रात अर्थव्यवस्था उभी राहील, हेही तितकेच खरे. साहजिकच हे दुधारी शस्त्र म्हणूनच काम करणारे आहे.
 
याचेच एक गमतीशीर उदाहरण म्हणजे नुकताच व्हायरल झालेला एक व्हिडिओ. शांघायच्या शोरूममध्ये एका छोट्याशा रोबोटने तब्बल 12 रोबोटना किडनॅप केल्याचा दावा या व्हिडिओत करण्यात आला होता. कंपनीनेही ही चूक मान्य केली आणि याबद्दल सुधारणा सुरू असल्याचेही सांगितले. अशा अनेक गमतीदार गोष्टीही येत्या काळात पाहायला मिळतील. पण, ‘एआय’चे विश्वही भारतामुळे अधिक समृद्ध होईल, हा विश्वासही पुढच्या वाटचालीसाठी आशादायक आहे.

तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक. 

अग्रलेख
जरुर वाचा
सैफुल्लाहनंतर पाकिस्तानात आणखी एका दहशतवाद्यावर अज्ञातांकडून हल्ला!

सैफुल्लाहनंतर पाकिस्तानात आणखी एका दहशतवाद्यावर अज्ञातांकडून हल्ला!

(Lashkar-e-Taiba co-founder Amir Hamza) दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा सह-संस्थापक दहशतवादी आमिर हमजावर लाहोरमध्ये अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. या हल्ल्यात हमजा गंभीर जखमी झाला आहे. यानंतर त्याला उपचारांसाठी पाकिस्तानच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन सिंदूर' राबवून १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अशातच आता अज्ञातांच्या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आमिर हमजा जखमी झाल्याची बातमी समोर ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121