मराठी नाटक असो की चित्रपट, आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकेत झोकून देत प्रेक्षकांचे मन जिंकणार्या कलावंतांपैकी एक लक्षवेधी अभिनेता ठरलेल्या धनंजय सरदेशपांडे या कलावंताचा प्रवास...
बालरंगभूमीपासून आपल्या अभिनयाचा श्रीगणेशा केलेले कलावंत म्हणजे धनंजय सरदेशपांडे. वैविध्यपूर्ण भूमिका साकारत या कलावंताने आजघडीला स्वतःचा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. आजघडीला प्रायोगिक रंगभूमी, व्यावसायिक नाटक, चित्रपट आणि अलीकडे उदयास आलेल्या वेबसीरिजमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारत, आपल्या अभिनयाचा आलेख सातत्याने चढता ठेवण्यात धनंजय सरदेशपांडे यशस्वी ठरले आहेत. लेखक, दिग्दर्शक, अभिवाचक, अभिनेता अशा विविधांगी भूमिका अगदी लीलया निभावत हा कलावंत कलाक्षेत्रात कार्यरत आहे.
बहुगुणी आणि हरहुन्नरी रंगकर्मी म्हणून ओळखला जाणारा हा कलावंत नाटक असो, मालिका असो की चित्रपट, आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकेशी खर्या अर्थाने समरस होतो. परंतु, त्यापलीकडे जाऊन त्या-त्या भूमिकेवर स्वतःची छाप पाडण्यातही यशस्वी होतो. लहान मुलांच्या नाटकात हा कलावंत जितका रमतो, तितकाच मोठ्यांच्या नाटकातील भूमिकेलाही पुरेपूर न्याय देतो. याव्यतिरिक्त मालिका तसेच चित्रपटातील त्याच्या भूमिकेलाही प्रेक्षक उत्स्फूर्त दाद देतात. हा कलावंत नुसताच अभिनय करीत नाही, तर तो उत्तम लेखक आहे, कल्पक दिग्दर्शक आहे, प्रभावी अभिवाचक आहे. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या कलावंताच्या अभिनयाचा श्रीगणेशा मराठवाड्यातील सेलू या गावापासून झाला.
लहानपणी शाळेत असल्यापासूनच धनंजय यांचे मन कलेकडे आपसुकच ओढले गेले. विशेषतः अभिनयाकडे त्याचा ओढा होता. त्यातूनच पुढे शालेय जीवनात त्याला बालनाट्यात छोट्या-मोठ्या स्वरुपातील भूमिका साकारण्याची संधीही मिळाली. शालेय शिक्षण पूर्ण करुन छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास आल्यावर धनंजय यांनी आपल्या अभिनय कौशल्यावर लक्ष केंद्रित केले. त्याची सुरुवात बालरंगभूमीपासून केली. स्वतः बालनाट्य लिहून, दिग्दर्शित करुन अभिनयासह त्यांचे सादरीकरण करण्यात धनंजय यांचा हातखंडा होता. या कामी त्यांना रमाकांत मुळे या मित्राची उत्तम साथ लाभली. या दोघांच्या नाटकांना बच्चेकंपनीकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. नुसतेच नाट्यप्रयोग न करता, लहान मुलांसाठी धनंजय, त्यांचा मित्र रमाकांत मुळे आणि सहकार्यांनी मिळून दरवर्षी दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत बालनाट्य शिबिराचे आयोजन करुन बालकलाकारांना घडवण्याचेही काम केलेले आहे.
त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये धनंजय यांच्या अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन कलेला खर्या अर्थाने धुमारे फुटले. ‘स्नेहांकित’ या संस्थेच्या माध्यमातून धनंजय यांनी मराठवाड्यातील बालनाट्य चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे आणि आता गेल्या काही वर्षांपासून पुणे येथील वास्तव्यात त्यांच्यातील कलावंताच्या कक्षा दिवसेंदिवस विस्तारत चालल्या आहेत, कलेचा परीघही मोठा होत चालला आहे. नाटक, मालिका, चित्रपट, वेबसीरिज, अभिवाचन, बालनाट्य शिबीर अशा विविध स्तरांवरील कलाविष्काराने त्यांच्या कारकिर्दीचा आलेख उंचावत चालला आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘मुंजा’, त्याआधी ‘झोंबिवली’, ‘तुकाराम’, ‘तमाशा लाईव्ह’, ‘सलाम’, ‘ लेथ जोशी’ या काही चित्रपटांत धनंजय यांनी आपल्या भूमिकेतील वेगळेपण जपले, तर ‘चंद्रविलास’, ‘कट्टी बट्टी’, ‘शांतीत क्रांती’ या मालिकांमधील धनंजय यांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या आहेत. चंद्रकांत कुलकर्णी यांच्या ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकासोबतच धनंजय यांनी स्वतः लिहिलेले ‘संगीत दहन आख्यान’ हे प्रायोगिक नाटक आणि ‘फारच टोचलंय’ या एकपात्री प्रयोगाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ तसेच ‘सोनी लाईव्ह’वर नुकत्याच पुनर्प्रक्षेपित होत असलेल्या ‘पोस्ट ऑफिस उघडे आहे’ या मालिकेतील धनंजय यांनी साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली. ‘बोल बोल राणी’ आणि ‘गारुड’ हे दोन चित्रपट नुकतेच धनंजय यांनी हातावेगळे केले असून, त्यांपैकी ‘गारुड’ हा त्यांची भूमिका असलेला चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होत आहे. ‘अलबेला आलम’ या हिंदी चित्रपटाही धनंजय यांची महत्त्वाची भूमिका असून, सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. शिवाय ‘पारु’ हा त्यांची भूमिका असलेला आणखी एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चंद्रकांत कुलकर्णी यांच्या ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकातील भूमिकेद्वारे धनंजय यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. चित्रपटांप्रमाणेच रंगभूमीवरही व्यस्त असलेला हा कलावंत सध्या ‘खुपसा डायरीज’ या वेबसीरिजच्या लिखाणात व्यस्त आहे.
अशा या हरहुन्नरी रंगकर्मीची आतापर्यंतची कारकीर्द लक्षात घेता, अनेक संस्थांनी विविध पुरस्कारांनी धनंजय यांचा मानसन्मान केला आहे. ‘सृजन स्नेही, पुणे’ या संस्थेच्यावतीने सीमा मोघे स्मृतिप्रीत्यर्थ नुकताच यंदाचा ‘कलासन्मान पुरस्कार’ धनंजय यांना प्रदान करुन त्यांच्यातील कलागुणांना पोचपावती दिली आहे. अशा या गुणी कलावंताला भावी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा.
अतुल तांदळीकर