नवी दिल्ली : भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, त्यांच्या पथकाला संभल जामा मशिदीतही ( Sambhal Masjid ) प्रवेश देण्यात आला नाही. या मशिदीच्या संवर्धनाची आणि देखभालीची जबाबदारी १९२० पासून एएसआयकडे असली तरी बऱ्याच दिवसांपासून एएसआयला मशिदीत जाण्यापासून रोखले जात आहे. त्यामुळे त्याच्या सध्याच्या स्वरूपाची माहिती एएसआयकडे नसल्याचे सांगण्यात आले आहे.
एएसआयच्या म्हणण्यानुसार, वेळोवेळी जेव्हा एएसआय पथक या हेरिटेज मशिदीची पाहणी करायला जायची तेव्हा लोक आक्षेप घेत आणि पुढे जाण्यापासून रोखायचे. त्यामुळे मशिदीच्या आवारात मनमानी पद्धतीने सुरू असलेल्या बांधकामाबाबत एएसआयला कोणतीही माहिती नाही. एएसआयने 1998 मध्ये या मशिदीला भेट दिली होती. या वर्षी जूनमध्ये स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने एएसआय अधिकाऱ्यांचे पथक शेवटच्या वेळी मशिदीत प्रवेश करू शकले होते.
त्यावेळी मशिदीच्या इमारतीत काही अतिरिक्त बांधकाम सुरू असल्याचे एएसआयच्या लक्षात आले. मशिदीच्या परिसरात प्राचीन इमारती आणि पुरातत्व अवशेषांचे संरक्षण कायदा 1958 च्या तरतुदींचे घोर उल्लंघन होत असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले आहे. या हेरिटेज मशिदीमध्ये बेकायदा बांधकाम करणाऱ्यांना एएसआयने कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.