प्रतिभावंत कवी

    25-Nov-2024
Total Views | 59
baban saradkar


शेतीशी आणि मातीशी नाळ जोडललेे कवी, सुगम गायक असलेल्या विदर्भातील बबन सराडकर यांच्याविषयी...

कवीच्या प्रतिभेला प्रयत्नांची जोड मिळाली की, त्याच्या हातून लिहिल्या जाणार्‍या कवितांनी साहित्यविश्व अधिकाधिक समृद्ध होत जाते. मराठी साहित्यविश्वाला आपल्या कवितांनी समृद्ध करणार्‍या अशाच कवींपैकी एक म्हणजे कवी बबन सराडकर. बबन सराडकर यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबात झाला. जन्मापासूनच त्यांची नाळ शेतीशी आणि मातीशी जोडली गेली होती. फारशी अक्षरओळखही नसणार्‍या कुटुंबात जन्म झालेला असतानाही, बबन सराडकर यांना काव्याची गोडी लागली, ती लहानपणी त्यांनी ऐकलेल्या भजनांमुळे. वयाच्या साधारण 13व्या-14व्या वर्षी बबन सराडकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भजन ऐकले. त्या भजनांनी त्यांना खूप प्रभावित केले. ती भजने, त्यातले शब्द आणि त्यांच्या चालींनी बबन यांच्या मनात खोलवर घर केले. लोकवाङ्मय हे पुस्तकी वाङ्मयापेक्षा अधिक समृद्ध असते, असे अनेकदा म्हटले जाते.

बबन सराडकर यांच्यासारखी लोकवाङ्मयाचे बोट धरून साहित्याचा समृद्ध धडा गिरवणारी उदाहरणे पाहिली, की हे विधान सार्थ वाटू लागते. तुकडोजी महाराजांच्या भजनांमुळे बबन सराडकर ‘काव्य’ या साहित्यप्रकाराशी जोडले गेले आणि तेव्हापासून एक साहित्यिक म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. ती भजने ऐकून ते स्वतःसुद्धा भजने लिहू लागले आणि लोकांना ऐकवू लागले. लोकांना त्यांनी लिहिलेली आणि गायलेली भजने आवडू लागली. भजने लिहिता लिहिता त्यांनी गाणी लिहायला सुरुवात केली आणि मग भजने, गाणी असा प्रवास करत करत ते कवितेकडे वळले. महाविद्यालयात प्रवेश केल्यावर अनेक कवींच्या कविता त्यांनी वाचून काढल्या. त्यातूनच उदयाला आला ‘चंद्रबन’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. त्यांच्या या पहिल्या कवितासंग्रहालाच राज्य शासनाचा ‘केशवसुत पुरस्कार’ प्राप्त झाला. त्यांचा हा कवितासंग्रह काही काळ ‘एम.ए.’च्या अभ्यासक्रमातसुद्धा समाविष्ट करण्यात आला होता. या संग्रहाने त्यांना मराठी साहित्यविश्वात खरी ओळख मिळवून दिली.

आतापर्यंत बबन सराडकर यांचे ‘चंद्रबन’सोबतच ‘समुद्रपक्षी’, ‘कृष्णविवर’, ‘तू माझा सांगाती’, ‘हंबर’, ‘पापणपालखी’ आणि ‘आवरसावर’ हे सात काव्यसंग्रह आणि एक गीतसंग्रह प्रकाशित झाले आहेत. कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, शिरीष पै, यशवंत देव, मधुकर केचे, हृदयनाथ मंगेशकर, डॉ. आशा सावदेकर आणि राम शेवाळकर यांसारख्या साहित्य आणि कलाविश्वातील दिग्गजांनी बबन सराडकर यांच्या पुस्तकांना प्रस्तावना दिली आणि त्यांच्या लेखणीचे कौतुक केले. ज्या कवींच्या कविता वाचून बबन सराडकर यांनी कविता लिहायला सुरुवात केली, त्या कवींकडून आपल्या पुस्तकाला प्रस्तावना लिहून घेण्याचे भाग्य बबन यांना मिळाले.

त्यांच्या कविता फक्त काव्यसंग्रहापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत, तर ‘बी.ए.’ आणि ‘एम.ए.’ स्तरावर मराठी भाषेचे आणि साहित्याचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांपर्यंत त्या पोहोचल्या. राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये मराठी साहित्याच्या अभ्यासक्रमात त्यांच्या काही कवितांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या कवितांवर चार विद्यार्थ्यांनी ‘एम.फिल.’ केले असून एका विद्यार्थिनीने त्यांच्या कवितांवर ‘बबन सराडकर यांच्या कवितांचा चिकित्सक अभ्यास’ हा विषय घेऊन शोधनिबंध पूर्ण करून ‘पीएच.डी.’ पूर्ण केली आहे. बबन सराडकर यांच्या कविता आजवर अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या आहेत. सोबतच अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’मध्ये त्यांनी अनेकदा सहभाग नोंदविला आहे.

लिखाणकला जपत असतानाच, बबन सराडकर यांनी त्यांच्या गायनकलेलाही अंतर दिले नाही. कविता आणि गीते लिहिण्यासोबतच त्यांनी ती गायलीसुद्धा. लिहिणारा हात आणि गाणारा गळा या दोन्ही गोष्टींचे एकत्र वरदान असणारे कलाकार खूप कमी असतात. बबन सराडकर हे त्यांच्यापैकीच एक आहेत. नागपूर आकाशवाणी केंद्रावर त्यांची मान्यताप्राप्त कवी आणि मान्यताप्राप्त सुगम गायक म्हणून निवड करण्यात आली होती. आकाशवाणी केंद्रावरून वेळोवेळी त्यांच्या काव्यगायनाचे आणि गीतगायनाचे प्रसारण होते. ‘मी आणि माझी कविता’ या विषयावर त्यांचे अनेक ठिकाणी व्याख्यान आणि काव्यगायनाचे कार्यक्रमही होतात.

आजवर अनेक नियतकालिकांमधून बबन सराडकर यांच्या कविता छापून आल्या आहेत. काही दैनिकांमध्ये त्यांनी स्वतः सदरलेखनसुद्धा केलेले आहे. त्यांनी काही वर्षे त्यांचे स्वतःचे ‘विदर्भ जागरण’ हे साप्ताहिकसुद्धा सुरू केले होते आणि त्याच्या संपादनाची जबाबदारीसुद्धा सांभाळली होती. अमरावती येथे शासकीय महाविद्यालयाच्या संगीत विभागात त्यांनी काही काळ नोकरीही केली होती. या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांची शेतीशी आणि मातीशी जोडली गेलेली नाळ कधीही तुटली नाही. शेती करता करता आपली कला त्यांनी जोपासली. अनेक वर्षांपासून कविता लिहित असल्यामुळे कविता या वाङ्मयप्रकारात झालेली अनेक स्थित्यंतरे बबन सराडकर यांनी जवळून अनुभवलेली आहेत.

समाजमाध्यमांमुळे कवितांचा दर्जा हल्ली घसरत चालला आहे, ही सल त्यांच्या मनाला कायम त्रास देते. पण, तरीही अस्सल आणि दर्जदार कविता लिहिणे त्यांनी थांबवलेले नाही. अशा या प्रतिभावंत कवीला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

दिपाली कानसे 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121