मूळचा जर्मन नागरिक असलेला, मात्र अमेरिकेत स्थायिक झालेल्या जमशिद शर्महाद याला नुकताच इराणने मृत्युदंड दिला. जर्मनीच्या विदेशमंत्री अन्नालेना बेरबॉक यांनी त्यावर म्हटले की, “याचे गंभीर परिणाम इराणला भोगावे लागतील.” जमशिद शर्महादवर इराण सरकारने हिंसेचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते.
पण, शर्महाद याने या सगळ्या आरोपांना नाकारले. त्याने म्हटले होते की, तो कोणत्याच हिंसेमध्ये सामील नव्हता, ना इराणविरोधातल्या दहशतवादामध्ये त्याचा सहभाग होता. मग इराण सरकारच्या मते त्याचा गुन्हा तरी काय होता? तर, 2008 साली शिराज येथील होसेनिह सैय्यद अल-शोहदा मशिदीवर झालेला बॉम्बस्फोट आणि 2010 साली तेहरान येथे रुहोल्ला खोमेनीच्या मकबर्यावर झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी ‘किंग्डम असेम्बली ऑफ इराण’ या संघटनेने घेतली. या संघटनेवर इराणमध्ये बंदी आहे.
संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतल्यानंतरही इराणने शर्महाद यालाच गुन्हेगार मानले. कारण, या संघटनेचे संकेतस्थळ शर्महाद चालवत असे. ‘किंग्डम असेम्बली ऑफ इराण’ म्हणजे ‘अंजोमन-ए पदेशही-ये इराण.’ इस्लामपूर्वी जी संस्कृती, जी राज्यव्यवस्था इराणमध्ये होती, तीच पुन्हा तिथे प्रस्थापित करण्याचा चंग या संघटनेने बांधला आहे. अर्थात, सध्याच्या कट्टर इस्लामिक इराणमध्ये हे एक दिवास्वप्नच. मात्र, हे स्वप्न घेऊन ही संघटना इराणमध्ये सातत्याने संघर्ष करत असते. इराणवर हल्ले करत असते. या संघटनेने त्यांची संकल्पनाही स्पष्ट केली आहे. ती संकल्पना आहे, इराणमधून इस्लामिक सत्ता हद्दपार करणे. इराणची मूळ संस्कृती खूपच मानवातावादी आणि समृद्ध होती. सध्या इराणमध्ये असलेला इस्लाम हा परकीय धर्म असून, इराणमधील सर्व समस्यांचे मूळ देशातून आलेला इस्लाम आहे. असे या संघटनेचे मुख्य विचार आहेत. आता ही संकल्पना इराणमध्ये काय जगभरातल्या कोणत्याही मुस्लिमांच्या दृष्टीने भयंकर म्हणजे अती भयंकर गुन्हाच आहे. त्यातच या संघटनेच्या मते, सध्याच्या इस्लामिक इराणच्या सरकार प्रशासनाशी संबधित प्रत्येक व्यक्ती आणि संघटना ही शत्रू आहे.
जगभरातील घडामोडी पाहिल्या की जाणवते, इराण जगात स्वत:ची प्रतिमा कट्टर आणि इस्लामचा अनुयायी देश म्हणून सातत्याने दाखवतो. नव्हे जगात इराणची ओळख अशीच आहे. त्यामुळे इराणने या संघटनेवर बंदी आणली. या संघटनेची पार्श्वभूमी पाहू. दहशतवादी संघटना घोषित होण्यापूर्वी सुरूवातीला ही संघटना लंडन येथे ‘योर टिव्ही’ नावाची उपग्रह वाहिनी चालवायची. 2008 साली या वाहिनीचे प्रसारण बंद झाले. त्यानंतर या संघटनेने लॉस एंजेलिस येथून रेडिओ आणि दूरचित्रवाणी प्रसारण सुरू केले. त्याचे नाव होते ’रेडिओ टोंडर.’ या संघटनेचे सदस्य कोण कोण आणि किती आहेत याबद्दल फारशी माहिती नाही. मात्र, 2010 साली या संघटनेने जाहीर केले होते की, त्यांचे अमेरिकेमध्ये एक लाख सदस्य आहेत.
या संघटनेच्या दहशतवादाबद्दल 2020 साली इराणच्या गुप्तचर यंत्रणेने इराण प्रशासनाकडे अहवाल सोपवला होता. त्यात म्हटले होते की, या संघटनेने इराणवर 27 हल्ले करण्याची योजना आखली होती. यातूनच पुढे मग इराणने शर्महाद याला अटक केली. शर्महाद हा त्याच्या कामानिमित्त जुलै 2020 साली अमेरिकेतून भारतात येत होता. कोरोनामुळे विमानांचा मार्ग बदलला आणि त्यावेळी त्याला दुबईला थांबावे लागले. तेव्हा त्याच्या कुटुंबाशी त्याने संपर्क साधला होता. मात्र, त्यानंतर त्याचा संपर्क तुटला. दोन दिवसांनी इराणने जाहीर केले की, भ्रष्टाचार आणि हिंसेच्या गुन्ह्याखाली त्यांनी जमशिद शर्महादला ताब्यात घेतले आहे. ‘एमनेस्टी इंटरनॅशनल’ने त्याच्या अटकेचा मागोवा घेतला आणि अहवाल जाहीर केला.
त्यानुसार इराण सरकारने शर्महादसाठी वकील नियुक्त केला होता. पण, तो नावाला होता. त्याने शर्महाद यांच्या कुटुंबीयांकडे अडीच लाख अमेरिकन डॉलर्स मागितले होते. तसेच, शर्महाद याचे कोणतेही म्हणणे इराण सरकारने ऐकून घेतले नाही. असाही आरोप या अहवालात करण्यात आला. अर्थात, इराणने याआधीही निर्वासित पत्रकार रुहोल्ला आणि इराणी-स्वीडिश असे दुहेरी नागरिकत्व असलेल्या फराजोल्लाह चाअबला फाशी दिली होती. काहीही असो, इस्लाममय होण्याआधीचा इराण पुन्हा निर्माण करण्याचे ध्येय असलेल्या ‘किंडम असेम्बली ऑफ इराण’ यानिमित्ताने जगाच्या व्यासपीठावर आला हे मात्र नक्की.
9594969638