अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस येतो. हा दिवस दिवाळी पाडवा म्हणूनही साजरा केला जातो. नवविवाहित दाम्पत्यांसाठी, व्यापाऱ्यांसाठी आणि ग्राहकांसाठी हा दिवस खूप महत्वाचा असतो. पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. 'इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो', अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. बलिप्रतिपदा किंवा दीपावली पाडवा हा दिवस खूप शुभ मानला जातो कारण हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असतो.
अश्विन अमावास्येला करण्यात येणाऱ्या लक्ष्मीपूजनानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडव किंवा बलिप्रतिपदा येते. हा दिवस व्यापाऱ्यांसाठी नववर्षासारखा असतो. या दिवशी व्यापारी त्यांच्या जमा-खर्चाच्या नव्या वह्या तयार करतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी वर्ग नववर्षाचा प्रारंभ करतात. नवीन वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून व्यापारी त्यांची पूजा करतात. चांगला मुहूर्त पाहून या दिवशी व्यापारी नवी वही तयार करतात.
“शनिवार २ नोव्हेंबर रोजी कार्तिक शुक्ल प्रतिपदा , बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा सण आहे. हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस आहे. या दिवशी मौल्यवान वस्तूची खरेदी करतात. तसेच शुभ कार्याचा प्रारंभ करतात. या दिवशी पत्नी पतीला ओवाळते आणि पती पत्नीला भेटवस्तू देतो. या दिवशी विक्रम संवत् २०८१ अनलनाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे. याच दिवशी महावीर जैन संवत् २५५१ चा प्रारंभ होत आहे. याच दिवशी अन्नकूट आणि गोवर्धन पूजा करावयाची आहे. या दिवशी सकाळी ८ वाजून ६ मिनिटे ते ९ वाजून ३१ मिनिटे शुभ, दुपारी १२ वाजून ३१ मिनिटे ते दुपारी १ वाजून ४६ मिनिटे चल, दुपारी १ वाजून ४७ मिनिटे ते ३ वाजून ११ मिनिटे लाभ किंवा दुपारी ३ वाजून १२ मिनिटे ते ४ वाजून ३६ मिनिटे अमृत चौघडीमध्ये वहीपूजन आणि वहीलेखन करावयास उत्तम मुहूर्त आहे.” असे पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले.