मुंबई (विशेष प्रतिनिधी) - रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसी परिसरात आढळलेल्या अडई बदकाच्या पिल्लांची त्यांच्या आई-वडिलांसोबत पुनर्भेट घडवण्यामध्ये वन्यजीव बचाव संस्थेच्या कार्यकर्त्यांना यश मिळाले (lesser whistling duck reunion). ही पिल्ले बेवारस अवस्थेत एमआयडीसी परिस्थितीत सापडली होती. (lesser whistling duck reunion)
शुक्रवार दि. २५ आॅक्टोबर रोजी धाटाव एमआयडीसी पोलीस ठाणे परिसरात अडई म्हणजेच lesser whistling duck या जातीच्या बदकाची दोन पिल्ले आढळून आली. त्यामुळे स्थानिक पोलीस पाटलांनी कोलाड येथील सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या सदस्यांना या घटनेची माहिती दिली. कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांना बेवारस अवस्थेत दोन पिल्ले दिसली. पिल्लांच्या मागावर कावळे असल्याने त्यांनी लागलीच पिल्लांना ताब्यात घेतले. त्यानंतर आजूबाजूच्या परिसरात या पिल्लांना जन्म देणाऱ्या नर आणि मादी बदकाचा शोध घेण्यात आला. परंतु त्यांचा शोध लागला नाही. काही वेळाने नर आणि मादी आकाशात उडताना दिसून आले. कार्यकर्त्यांनी पिल्लांना एका पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये ठेवून ज्या ठिकाणी त्यांचा अधिवास आहे अशा ठिकाणी नेण्यात आले. तब्बल चार तासांनी नर आणि मादी बाॅक्सजवळ येऊन त्या पिल्लांना आपल्या सोबत घेऊन गेले.