झाडे होता गुरु

    08-Jul-2025
Total Views |

झाड स्वतःच्या भूतकाळात जगते का, हे माहीत नाही, मात्र ते दुसर्‍याच्या भूतकाळातही जगत नाही, हे 100 टक्के आपण सांगू शकतो. गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर झाडांकडून माणसाने काय शिकावे, हे विशद करणारा हा लेख.

जैसा वृक्ष नेणे मान अपमान
तैसे ते सज्जन वर्तताती
येऊनियां पूजा प्राणि जे करिती
त्याचें सुख चित्तीं तया नाहीं

वृक्षांबद्दलचा संत नामदेवांचा हा अभंग झाडांचे चोख वर्णन करतो.
खरंच झाडे काय देतात? फळं-फूलं याही पलीकडे जाऊन ते काहीतरी देत असतात, असे मला एके दिवशी भल्या मोठ्या केळवडाच्या झाडाखाली बसल्यावर वाटले. आमचा एक नांदेडचा मित्र त्या केळवडाच्या खाली चौफेर पसरलेल्या बिया गोळा करत बसलेला. राधानगरीतल्या या 400-500 वर्षे जुन्या झाडाला क्षणभर टेकलो आणि विचार आला की, छत्रपती शिवाजी महाराज इथूनच खाली फोंड्यात उतरले असतील. या बहाद्दराने त्यांच्या घोड्यांचा टापांचा आवाज ऐकला असेल. पण त्याने तो साठवूनही ठेवला असेल का? माझ्यातले लहान मूल वेड्यासारखे त्याच्या खोडाला कान लावून बसले. टापा ऐकू नाही आल्या, पण दुसराच साक्षात्कार झाला. झाडे आपल्याला काय शिकवतात, या प्रश्नाचे उत्तर त्या केळवडाने पत्ते टाकल्यासारखे समोर टाकले.


दुःखाची साठवणूक

झाड वणव्यात सापडले की, त्यालाही आगीचे चटके बसतात. कुणी घाव घातला की, तिथे डिंक स्रवतो. कुणी फांदी तोडली की, तो भाग गाठसदृश भागात बदलतो. या सगळ्या विविध जखमा झाड आयुष्यभर त्याच्या पोटात साठवते. कापलेल्या झाडांच्या खोडात तुम्हाला हे चटके दिसतात. फर्निचर करताना फळ्यांना आलेल्या गाठी तासल्यावर दरवाजांना आपण त्याचे नक्षीकाम म्हणून वापरतो. इतके आत साठवूनदेखील झाड हे फळं-फूलं आणि प्राणवायू देतच राहते. या झाडाने 50 वर्षांपूर्वीच्या वणव्यात किंवा दुष्काळात काय सहन केले असेल, हे खोडावरून नाही लक्षात येत. मात्र, तेच झाड कापले की आपले म्हणणे घेऊन त्या जखमा समोर येतात.

आहाराचे गणित

झाडं आपल्याला आहाराचा विचार शिकवतात. झाडांचा समतोल आहार असतो, म्हणूनच इतके आजार ते हाताळू शकतात. समतोल आहार म्हणूनच त्यांच्या स्रवणार्‍या डिंकाचे इतके उपयोग असतात. याच समतोल आहारामुळे उष्ण, शीत, कटू असे त्यांचे स्वभावगुण आपल्यासाठी हिताचे बनले. मुळांमध्ये रोपाच्या वाढीच्या काळात किती अन्नसाठा करायचा म्हणजे कोरड्या काळातसुद्धा पाणी-अन्न रोपाला पुरेल, हेही झाडांचेच गणित ठरलेले असते. केवळ खनिजं आणि काही धातुतत्त्व घेऊन झाडं स्वतःचे पोषण करतात. त्यामुळेच ती निरोगी, कणखर, बहुपयोगी आणि समस्त सृष्टीचे पालनकर्ते असतात.

अवकाश जपणे

‘क्राऊन शायनेस’ हा झाडांबाबत असा प्रकार आहे की, उंच वाढलेली झाडे एकमेकांच्या कॅ नॉपी अबाधित ठेवतात. एकमेकांच्या पाने-फांद्यांची हद्द जपतात. पानांचे टोक किंवा कडांचा भाग हा याबाबत संवेदनशील असतो, असे मानले जाते. ते दुसर्‍या झाडाची पाने ओळखून कीड पसरू नये किंवा फांद्या वार्‍याने आपटू नयेत, म्हणून थोडे अंतर ठेवतात. पण झाडे हेच शिकवतात की, दुसर्‍यांच्या जागेत आपण हातच राखूनच जायला हवे. दुसर्‍याची गोपनीयता किंवा एकांत जपायला हवा. अर्थात त्याचवेळी महाकाय वेली, नेचे, आमरी या दुसर्‍यांची ’स्पेस’ जपणार्‍या महावृक्षांवर मात्र निवांत बागडत असतात. हे सहजीवनाचे सुंदर उदाहरणच म्हणावे लागेल.

झाडांचे सहजीवन

वृक्ष स्वार्थी नसतात, हे कोणीही सहज सांगेल. पण खरंच ते किती टोकाचे सहजीवन जगतात बरं! वृक्षाच्या डोलीत पक्ष्यांचा वास असतो. अंगावरून सापांचा मार्ग जातो. खोड सालीच्या बेचक्यात असंख्य किडे, कोळी अधिराज्य करतात. कित्येक प्राण्यांचा निवारा झाड बनते. कित्येकांची भूक शमवते. काही झाडं तर पाणी साठवून ठेवतात; तेही उपयोगी पडते. मुंग्यांच्या प्रजाती इथे राहतात. पानांचा गुंता करून घरे बनवतात. कित्येक पक्ष्यांची घरटी वृक्षांवर असतात. माणसासाठी तर अगणित वेळा झाडं आपले योगदान देतात. कुठल्या माशा येतात पानांना डंख करून त्यात अंडी ठेवतात. मधमाशा पोळी बांधतात. फुलांतला मध सेवन करायला कित्येकजण तिथे हेलपाटे घालतात. एखादा वनस्पती शास्त्रज्ञ येऊन त्याला नाव देतो किंवा आयुर्वेदाचा कोणीतरी कुणालातरी बरे करतो. एवढंच कदाचित त्या झाडाला भौतिकरित्या सुखावून जात असेल.

वर्तमानाची आस

सूड आणि अहंकारने भारालेल्या दुनियेत लहान मुले आणि झाडं हे दोनच सजीव झालेले सगळे विसरून जातात. झाडं काल आहेत, तशी आज राहात नाहीत. वर्षभरात पानं गळून पडतात. शिशिर ओलांडला की झाडे परिपूर्ण नवीकोरी होतात. पानगळीतून सगळा शीण घालवून त्यांना मोहक कोवळी पालवी पाहायची असते आणि नंतर फुलांची आरास करायची असते. झाडाची प्रत्येक पेशी, वहननलिका, सालीचा भाग सगळं पुन्हा नवं कोरं बनतं आणि झाड त्याचे अस्तित्व साजरे करायला मोकळे होते.

भावनांची जाण

झाडांना ताण जाणवतो. मुळांना लागलेला कातळ त्यांना फोडायचा असतो. झाडांना फूलं आणि नंतर फळं द्यायची असतात. त्यावेळी प्रसुतीला जितकी ऊर्जा लागते, तेवढीच ऊर्जा गोळा करून झाड ती फूल व फळाच्या विकासासाठी लावते. त्यात ते थकतं. यावेळी येणारे हूंकार आणि कण्हणं झाड सांगू शकत नाही, इतकंच! झाडांवर पाणी मिळवण्याचा ताण असतो. दुष्काळात पाणी जपून वापरायचे. तापमानवाढीचा फटका सगळ्यात आधी झाडांना बसायला चालू झाला आहे. उद्या आणखी तापमान वाढलं, तर परागीभवनाची प्रक्रियाच ठप्प होणार आहे. यासमोर आपला ताण तर खूपच किरकोळ आहे.

रोहन पाटील
(लेखक वनस्पती अभ्यासक आहेत.)