‘चेहरा’ कुपार्‍यांचा

    16-Sep-2023   
Total Views |
Article On Chehra Book Written Deepak Jevne

'कुपारी’ हे वसईजवळ राहणार्‍या एका समाजाचं नाव. वसईवर पोर्तुगिजांचा अंमल होता. तेव्हा या भागात मोठ्या प्रमाणावर धर्मांतर झाले व सर्वच समाजात ख्रिस्ती आणि हिंदू असे विभाजन झाले. ब्रिटिशांच्याही पूर्वी पोर्तुगीज राजवटीत हे धर्मांतर झाले असले, तरीही आपली सांस्कृतिक मूल्ये मात्र इथल्या समाजांनी जपली आहेत. यातलाच एक समाज म्हणजे सामवेदी ब्राह्मण समाज. त्यांच्यातून धर्मांतरित झालेले ते सामवेदी ख्रिस्ती, यांना ’कुपारी’ असे म्हणतात. मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असूनही शहरीकरणाचा फारसा परिणाम यांच्यावर झाला नाही आणि आपली संस्कृतीशी जोडलेली घट्ट नाळ, हीच या समाजाची ओळख आहे. यावर लिहिलेले हे पुस्तक.

पाठीशी खंबीर सह्याद्री, दोन्ही बाजूला दोन खाड्या. वैतरणा आणि उल्हास. एका बाजूने समुद्र. असं तीनही बाजूंना पाण्याने वेढून सह्याद्री कातळ कड्याच्या तळाशी असलेला उत्तर कोकणातला भूभाग म्हणजे वसई. अपरान्त. सुपीक काळी माती, मुबलक पाणी आणि भौगोलिकदृष्ट्या अत्यंत अनुकूल परिस्थिती असल्याने इथे अनेक समाज वास्तव्य करून आहेत. अनेक राज्यकर्त्यांनी ही जमीन आपली राजधानी म्हणून पाहिली. अहिनलवाडा पाटण येथून आलेला महिबिंब, पैठणहून आलेला प्रतापबिंब, मालोण्डेजवळ गढी करून राहिलेला भंडारी भोंगळे, त्यानंतर आले ते पोर्तुगीज अनेक. इथेच सोपारा बंदर होते, शंकरचार्‍यांचे पाय या भूमीला लागल्याने त्यांचे निर्मल देवस्थान आहे. या परिस्थितीत भारतात फार थोड्या भागात अस्तित्व असलेला सामवेदी ब्राह्मण समाज इथे आढळून येतो. पोर्तुगीज राज्याकर्त्यांच्या कालखंडात मोठ्या प्रमाणावर धर्मांतर झाले. धर्म बदलला; पण संस्कृती मात्र इथल्या स्थानिकांनी सोडली नाही. ही परंपरागत हिंदू संस्कृती अगदी आजवर जपली गेली आहे. यावर भाष्य करणारे दीपक जेवणे यांचे ’चेहरा’ हे पुस्तक.

पुस्तकात एकूण दहा पर्व लिहिली आहेत. धर्म पर्व, कीर्तन पर्व, संस्कार पर्व, शिक्षण पर्व, गृहस्थ पर्व, उद्योग पर्व, नवधर्म पर्व, संस्कृती पर्व, किल्ले वसई पर्व, भविष्यवेध पर्व आणि अखेरीस निरोप पर्व. पुस्तक प्रवास वर्णन लिहावे तसे लिहिले आहे. स्थानिकांसोबत झालेले सर्व संवाद जसेच्या तसे उतरवून काढले आहेत. परंतु, स्वतःच्या मताची सावली पुस्तकावर पडू नये, या उद्देशाने लिहिले असल्याने संवादलेखन गरजेचेच आहे, असे दिसते. पहिल्या प्रकरणात धर्मांतर प्रक्रिया कशी झाली, याचा आढावा घेतलेला दिसतो.

त्यानंतर उद्योग पर्व सुरू होतं. उद्योग म्हटल्यावर अर्थार्जन आलं. आज पैसे माणसाचं राहणीमान सांगतात, तेव्हा इथवर येताना आपल्याला बरीचशी संस्कृती समजलेली असते. दीपक यांनी सामवेदी समाजातील अनेकांशी संवाद साधून, भेटीगाठी घेऊन, बराचसा प्रवास करून, या समाजातील सण, उत्सव, मेळावे, धार्मिक विधी इत्यादींमध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन लेखक या निष्कर्षाप्रत पोहोचले आहेत की, वसईतील सामवेदी ब्राह्मण लोकांनी आपला धर्म बदलला. पण, आपली संस्कृती बदलली नाही. आपल्या मूळ प्राचीन भारतीय मूल्यांची आणि आपल्या पूर्वजांशी फारकत घेतली नाही आणि त्याबद्दल कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड या समाजात नाही. या समाजाचे आणखी एक वैशिष्ट्य असे आहे की, यांनी ख्रिश्चन धर्माचे आणि त्यातील उपासना पद्धतीचे एका अर्थाने भारतीयकरण केले आहे.

फादर निकोलस अल्मेडा या प्रातिनिधिक काल्पनिक पात्राची निर्मिती, त्यांच्याशी मारलेल्या गप्पा या पुस्तकातून दिसतात. अनेकांशी केलेला विचारविनिमय आणि चर्चा कोणत्या एका नावाने समोर याव्या, म्हणून शोधलेला हा सुवर्णमध्य असावा. संस्कृतीचा अभ्यास करून ती मांडायची म्हणजे काही महिन्यांचा किंवा वर्षांचा विषय नाही. संस्कृती आपल्या भाषेत, बोलीत, विचार करण्याच्या आणि मांडण्याच्या पद्धतीतही मुरलेली असते. लेखकाचा या संस्कृतीशी पूर्वसंबंध नसल्याने एक त्रयस्थ दृष्टिकोन सतत दिसत राहतो. ‘सामवेदी ब्राह्मण ख्रिश्चन’ असा उल्लेख बर्‍याच पानांवर वाचायला मिळाला. मुळात या समाजाला ‘कुपारी’ किंवा ‘कादोडी’ (कादोडी ही त्यांची बोली भाषा आहे) या नावाने ओळखले जाते. ही नावे नवखी नाहीत, तर सुप्रचलित आहेत.

या समाजची तुलना लेखकाने बर्‍याचदा सामवेदी ब्राह्मण समाजाशी केली आहे. मात्र, त्यांच्यातील सांस्कृतिक भिन्नता दाखवलेली नाही. ती दाखवली असती, तर धर्मांतरानंतर बदललेल्या आणि काही टिकून राहिलेल्या रितीभाती, परंपरा यांचा उत्तम उहापोह झाला असता. तसेच सांस्कृतिक मंथन झाले असते. आज इथल्या समाजाशी यांचा बेटी व्यवहार नसला, तरीही रोटी व्यवहार काही प्रमाणात पुन्हा सुरू झालेला आहे. तेव्हा खाद्यसंस्कृतीवर विस्तृत लिखाण झाले असते, तर किंचित बदल करून टिकून राहिलेल्या हिंदू पद्धती दिसून आल्या असत्या. ‘मोरयाचा लाडू’ म्हणून एक प्रसिद्ध पदार्थ या समाजात बनवला जातो. हा लाडू म्हणजे दुसरे-तिसरे काही नाही, तर आपला मोदकच. केवळ तांदूळ पीठाच्या उकडी तर नारळाच्या सारणाएवजी चिकन, मासे किंवा कधी मिश्र भाज्यांचे सारण वापरले जाते. हा मोदकापेक्षा मोमो या तिबेटी पदार्थाशी जास्त संबंध दाखवतो. परंतु, त्या लाडूला ’मोरयाचा लाडू’ म्हणतात. हेही दुर्लक्षित करण्याजोगे नाही.

वसईचा किल्ला, गोपालन, स्थानिक हिंदू मंदिरांसाठी ख्रिस्ती बांधवांनी बनवलेले दरवाजे आणि इतर पुस्तकातील गोष्टी वाचून इथल्या समाजात धार्मिक तेढ बिलकुल नाही, मात्र सांस्कृतिक जिव्हाळा आहे, ही गोष्ट स्पष्ट होते. जगाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने हे चित्र नक्कीच आश्वासक आहे.

पुस्तकाचे नाव :चेहरा
लेखकाचे नाव : दीपक हनुमंत जेवणे
प्रकाशक : विवेक प्रकाशन (हिंदुस्थान प्रकाशन संस्था)
पृष्ठसंख्या : २१६
किंमत : ३०० रु.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.