गिर्यारोहणाची ‘आनंद’यात्रा

    15-Sep-2023   
Total Views |
Anand Bansode


मणक्याचा आजार, बोलण्यातील शारीरिक व्यंग अशा अनंत अडचणींवर मात करीत त्यांनी जगण्यातला आनंद शोधला आणि इतरांनाही दिला. जाणून घेऊया गिर्यारोहक आनंद बनसोडे यांच्याविषयी...


गिर्यारोहक आनंद अशोक बनसोडे यांनी नुकतेच आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर ‘माऊंट किलीमांजारो’ दुसर्‍यांदा सर करून नवा इतिहास रचला. यापूर्वी २०२१ मध्ये युरोपातील सर्वोच्च शिखर ‘माऊंट एलब्रूस’देखील त्यांनी दुसर्‍यांदा सर केले होते. ‘माऊंट किलीमांजारो’, ‘माऊंट एलब्रूस’ ही शिखरे दोन वेळा सर करणारे आनंद हे महाराष्ट्रातील पहिलेच गिर्यारोहक ठरले आहेत. त्यांच्या या यशाला संघर्षाबरोबरच प्रेरणादायी प्रवासाचीदेखील किनार आहे.सोलापुरात जन्मलेल्या आनंद यांचे बालपण हलाखीतच गेले. इयत्ता नववी अनुत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी पुन्हा जोमाने अभ्यास करीत शिक्षण सुरू ठेवले. सध्या ते एमएससी, एमफिल असून पीएचडीसाठी प्रयत्न करीत आहे. दरम्यान, २०१५ साली आनंद अंथरुणाला खिळला.

आनंद आता चालूही शकणार नाही. अंथरुणाला खिळलेला आनंद रोजच्या जगण्यासाठी धडपडतोय, अशा मथळ्यांच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. राज्यासह देशभरातून हळहळ व्यक्त गेली होती. चार खंडातील चार सर्वोच्च शिखरे सर करणारा विक्रमवीर, जगातील चार खंडातील सर्वोच्च शिखरावर गिटार या वाद्याने राष्ट्रगीत वाजवून विक्रम करणारा, प्रत्येक मोहिमेनंतर सोलापूरकरांनी व संपूर्ण भारताने अभिमानाने मिरवलेल्या यशाचा शेवट आयुष्यभर अंथरुणात पडून होईल, याची त्यावेळी कोणी कल्पनाही केली नव्हती. त्याच अवस्थेत आनंद यांची प्रेयसी (आताची बायको) अक्षया यांनी आनंदसोबत लग्न करण्याचे धाडस दाखवले.लग्नही अगदी साधेपणाने म्हणजे एका अनाथालयात भारताच्या संविधानाची प्रस्तावना वाचून पार पडले.

लग्नानंतर आजारपण, आर्थिक अडचणींनी आनंद यांना घेरले. २०१५ ते २०१७ ही वर्षे कष्टप्रद गेली. फिजियोथेरपी व विविध उपचारांमुळे सावकाश चालता येत असले, तरी गिर्यारोहण मात्र दूरची गोष्ट होती. आनंद यांचे वजनही ९५ ते ९७ किलोवर गेले. २०१७ साली पुन्हा एकदा सुरुवात करून आनंद यांनी ‘३६० एक्सप्लोरर’ या साहसी खेळ आयोजित करणार्‍या कंपनीची सुरुवात केली. अल्पावधीतच आफ्रिका, युरोप, नेपाळ, महाराष्ट्रात अनेक साहसी मोहिमा ‘३६० एक्सप्लोरर’मार्फत आयोजित करण्यात आल्या. ‘३६० एक्सप्लोरर’मार्फत गिर्यारोहणातील अनेकांची स्वप्ने पूर्ण करीत नियोजनबद्ध मोहिमा आयोजित करणारे आनंद बनसोडे यांची भारतासह परदेशातही ओळख निर्माण झाली. “पण, २०१५ साली झालेल्या मणक्याच्या आजाराने स्वतःच्या शारीरिक भीतीवर मात करणे अवघड होते.

गेली अनेक वर्षे मला रात्री-अपरात्री स्वप्न पडायची की, पुन्हा माझा मणका तुटला आहे आणि मी खाली कोसळलो आहे. मणक्याबाबत माझ्या मनात एक अंतर्गत भीती होती, त्यावर मात करणे गरजेचे होते,” असे आनंद सांगतात. मार्च २०२० मध्ये कोरोना काळात ‘लॉकडाऊन’मध्ये घरातच फिजियोथेरपी, व्यायाम, विपश्यना याचा आधार घेत त्यांनी मणक्याच्या या भीतीवर मात करण्यास सुरुवात केली. वजनही कमी केले. सुरुवातीला अगदी हातावर थांबण्यापासून ते एक जोर मारण्यापर्यंत यश मिळवले. हळूहळू या भीतीवर पूर्णपणे मात करीत आनंद त्यातून बाहेर पडले. दि. १७ ऑगस्ट २०२१ रोजी तो सुवर्णक्षण उगवलाच. युरोपातील सर्वोच्च शिखर ‘माऊंट एलब्रूस’ (रशिया) सर करणारे ते प्रथम महाराष्ट्रीयन ठरले. यानंतर २०२३च्या सप्टेंबरमध्ये आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर ‘माऊंट किलीमांजारो’ दुसर्‍या वेळेस सर करून त्यांनी इतिहास घडवला. ही दोन्ही शिखरे दोन वेळा सर करणारे ते पहिलेच मराठी व्यक्ती आहेत.

आनंद यांचे हे यश फक्त गिर्यारोहणापुरतेच मर्यादित नाही. प्रेरणादायी वक्ता व लेखक असलेल्या आनंद यांच्या बोलण्यात एकेकाळी दोष होता. त्यावर मात करीत ते प्रेरणादायी वक्ता व प्रशिक्षक बनले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयातही त्यांनी ११० देशांसमोर भाषण केले. एकेकाळी नववी नापास झालेल्या आनंद यांच्या आयुष्यावर इयत्ता नववीच्याच हिंदी प्रथमच भाषेच्या पाठ्यपुस्तकात एक धडा आहे. व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील साहसी कंपनी सुरू केली व महाराष्ट्रातील सर्वात यशस्वी ’बिझनेस कोच’ म्हणून ओळख निर्माण केली. आनंद यांनी आतापर्यंत पाच पुस्तके लिहिली असून, २०१९च्या ‘झी युवा साहित्य सन्मान पुरस्कारा’चेही ते मानकरी ठरले. संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांवर काम करीत अनेक सामाजिक उपक्रमांत त्यांनी सहभाग नोंदवला आहे. आनंद ‘लाईफ कोच’ म्हणूनही काम करतात.

चार खंडातील सर्वोच्च शिखरावर गिटारने भारताचे राष्ट्रगीत वाजवणारे एकमेव व्यक्ती म्हणून त्यांच्या नावे ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’, ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’, ‘हाय रेंज बुक ऑफ रेकॉर्ड’ असे अनेक रेकॉर्ड त्यांच्या नावावर अंकित आहेत.“माझा प्रवास सुरूच आहे. या प्रवासातून खूप काही शिकू शकलो. अगदी अंथरुणाला खिळून पुन्हा सर्वोच्च शिखरे गाठण्यासाठीतयार होणे असो वा, बोलण्यातील शारीरिक व्यंगावर केलेली मात असो, प्रत्येक वेळी पत्नीने साथ दिली. स्वप्नांच्या प्रवासात अनेकांना मार्ग दाखवता आला,” असे आनंद सांगतात. एखाद्या स्वप्नाकडून सत्याकडे जाणारा प्रेरणादायी संघर्ष आणि प्रवास करणार्‍या आनंद बनसोडे यांना त्यांच्या आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’च्यावतीने मनःपूर्वक शुभेच्छा! 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.