सामाजिक सेवेवीण आयुष्य क्षीण...

    12-Sep-2023
Total Views |
Article On Social Worker Jagbir Singh Birdi

दारिद्य्ररेषेखालील मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून जगबीरसिंग बिरदी कार्यरत आहेत. एक हजारांहून अधिक मुलांना शिक्षित करणार्‍या, पर्यावरणाबद्दल जनजागृती करणार्‍या या समाजसेवकाविषयी...

जगबीरसिंग बिरदी यांचा जन्म जम्मूचा. त्यांचे वडील विमासेवेत कार्यरत असल्याने त्यांची सातत्याने देशभरात बदली होत असे. म्हणूनच बिरदी यांचे शिक्षण भोपाळ, उज्जैन अशा विविध शहरांमध्ये झाले. भोपाळमधून त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. नंतर कामाच्या निमित्ताने २००५ साली ते नाशिकमध्ये स्थायिक झाले. त्यांचे संपूर्ण शिक्षण केंद्रीय विद्यालयात झाले आहे. खरं तर आठवी-नववीमध्ये असतानाच त्यांना स्वामी विवेकानंदांची पुस्तके वाचून प्रेरणा मिळाली. आपणही समाजासाठी काहीतरी करावे, हा विचार लहानपणापासूनच त्यांच्या मनात रुंजी घालत होता. पण, केवळ विचारांवर न भागवता, या विचारांना कृतीची जोड देत मूर्त रुप देण्याचे त्यांनी निश्चित केले.

कालांतराने त्यांनी या दिशेने थोडे काम करायला सुरुवात देखील केली. बिरदी नेत्रदान, रक्तदान शिबिरांचे आयोजन करु लागले. त्यावेळी अशा सामाजिक उपक्रमांबद्दल नागरिकांमध्ये फारशी जागृतीही आणि त्याचे गांभीर्यही नव्हते. त्यातच बिरदी यांचे त्यांचे वय कमी असले, तरी ते लोकांना या उपक्रमांचे महत्त्व पटवून देण्यात मात्र यशस्वी ठरले. एवढ्यावरच न थांबता, नाशिकला स्थायिक झाल्यानंतर काही काळातच त्यांनी कोचिंग क्लासेस घेणे सुरू केले.

२००६च्या एप्रिल महिन्यात त्यांनी ‘मानव उत्थान मंच’ या सामाजिक संस्थेची स्थापना केली. या संस्थेमध्ये एकूण ५० सदस्यांचा समावेश होता. आता त्याच्या संस्थेत स्वयंसेवकांची संख्या तब्बल १००च्यावर आहे. ‘मानव उत्थान मंच’च्या माध्यमातून वृद्धाश्रम, अनाथाश्रम, रुग्णालये अशा ठिकाणी जाऊन गरजूंना आवर्जून मदतीचा हात देणे, आठवड्यातून एक दिवस जेवणाचा डब्बा पोहोचविणे अशा स्वरुपाने समाजकार्यात आपले योगदान दिले.

एवढेच नाही तर २०१२ पासून बिरदी यांनी पर्यावरण आणि शिक्षण या दोन विषयांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून काम सुरू केले. २०१२ ते २०१९ पर्यंत प्लास्टिक बंदी, वृक्षारोपण, सौरऊर्जा वापराची जागरुकता नागरिकांमध्ये निर्माण करणे, अशा विविधांगी विषयांवर त्यांनी काम केले. त्याचबरोबर ग्रामीण भागातील मुलामुलींनी शिक्षण घ्यावे, यासाठी तेथील शाळांमध्ये जाऊन सर्वेक्षणही बिरदी यांनी केले. आर्थिकदृष्ट्या बिरदी फारसे सक्षम नव्हते. म्हणूनच लोकसहभागातूनच आवश्यक त्या वस्तू, सुविधा शेकडो शाळांना पुरवल्या आणि त्यांचे हे कार्य आजही अविरतपणे सुरु आहे.

पर्यावरण आणि शिक्षण याव्यतिरिक्त त्यांनी वार्षिक कामाचे काटेकोर नियोजनदेखील केले. नुसते नियोजन कागदोपत्री न ठेवता, ठरलेले नियोजन दरवर्षी अमलातही आणले पाहिजे, यासाठी ते कटाक्षाने प्रयत्नशील असतात. विविध पातळीवर समाजकार्य करताना अनेक अडचणी, आव्हानांचा त्यांना सामनाही करावा लागला. एखादी गोष्ट आणि चांगले उपक्रम राबवण्यास सरकारी अधिकार्‍यांना समजावून सांगणे कठीण गेल्याचे बिरदी सांगतात. परंतु, सतत पाठपुरावा करून संबंधित काम ते पूर्ण करुन घ्यायचे. समाजकार्य करताना त्यांना बरेवाईट असे दोन्ही प्रकारचे अनुभव आले. चांगला अनुभव म्हणजे, त्यांच्याच सारख्या एका समूहाने ’फूड व्हॅन’ संकल्पना त्यांना सांगितली आणि त्यांना मदत म्हणून लोकसहभागातून बिरदी व इतर सहकार्‍यांनी कमीत कमी वेळात एक गाडी उपलब्ध करून दिली. त्याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. “उद्देश चांगला असेल, तर अनोळखी लोकदेखील विविध कामांमध्ये सहभागी होतात. तेव्हा खूप छान वाटते,“ असे ते आवर्जून नमूद करतात.

आणि वाईट अनुभव सांगताना ते म्हणतात की, “चांगले काम न करणार्‍या लोकांना मी अडवायचो; पण लोक ऐकायचे नाही. मग टोकाचे वाद व्हायचे. ते काही वृद्धाश्रमात काम करायचे. त्याचा अनुभव असा होता की, काही ठिकाणचे लोक सतत काम सांगायचे. त्यांच्या तक्रारीदेखील असायच्या. मग मीच विचार केला, ते असे का वागत असतील? मग माझ्या लक्षात आले की, ते एकटे राहतात. त्यांच्या भावना त्यांना व्यक्त करता येत नाहीत. त्यांचे ऐकायलाही कोणी नाही. म्हणून ते त्यांच्याजवळ सांगतात.” अशाप्रकारे बिरदी यांनी कोणतेच काम अर्धवट सोडले नाही किंवा कामांकडे कधीच दुर्लक्ष केले नाही.

खरेतर ते स्वतःला खूप नशीबवान समजतात की, त्यांच्या आवडीचे कामच त्यांचा व्यवसाय आहे. ते जे शिक्षणाचे, पर्यावरणाचे काम करीत आहे, तीच त्यांची आवड. त्यामुळे त्यांना विरंगुळ्यासाठी वेगळा वेळ काढायची गरजच पडत नाही आणि म्हणूनच ते कधीच थकत नाही.

बिरदी सर्वांना सांगू इच्छितात की, “प्रत्येकाने हा विचार कायम लक्षात ठेवावा की, आपण समाजाचे देणे लागतो. आधीच्या पिढीने जे काही करून ठेवले आहे, त्यामुळे आपण सुखात जगू शकत आहोत, तर आपलेही कर्तव्य आहे की, आपण ही येण्याच्या पिढीसाठी काहीना काही चांगले करून ठेवावे. तसेच, प्रत्येकाने सामाजिक कामामध्ये जरूर सहभागी व्हावे. यामुळे आपल्याला मिळणारे मानसिक समाधान खूप मोठी ऊर्जा देऊन जाते.” जगबीरसिंग बिरदी यांना पुढील प्रवासासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’परिवारातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.

गौरव परदेशी
८६०५७६८३६६

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.