डोंबिवली : रघुकुल शैक्षणिक ट्रस्ट डोंबिवली श्रीमती के.सी.गांधी शाळेचे चित्रकला शिक्षक अमोल पाटील यांनी पर्यावरण पूरक शाडू माती पासून गणपती बनवणे या कार्यशाळेचे विनामूल्य आयोजन केले होते. या कार्यशाळेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेत डोंबिवली मधील विविध शाळांमधून ८०पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्रत्येक विद्यार्थ्यास मातीचा गोळा व इतर साहित्य मोफत संस्थेतर्फे देण्यात आले. उपक्रमाचे दीप प्रज्वलन संस्थेचे अध्यक्ष चित्तरंजन पाटकर, भास्कर तिखे , प्रमोद शिरबावकर, सदस्य मेघना प्रभू, मनीषा सामंत यांनी केले.
पर्यावरणाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावे म्हणून अमोल पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांकडून शाडू माती पासून गणपती बनवूया पर्यावरणाचे रक्षण करूया ही शपथ घेतली व संकल्प करून घेतला. शाडू माती कशी वापरावी? कशी भिजवावी? शाडू माती लवकर सुकत नसल्याने बराच वेळ आपण मूर्तीवर काम करू शकतो तसेच शाडू मातीला तडा जात नसल्याने मूर्ती सुबक व सफाईदारपणे आपण तयार करू शकतो.
याचे सविस्तर मार्गदर्शन केले. सर्व मुले गणपती बनवण्यात तल्लीन झाली होती. मुलांनी अतिशय सुरेख आखीव रेखीव अशा प्रकारच्या गणपती मूर्ती तयार केल्या. आपण आपल्या हातावर हाताने गणपती बाप्पा बनवला याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
या कार्यशाळेला वैभव जाधव, रमेश जाधव, सतीश मेश्राम हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. केबी वीरा शाळेचे शेखर पाटील, आरटीपी शाळेचे नारायण महाजन, नारायणा स्कूलच्या दिपाली शिनकर यांनी मुलांना माती भिजवण्याचे तंत्र माहिती माती कशाप्रकारे वापरून आकार बनवावे याचे मार्गदर्शन करून कार्यक्रम यशस्वी केला.