तेहरान : (Iran-Israel War) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी काही तासांपूर्वी इराण आणि इस्रायलमध्ये पूर्ण शस्त्रसंधी झाल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर हे युद्ध थांबेल असा अंदाज होता, कारण ट्रम्प यांनी "मी दोन्ही देशांशी चर्चा केली असून दोन्ही देशांनी शस्त्रसंधीसाठी सहमती दर्शवली आहे, असे म्हटले होते. इराणने तर आधी विधानातून आणि नंतर थेट कृतीतून ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला आहे. इराणने इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्रे डागून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये शस्त्रविराम झाल्याची घोषणा केल्यानंतर काहीच तासांत इराणने इस्रायलवर हल्ला केला आहे. इस्रायलच्या संरक्षण दलाने (इस्रायल डिफेन्स फोर्सने) म्हटले आहे की, मागील काही तासांत इराणने तीन वेळा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. इस्रायली माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बीरशेबा येथील एका रहिवासी इमारतीत क्षेपणास्र पडून झालेल्या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या स्फोटात अनेक जण जखमी झाले आहेत.
इराणकडून प्रतिक्रिया
इराणचे परराष्ट्र मंत्री सईद अब्बास अरागची म्हणाले, जर इस्रायलने लष्करी मोहीम थांबवली असेल तर आमचाही प्रत्युत्तर देण्याचा कोणताही विचार नाही. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॅार्म एक्सवर यासंदर्भात लिहिले आहे की, "जर इस्रायलने आपले अवैध आक्रमण थांबवले तर इराणही प्रत्युत्तर देणार नाही." त्यांनी असेही म्हटले आहे की, "आतापर्यंत शस्त्रसंधी किंवा लष्करी मोहीम समाप्तीवर कोणताही करार झालेला नाही. अर्थात इराणी प्रमाणवेळेनुसार सकाळी चारपासून इस्रायलने आपले हल्ले थांबवले तर आम्ही कोणत्याही प्रकारचे प्रत्युत्तर देणार नाही."
ट्रम्प यांच्या दाव्यांवर इस्रायलची प्रतिक्रिया नाही
दरम्यान, ट्रम्प यांच्या शस्त्रविरामाच्या दाव्यांवर इस्रायलने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. उलट इराणी लष्कराच्या हल्ल्यांबाबत इस्रायल डिफेन्स फोर्सकडून सातत्याने माहिती दिली जात आहे. इस्रायल सरकारने शस्त्रविरामाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. मात्र पंतप्रधान नेतान्याहू यांच्या कार्यालयाने यावर शिक्कामोर्तब केलेले नाही.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\