नवी दिल्ली : भारत आणि आखाती देशात कायमच मजबूत आर्थिक संबंध राहिलेले आहेत. लाखो भारतीय कामगार आखाती देशात काम करतात. तसेच हे देश भारताच्या उर्जा सुरक्षेसाठी पण महत्वाचे आहेत. आता अशाच एका आखाती देशातून भारतात मोठी गुंतवणूक होत आहे.
२०२२-२३ या आर्थिक वर्षात संयुक्त अरब अमिरात (UAE) भारतातील चौथा सर्वात मोठा गुंतवणूकदार बनला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, संयुक्त अरब अमिरातमधून भारतात २०२२-२३ या आर्थिक वर्षात ३.३५ अब्ज डॉलर इतकी परकीय गुंतवणूक करण्यात आली आहे. यापूर्वी २०२१-२२ मध्ये संयुक्त अरब अमिरातने भारतात १.०३ अब्ज डॉलर इतकी गुंतवणूक केली होती.
भारतात गुंतवणूक करणाऱ्या देशांमध्ये संयुक्त अरब अमिरात सातव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. मे २०२२ मध्ये दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापार करार झाला आहे. यामुळे दोन्ही देशांमधील गुंतवणुकीत तेजी आली आहे. संयुक्त अरब अमिरात भारतामध्ये मुख्यतः सेवा, ऊर्जा, सागरी वाहतूक आणि उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक करतो.
गेल्या वर्षी, १८ फेब्रुवारी २०२२ रोजी, भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार (CEPA) झाला होता. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध चांगले होताना दिसत आहेत. तसेच हे दोन्ही देश स्थानिक चलनात व्यापार करण्याची व्यवस्था करत आहेत.