महाराष्ट्र बारव मोहिमेची सरकार दरबारी दखल

    22-May-2023
Total Views |
 
 
मुंबई : गत ३ वर्षांपासून सुरु असलेल्या 'महाराष्ट्र बारव मोहीम' या मोहिमेला यश आले आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने महाराष्ट्रातील बारावांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने २२ सदस्यांची गठीत समिती निर्माण केली आहे. या समिती अंतर्गत बारावांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने नवनवे आराखडे बांधण्यात येणार आहेत. तसेच पर्यटन वाढीस लागावे म्हणून योजनांची निर्मिती करण्यात येणार आहे. दरम्यान या मोहिमेची सुरुवात ज्या युवकाने, रोहन काळेने केली होती, तो मात्र या सदस्य समितीवर नाराज असल्याचे दिसते.
 

rohan kale 
 
महाराष्ट्रात सातवाहन काळापासून बारवांची निर्मिती होत आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रात २० हजार पायविहिरी आहेत अशी नोंद महाराष्ट्र बारव मोहिमेचे संस्थापन रोहन काळे करतात. आजच्या काळात या बारवा वापरात नसल्याने त्यांचा वापर कचरा कुंडी किंवा तत्सम टाकाऊ कचरा टाकण्यासाठी केला जातो. तसेच काही बारवा माती भरून बुंजवून टाकण्यात आल्या. या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करण्यासाठी या बारावांच्या संवर्धनाची गरज असल्याचे समजते.
 
समितीच्या कार्यकक्षा-
# महाराष्ट्रातील बारवांची जतन व संवर्धन करून त्या पुनरुज्जीवित करण्यासाठी योजना तयार करण्यात याव्या.
# स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ५ बारव संरक्षित करण्यासाठी जातं संवर्धनाचे प्रस्ताव आराखडे तयार करण्यासाठी मार्गदर्शन करणे.
# महाराष्ट्रातील बारवांची गॅझेटिअर तयार करण्यासाठी कार्यकारी संपादक व सचिव, दार्शनिक विभाग यांना सहकार्य करणे.
 
रोहन काळे या निर्णयाबाबत जाहीर निषेध नोंदवत म्हणतात, "मी 'बारव बचाव मोहिमे'चा संस्थपाक नसून 'महाराष्ट्र बारव मोहीम' या मोहिमेचे कार्य करतो आहे. यासाठी गठीत केलेल्या समितीवर माझे नाव संस्थापक सदस्य असल्याने गैरसमज होऊ शकतात, माझे नाव मी यातून काढून टाकण्यासंबंधी सांगितले आहे. या यादीतील काही सदस्यांनी बारावांबाबत काहीही कार्य केले नसून त्यांची नावे बारव तज्ञ् म्हणून लिहिल्याने मला खेद वाटतो. मी यापुढेही महाराष्ट्र बारव मोहिमेचे कार्य अव्याहतपणे करत राहीन."
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.