त्र्यंबकराजा पाहतो आहे!

    20-May-2023   
Total Views |
Trimbakeshwar Temple issue maharashtra


त्र्यंबकेश्वराचे धार्मिक, ऐतिहासिक महात्म्य लाभलेले ज्योतिर्लिंग मंदिर. दि. १३ मे रोजी काही मंडळींनी चक्क हिरवी चादर आणि धूप वगैरे साहित्य घेऊन मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. यासंबंधीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर आणि नंतर प्रसारमाध्यमांतही प्रसारित झाला. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण ढवळून निघाले. पण, या ठिकाणी नक्की काय घडले? या सर्व प्रकरणाबाबत कोण काय आणि का म्हणाले, याबद्दल सांगोपांग मतप्रदर्शन करणारा हा लेख; बाकी त्र्यंबकराजा पाहतो आहेच!

यदुनाथ सरकार यांच्या ‘औरंगजेब’ पुस्तकात तसेच ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्या मते, औरंगजेबाने त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर पाडून तिथे मशीद बांधली. त्यानंतर १७५१ साली शूर मराठ्यांनी मशीद पाडून नानासाहेब पेशव्यांच्या आज्ञेने तिथे पुन्हा ज्योतिर्लिंगाचे मंदिर बांधले. दि. १३ मे रोजी याच त्र्यंबकेश्वरच्या ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये काही लोकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. या घटनेवर ‘गंगा-जमुना तेहजीब’चे अगाध ज्ञान वाटताना (वाचकांना ज्ञानाच्या ऐवजी ‘पाखंड’ शब्द वाटेल, पण मला ‘पाखंड’ म्हणायचे नाही) जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ”त्र्यंबकेश्वराचे मंदिर हे हेमाडपंथी मंदिर होते अणि त्याच्या निर्मितीसाठी पेशवे आणि त्यानंतर अहिल्यादेवींनी हातभार लावला.” धर्मांध, विकृत औरंगजेबाने मंदिर पाडून मशीद उभी केली, हे मात्र जितेंद्र आव्हाड यांच्या तोंडातून उमटले नाही. ते सरळ म्हणतात की, ”हे मंदिरच होते आणि त्याला पुढे बांधण्यासाठी पेशव्यांनी हातभार लावला.” हातभार लावला म्हणजे, मराठे वीर शूरपणे लढले आणि त्यांनी त्र्यंबकेश्वराचा किल्ला जिंकला आणि औरंगजेबाने मंदिर पाडून बनवलेली मशीद पुन्हा पाडली आणि तिथे मंदिर बांधले, हे जितेंद्र आव्हाड हे बोलले नाहीत आणि बोलणारही नाहीत. छे! धार्मिक सलोखा, ऐक्य वगैरेंची मुखवट्याआड जितेंद्र आव्हाडांसारखी मंडळी आणखी किती काळा इतिहासाचे विद्रुपीकरण करणार? आणि किती काळ महाराष्ट्राने ते सहन करायचे?

त्र्यंबकेश्वरच्या प्रकरणात आतापर्यंत चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यावर गावातली मतीन सय्यद नावाची व्यक्ती म्हणते की, ”गावकर्‍यांना पसंत नसेल, तर आम्ही संदल काढणार नाही. तसेच धूप दाखवण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे.” (‘सय्यद माझे चांगले मित्र आहेत,’ असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत, याउपर काही बोलायलाच हवे का?) तर सय्यद यांच्यासारखेच संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांनी मत व्यक्त केले की, ”हिरवी चादर आणि धूप दाखवण्याची मुस्लिमांची शंभर वर्षांपूर्वीची परंपरा आहे,” तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेही मागे राहिले नाहीत. ते म्हणाले की, ”ती त्यांची परंपरा असेल, तर गावाबाहेरच्या लोकांनी ती परंपरा बंद पाडण्याचा प्रयत्न करू नका. ते मराठी मुसलमान आहेत.” याबद्दल बोलताना त्र्यंबकेश्वर देवस्थानचे ट्रस्टी आणि त्र्यंबकेश्वर पुरोहित संघांचे माजी अध्यक्ष प्रशांत गायधनी म्हणतात, ”मी गेले पाच वर्षे या देवस्थानचा विश्वस्त आहे. गेल्या पाच वर्षांपासूनच काय, माझ्या पूर्वी शंभर वर्षांतल्या कुणाही विश्वस्ताला विचारा, ते हेच सांगतील की, मंदिरात जाऊन धूप वगैरे दाखवण्याची पद्धत नाही आणि नव्हती. ते संदल काढायचे आणि मंदिरासमोरील रस्त्यावरून धूप दाखवायचे आणि पुढे जायचे.” याबाबत सविस्तर माहिती देताना गायधनी जे म्हणाले, त्याचा सारांश असा की, गेल्या वर्षीही धूप, चादर घेऊन काही लोक मंदिरात घुसले होते. त्यावेळीही त्यांना अडवले गेले. यावर्षी पुन्हा त्यांनी मंदिराच्या आत घुसण्याचा प्रयत्न केला.

पण, त्यांना आत जाण्याआधीच अडवले गेले. रात्री मंदिर बंद होत असताना, जे २३ ते २९ लोक मंदिरात घुसण्याचा प्रयत्न करत होते, ते संशयास्पद होते. धूप, टोपली, हिरवी चादर... वर वर दिसताना त्यात हारफुले दिसत होती. पण, सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार करता, देवस्थानचे सुरक्षारक्षक त्यांना अडवणारच. हे सगळे मंदिरात घेऊन जायचे प्रयोजनच काय? त्यामुळे ते केवळ मुस्लीम होते, म्हणून त्यांना अडवले गेले नाही. देवस्थान सर्वच धर्मीय श्रद्धाळूंना खुले आहे. पण, प्रश्न असा आहे की, असे काय घडले की, गेल्या वर्षापासून त्यांना त्र्यंबकराजाला हिरवी चादर टाकून धूप दाखवायचा आहे? देवस्थानाला या घटनेचे राजकारण करायचे नाही. पण, गेल्यावर्षी मंदिरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतानाचा आणि यावर्षीचाही व्हिडिओ कुणाही हिंदूने किंवा देवस्थानाच्या संबंधित व्यक्तींनी प्रसिद्ध केला नाही, तर हे दोन्ही व्हिडिओ त्या संदलमध्ये उपस्थित असणार्‍या मुस्लीम व्यक्तीनेच काढले आणि प्रसाारमाध्यमावर टाकले.

या पाठीमागचा विचार काय असेल? तर काही घटनांचा आढावा घेताना वाटते की, सुरुवातीला गेल्यावर्षी या लोकांना मंदिरात जाऊन अशाप्रकारे धूप किंवा चादर चढवण्यास अटकाव झाला नसता, तर त्यांनी गेल्या वर्षीचा व्हिडिओ यावर्षी दाखवला असता आणि सांगितले असते की, ”हे पाहा, आम्ही वर्षानुवर्षे त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात धूप दाखवतो आणि हिरवी चादरही चढवतो.” अर्थात, ईश्वर सगळीकडेच आहे आणि कर्मकांडात तर तो मुळीच नाही. हिरवी काय नि अगदी काळी चादर जरी श्रद्धेने भगवंताला अर्पण केली तरी ते मान्य आहे. पण, गायधनी यांनी म्हंटल्याप्रमाणे गेल्या दोन वर्षांपासूनच हे सगळे का घडत आहे? तसेच अल्लाशिवाय कुणालाच मानायचे नाही, पूजायचे नाही, हा इस्लामचा प्रमुख पाया असताना त्र्यंबकेश्वरमधील मुस्लीम हिंदूंच्या देवतांना कसे बरं मानतात? भगवान शिवशंकरावर अतिव श्रद्धा ठेवतात. यात केवळ भक्तिभाव आहे की आणखी काही?
या घटनेचा तर्कसुसंगत विचार करताना कल्याण येथील श्रीमलंगगडाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. नाथपंथीचे ठाणे असलेले श्रीमलंगगड. पेशव्यांनी केतकर कुटुंबीयांना पूजाअर्चेसाठी श्रीमलंगगड येथे पाठवले.

गडावर साफसफाई आणि इतर कामे करण्यास मनुष्यबळ उपलब्ध झाले नाही, म्हणून एक मुस्लीम मुलगा तिथे २४ तास राहून काम करू लागला. एकटा असला म्हणून काय झाले, नमाज पढणे, धार्मिक प्रथा, उत्सव करणे हे त्याने सुरूच ठेवले. नंतर इथेच कामासाठी त्याने आपल्या कौममधल्या लोकांना बोलावले. या मलंगगडावर हिंदू पद्धतीने पूजापाठ होत, पण तिथे राहणारे हे लोक नमाज आणि त्यांच्या पद्धतीने प्रार्थना वगैरे करत. काही काळाने या देवस्थानचा ‘ट्रस्ट’ बनवण्यात आला. इथे हिंदू आणि मुस्लीम दोन्ही पद्धतीने पूजा-प्रार्थना होतात, हा हवाला देत ट्रस्टचे नाव हिंदू-मुस्लीम सौख्यातून ठेवण्यात आले. पुढे पुढे या ट्रस्टमध्ये मुस्लीमच सर्वेसर्वा झाले. सध्या वेळ अशी आली आहे की, न्यायालयाने इथले विश्वस्त हटवलेत. पण, या विश्वस्तांनी ही जागा ‘वक्फ बोर्डा’ची आहे, असे छातीठोकपणे सांगितले.
देवस्थान आता ‘श्रीमलंग’ नाही, तर ‘हाजीमलंग’ आहे. तिथे केवळ मुस्लीम पद्धतीनेच पूजा करण्याचा अट्ठहास होतो. धर्मवीर आनंद दिघे ते अगदी सध्याचे एकनाथ शिंदे यांनी या देवस्थानासाठी लढा दिला. सगळे पुरावे असून सगळं काही असूनही श्रीमलंग आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. यानुसार आज त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप-चादर चढवून उद्या म्हंटले की, आमची ही पुरातन पद्धत आहे. या देवस्थानावर आमचाही हक्क आहे, नव्हे हे आमचेच आहे, असे म्हंटले जाणार नाही याची शाश्वती काय? बरं, असे झाले तर त्या सर्व असत्याचे समर्थन करत, तेच सत्य आहे, असे सिद्ध करण्यासाठी काही तथाकथित पुरोगामी-निधर्मी वगैरे राजकारणी तत्पर आहेतच. गोष्टी ‘जर- तर’च्या असल्या तरी भारतीय हिंदू समाजाने पुरोगामित्व, निधर्मीपणा आणि सहिष्णूतेच्या नावाने खूप सहन केले. ज्यांची तोंडं दुधाने पोळली आहेत, ते ताकही फुंकूनच पिणार! बाकी त्र्यंबकराजा पाहतोच आहे.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.