राजेशाही राज्याभिषेकाचा थाट अन् ब्रिटनचा रिकामा माठ! (भाग-२)

    20-May-2023
Total Views |
Britain King Charles III coronation


ब्रिटिश राजवंशाशी जगाची जवळीक आजही अंशत: का असेना, पण टिकून आहे, हे यावरून दिसून येते, तर काहींना या गुलामगिरीच्या उरलेल्या खुणा वाटतात. रिपब्लिकनांना तर सत्ताप्रमुख लोकातून निवडलेला हवा आहे. ‘नॉट माय किंग’ असे घोषवाक्य लिहिलेले फलक त्यांच्या हाती दिसत होते. काहींनी तर रस्त्यावरही लोळण घेतली होती.

तब्बल सात दशकांची राजसत्ता भोगून राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे देहावसान झाले आणि एक आगळीवेगळी कारकिर्द काळाच्या पडद्याआड गेली. ब्रिटनच्या सिंहासनावर राजे चार्ल्स तृतीय यांचा भव्यदिव्य राज्याभिषेक सोहळा कोणत्या पार्श्वभूमीवर पार पडला, हे लक्षात घेतल्याशिवाय त्याला विरोध का झाला, ते समजणार नाही. ब्रिटिश पिढ्या राजशिष्टाचाराबाबत कमालीच्या एकनिष्ठ असतात. राजघराण्याच्या झगमगाटावर कोट्यवधींचा खर्च झाला तरी बेहत्तर अशी त्यांची भूमिका असते. खानदानी परंपरेला तडा गेलेला त्यांना चालत नाही. आपले खानपान, संस्कृती आणि वारशाबद्दल ते केवळ जागरूकच नसतात, तर आपले हे वैशिष्ट्य जगभर पोहोचावे, यासाठी ते तत्परही असतात. राजेशाहीसह लोकशाही ब्रिटनने निवडली ती या भूमिकेतून. पण, यावेळी मात्र चार्ल्स तिसरे जेव्हा सम्राटपदी आरूढ झाले, तो मुहूर्त साधून ब्रिटनमध्ये उग्र आंदोलने झाली.

एकीकडे अनुपम सोहळा, तर दुसरीकडे सन १९३७ नंतर राजनिष्ठ ब्रिटनला पहिल्यांदाच राजा लाभला आहे. नवे राजे तसे अवघे ७४ वर्षांचे आहेत. हे सम्राट आहेत, पण यांचे साम्राज्य मात्र लयाला गेलेले आहे. त्यांच्यासोबत राणी म्हणून त्यांच्या पत्नी कॅमिला यांचेही पदग्रहण झाले, हे ओघानेच येते. भारतीय वंशाचे खुद्द ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी बायबलचे पठण करून, नवसम्राटांचे अभीष्टचिंतन केले. एरवीही ब्रिटिश सम्राटांकडे अख्खे जग कौतुकाने आणि कुतुहलाने पाहते. म्हणूनच पर्यटकांची पावले ब्रिटनकडे प्रथम वळतात, असे म्हणतात. राज्याभिषेकानंतर राजे चार्ल्स (तृतीय) आणि राणी कॅमिला चार हजार किलोग्रॅम सोन्यापासून तयार केलेल्या शाही बग्गीत आरुढ होऊन, बकिंगहम राजवाड्यात रवाना झाले. हे दृश्य जगातील अनेकांनी आवर्जून पाहिले. ब्रिटिश साम्राज्यावर सूर्य एकेकाळी मावळत नसे. आज ती स्थिती नाही. तरीही जगातील ३९ देशांच्या चार हजार सैनिकांनी नव शाही दाम्पत्याला मानवंदना दिली. ब्रिटिश राजवंशाशी जगाची जवळीक आजही अंशत: का असेना, पण टिकून आहे, हे यावरून दिसून येते, तर काहींना या गुलामगिरीच्या उरलेल्या खुणा वाटतात. रिपब्लिकनांना तर सत्ताप्रमुख लोकातून निवडलेला हवा आहे. ‘नॉट माय किंग’ असे घोषवाक्य लिहिलेले फलक त्यांच्या हाती दिसत होते. काहींनी तर रस्त्यावरही लोळण घेतली होती.

राजेशाही ही टिकवावी अशी परंपरा नाही

आज जगात राजेशाहीचा पुरस्कार करणारा क्वचितच कुणी असेल. राजा म्हणजे नायक ही भूमिका संपल्यातच जमा झाली आहे. उलटपक्षी तो खलनायकाच्या पदवीला पोहोचला आहे. ज्या ब्रिटिश लोकशाहीचे नाव जगात आज आदराने घेतले जाते, अशा या ब्रिटिश लोकशाहीने आजवर प्रतीक स्वरुपात का होईना ‘राजेपण’ जपलेले आढळते. भविष्यात प्रतीक स्वरुपात तरी ‘राजेपण’ जपले जाईल का, अशी शंका आता व्यक्त होऊ लागली आहे. तशीही ब्रिटिशांची इतिहासकाळातील राजघराणी आदर्श मानावीत अशी स्थिती नाही. जुलमी, लहरी, अपात्र, क्रूर राजघराणी ब्रिटिश राजघराण्यांमध्ये काही कमी नाहीत. त्यांच्यातील कलह, क्लृप्त्या इतिहासाच्या प्राथमिक अभ्यासकालाही जाणवाव्यात अशा आहेत. कदाचित म्हणूनच ब्रिटिश जनतेत यावेळी मात्र अनेकांनी राजनिष्ठेच्या सीमा ओलांडत, ‘नॉट माय किंग’ या घोषणा दिल्या असतील. जोडीला सध्याची ब्रिटिशांची झालेली हलाखीची स्थितीही बर्‍याच प्रमाणात कारणीभूत झाली असावी. अशा परिस्थितीत या सोहळ्यावर झालेला वारेमाप खर्च ब्रिटिश नागरिकांच्या टीकेचा विषय ठरावा, हे समजण्यासारखे आहे. निदान सध्या तरी दर दहातले चार लोक राजेपद्धतीला विरोध करताना दिसत आहेत. राज्यभिषेकाच्यावेळीही हा विरोध नोंदविण्यात आला, एवढेच.

असे आहेत चार्ल्स तृतीय...

चार्ल्स तृतीय यांचा जन्म दि. १४ नोव्हेंबर १९४८चा. हे आज ब्रिटनच्या राजपदावर आरूढ झाले आहेत. हे राणी एलिझाबेथ यांचे ज्येष्ठ चिरंजीव. यांचा जन्म बकिंगहॅम पॅलेसमधला असून त्यावेळी त्यांचे आजोबा (आईकडून) सहावे जॅार्ज यांची राजवट सुरू होती. त्यांची आई एलिझाबेथ द्वितीय यांचे राज्यारोहण झाले तेव्हा म्हणजे १९५२ मध्ये ते तीन वर्षांचे होते. ते पुढचे राजे असतील हे तेव्हाच निश्चित झाले होते. त्यांचे संगोपन हे लक्षात ठेवूनच झाले आहे. पण, राजपदासाठी २०२३ हे वर्ष उजाडावे लागले. यावेळी ते ७४ वर्षांचे आहेत. राज्यावर येणारे हे पहिलेच एवढे मोठे ‘राजकुमार’ असतील. ते राज्यारोहणापूर्वी ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ म्हणून ओळखले जायचे. समाजजीवनाच्या विविध अंगांशी त्यांचा निकटचा संबंध राहिलेला आहे. गेल्या २० वर्षांत त्यांचा ४० धर्मादाय प्रकल्पांशी सक्रिय आणि निकटचा संबंध राहिलेला आहे. ‘प्रिन्स ऑफ वेल्स चॅरिटेबल फंड’ (पीडब्ल्यूसीएफ) चे नाव ब्रिटनमध्ये आदराने घेतले जाते. पर्यावरण संगोपन, कलांना उत्तेजन, ग्रामोद्धार, आरोग्य संवर्धन आणि शिक्षण या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. ‘होम स्कूलिंग’ (घरच्या घरीच सर्व शिक्षण) ऐवजी त्यांनी शाळेच्या वर्गखोलीत इतर मुलांसोबत शिक्षण घेतले आहे. ते वर्गनायकही होते. केंब्रिज विद्यापीठाशी संलग्न ट्रिनिटी कॅालेजमध्ये त्यांनी आर्किओलॅाजी व अँथ्रोपोलॅाजीचे पदवीस्तरापर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी सैनिकी शिक्षणही संपादन केले आहे.

ब्रिटनचे राजे चार्ल्स तृतीय यांचा राज्याभिषेक संपन्न झाल्यानंतर ते म्हणाले की, ‘’मी इथे सेवा घ्यायला आलेलो नाही, सेवा करायला आलोय.” राज्यारोहणप्रसंगी आर्चबिशप यांनी वाकून चार्ल्स तृतीय यांच्या प्रति आपला आदर व्यक्त केला, त्यांनी राजे चार्ल्स यांच्या प्रति निष्ठेची शपथ घेतली. क्वीन कॉन्सर्ट कॅमिला यांनाही यावेळी राज्याभिषेक करण्यात आला. पण, त्यांना कोणतीही शपथ घेण्यास सांगितले गेले नाही. ब्रिटनच्या राजघराण्यात १९५३ नंतर पहिल्यांदाच हा राज्यारोहण सोहळा संपन्न झाला. जगातल्या या सर्वांत लक्षवेधी राजेशाहीचा थाट पदोपदी लक्ष वेधून घेत होता. त्याची तयारी जशी काटेकोरपणे केली गेली होती तशीच अंमलबजावणीही झाली.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी जिल बायडेन, भारताचे उपराष्ट्रपती धनकड आणि त्यांच्या पत्नी सुदेश धनकड, फ्रान्सचे इमॅन्युअल मॅक्रॅान, अ‍ॅास्ट्रेलियाचे पंतप्रधान अ‍ॅन्थोनी अल्बानीझ, युक्रेनचे पंतप्रधान डेनिस स्मॅहाल, युरोप, आशिया आणि आफ्रिकन देशांचे प्रमुख वा प्रतिनिधी, भारतीय चित्रसृष्टीतले कलाकार अनिल कपूर यांची कन्या सोनम कपूर, विशेष म्हणजे मुंबईच्या डबेवाल्यांचे दोन प्रतिनिधी यासह जगभरातून अनेक दिग्गज व्यक्ती या राज्यारोहण सोहळ्यासाठी उपस्थित होत्या.या राज्यारोहणप्रसंगी २३०० पाहुणे उपस्थित होते. याउलट यांच्या मातोश्री एलिझाबेथ यांच्या १९५३ मधील राज्यारोहणप्रसंगी आठ हजार पाहुणे आले होते. दोन्ही कार्यक्रमांना १०० राष्ट्रप्रमुख उपस्थित असले तरी यावेळी त्यातला एकही ‘मांडलिक’ नव्हता.‘मी सेवा करायला आलोय!’ या आपल्या उद्गारांना अनुसरून ब्रिटनचे साम्राज्य नसलेले नवे सम्राट चार्ल्स तृतीय खरंच वागले आणि सम्राटपण विसरून वावरले, तर कुणी सांगावे, तेही ब्रिटिश जनतेच्या गळ्यातले ताईत होऊ शकतील! आज निदान तशी अपेक्षा करायला काय हरकत आहे?

वसंत गणेश काणे

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.