गोदामाईला ‘अमृत’स्पर्श ?

    19-Mar-2023
Total Views |
Godavari River

नाशिक येथील गोदावरी नदीपात्रात गेल्या काही महिन्यांपासून होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी विविध योजना,’पायलट’ प्रकल्प राबवले जात आहे. ‘कल्की’ ही सक्ष्मजंतूंचे मिश्रण असलेली जैविक मात्रा गोदावरी नदीला मिळणार्‍या उपनद्यांत सोडण्यात आली. त्यानंतर ’आयआयटी’ पवई येथील चमूच्या सहकार्याने नाशिक महापालिकेतर्फे एप्रिलपासून ’एंट्रीट’ द्वारे नाल्यामधील सांडपाण्यावर प्रयोग करुन मगच ते नदीपात्रात जाणार आहे. आता गोदावरी शुद्धीकरणासाठी शासनाकडे कृती आरखडा तयार असून मलनिस्सारण केंद्राचे आधुनिकरण करण्यासाठी केंद्र सरकारच्या ’अमृत’ योजनेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे सविस्तर प्रकल्प अहवालास मान्यता देणार आहे. नुकतीच ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानमंडळात दिली. या विषयावर माहिती देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी त्र्यंबकेश्वर येथील गोदावरी नदी स्वच्छतेबाबत हरित लवाद (ग्रीन ट्रीब्यूनल) प्राप्त तक्रारीनुसार एक कोटी रुपयांचा दंड संबंधितास केला असल्याकडे लक्ष वेधले त्र्यंबकेश्वर येथे १.८ ‘एमएलडी’ सांडपाणी निर्माण होते. यासाठी शासनाच्यावतीने १.९ ‘एमएलडी’ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नगरोत्थान योजनेतून राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाचे ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या डिसेंबरपर्यंत १०० टक्के काम पूर्ण होणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तोपर्यंत गोदावरी नदीपात्रात प्रक्रिया केलेले पाणी सोडले जाणार आहे. मनपाच्या मलजल प्रकल्पाचे अत्याधुनिकरण केले जाणार असून त्यासाठी केंद्राच्या ‘अमृत’ योजनेचा आधार घेतला जाणार आहेे. तो पूर्ण झाल्यास निदान त्यानंतर तरी गोदावरीत मलजलयुक्त पाणी मिसळणार नाही, अशी अपेक्षा. योजना चांगल्या असतात, पण त्या फसतात कुठे, हे गुपित आहे. निदान आता तरी गोदामाईला ‘अमृत’स्पर्श होऊन ती शुद्ध, पवित्र आणि निरल, नितळ व्हावी, अशी नाशिकरांची अपेक्षा आहे. मध्यंतरी नाशिकमधील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रामकुंडामध्ये रक्तशोषक किडे आणि अळ्या झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे त्वचाविकाराचा धोकाही संभावला. त्यामुळे गोदापात्रातील सर्व कुंडातील काँक्रिट काढून तिचा गुदमरलेला श्वास मोकळा करणे, हाही उपाय योग्यच. त्यामुळे नदीचे अंतर्गत जलस्रोत मोकळे होण्यासह नदीची ’जीनबँक’ पुन्हा पुनर्जीवित होऊन मरणासन्न नदी जीवंत होईल.


विद्यार्थी समुपदेशनाचा स्तुत्य उपक्रम


 
विद्यार्थ्यांनी शिक्षण अर्थवट सोडू नये, याकरिता नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांचे संपूर्ण समुपदेशनासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली. हा निर्णय स्वागतार्ह तितकाच स्तुत्य ठरावा. विद्यापीठाने अर्थसंकल्पात संशोधन अन् विद्यार्थी कल्याण व शिष्यवृत्तीवर योजनांवर अधिक लक्ष केंद्रित करुन विद्यार्थ्यांच्या हिताचे काही निर्णय घेतले आहे. वैद्यकीय शिक्षण दिवसेंदिवस अधिक महाग होत चालले आहे. समाजाचे स्वास्थ चांगले राहण्यासाठी चांगले डॉक्टर्स निर्माण होणे काळची गरज आहे. वैद्यकीय, आरोग्य क्षेत्र जीवनाश्यक गरज असून आजचे विद्यार्थी उद्याचे डॉक्टर आहेत. वैद्यकीय शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना अनेक अडथळे, आव्हाने येतात. वैद्यकीय शिक्षण संस्थेत स्थानिक विद्यार्थ्यांचे प्रमाण अगदीच एक किंवा एक टक्के इतके कमी असते. त्यामुळे ९९ टक्के विद्यार्थ्यांना इतर शहरात जाऊन शिक्षण पूर्ण करावे लागते. हे अत्यंत बुद्धीचे काम असून अभ्यासाचा ताण विद्यार्थ्यांवर असतोच शिवाय वसतीगृह, ‘पेईंग गेस्ट’ किंवा रुम ’शेअर’ करुन राहावे लागते. बाहेरचे मेसचे जेवण. आर्थिक समस्या यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य ढासळते. त्याचा परिणाम म्हणून शिक्षण अर्धवट सोडण्यासारखे निर्णय विद्यार्थी घेतात. वाढत्या ताणतणावामुळे वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी आत्महत्येकडेही प्रवृत्त होतात. या सर्व पार्श्वभूमीवर आरोग्य विज्ञान विद्यापीठाने आता विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे अधिक लक्ष केंद्रित करुन वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अर्धवट सोडू नये अर्थसंकल्पात केलेली तरतुद स्तुत्य आहे. हे टाळण्यासाठी विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्ट. जनरल (निवृत्त) माधुरी कानिटकर यांचे विद्यार्थ्यांना मानसिक आधार देणारे समुपदेशनाचे पाऊल निश्चितच स्वागतार्ह ठरते. नाशिकचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू ठेवून अनेक उपयुक्त, अभिनव उपक्रम, कार्यक्रम नेहमीच घेत असते. भावी डॉक्टरांचे मानसिक आरोग्य विद्यार्थी दशेत निरामय राहिले, तर आजचे हेच विद्यार्थी उद्या समाजाचे स्वास्थ निरामय ठेवण्यास हातभार लावणार आहेत, असे विद्यार्थीकेंद्रित उपक्रम आदर्श शिक्षण संस्थेचे द्योतक असतात.
-निल कुलकर्णी


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.