धारावीतील महिलांनी गिरवले मासिक पाळी आरोग्याचे धडे
जागतिक मासिक पाळी आरोग्य दिनानिमित्त डीएसएमच्या माध्यमातून शिबिराचे आयोजन
30-May-2025
Total Views |
मुंबई, आशियातील सर्वात दाट लोकवस्ती असलेल्या भागात महिलांचे आरोग्य सुधारण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल म्हणून दि. २८ मे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त धारावी रिसोर्स सेंटर येथे 'सध्याच्या राहणीमानात मासिक पाळीच्या स्वच्छतेवर जागरूकता सत्र' आयोजित करण्यात आले. धारावी सोशल मिशनने फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने 'धारावी स्वास्थ्य साथी' उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या या कार्यक्रमात महिला आणि किशोरवयीन मुलींना खुल्या संवाद, व्यावहारिक मार्गदर्शन आणि सामूहिक चर्चेसाठी एकत्र आणले.
या सत्राचा उद्देश केवळ आवश्यक आरोग्य माहिती प्रसारित करणेच नव्हता तर धारावीत महिलांना भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक आव्हानांना थेट तोंड देणे हा होता. कारण धारावीत महिलांची राहणीमानाची परिस्थिती मर्यादित आहे. वैयक्तिक स्वच्छतेच्या मर्यादित उपलब्धता आहे. त्यामुळे महिलांची मासिक पाळीच्या काळात कुचंबना होते. २००७ पासून धारावीत राहणारी शबनम इर्शाद फारुकी सांगते, "आम्ही घरी सॅनिटरी नॅपकिन्स ठेवू शकत नाही आणि रात्री सार्वजनिक शौचालये दूर आणि कुलूपबंद असतात. मासिक पाळीच्या वेळी आम्हाला शौचालयाची आवश्यकता असते. जर आमच्या घरात शौचालय असते तर आज परिस्थिती खूप वेगळी असती."
२००६ मध्ये बिहारहून धारावीत स्थलांतरित झालेल्या चांद तारा यांनी या निकडीचा पुनरुच्चार केला. "शौचालये मध्यरात्री बंद होतात, पण मासिक पाळीच्या वेळापत्रकानुसार होत नाहीत. आम्हाला दर ३ ते ६ तासांनी पॅड बदलायला शिकवले जाते, पण कुठे? स्वच्छ, सुरक्षित जागांशिवाय आम्हाला संसर्गाचा धोका असतो, पण आमच्याकडे कोणता पर्याय आहे? जेव्हा पुनर्विकास होईल तेव्हा आमची सर्वात मोठी अडचण संपुष्टात येईल."
या प्रत्येक महिलांसाठी आरोग्य हे केवळ औषध किंवा जागृकतेशी जोडलेले नाहीतर ते पायाभूत सुविधा, सुरक्षितता आणि प्रतिष्ठेशी जोडलेलं आहे. धारावीत मासिक पाळीदरम्यानचे आरोग्य हे मर्यादित जागेच्या प्रश्नाचा अविभाज्य भाग आहे. मासिक पाळीच्या आरोग्याला सार्वजनिक चर्चेत आणण्याचा धारावी सोशल मिशनचा हा प्रयत्न प्रत्येक महिलेपर्यंत माहिती पोहोचवण्याची आणि महत्त्वपूर्ण बदलांच्या दिशेने नेण्याचे संकेत देते. परंतु महिलांनी स्पष्ट केल्याप्रमाणे, वैयक्तिक शौचालये, स्वच्छता उत्पादनांची उपलब्धता आणि सुरक्षित विल्हेवाट व्यवस्था या केवळ सुधारणा नाहीत तर त्या महिलांच्या आरोग्याशी जोडलेल्या तातडीच्या गरजा आहेत. ज्या भविष्यात पुनर्विकास प्रकल्पातूनच भागविल्या जातील.