कुंडलिनीशक्ती - ज्ञान-विज्ञान भाग २०

    16-Mar-2023
Total Views |
Kundalini Shakti


उत्क्रांती गतीतून जीव गेल्यास क्रमाक्रमाने तो पूर्णत्वास प्राप्त करू शकतो. पण, त्यासाठी आणखी अगणित काळ वाट पाहावी लागेल. मानव देह उत्क्रांतीचे उच्चपद होय. पण, अजून एक अतिउच्च पद शिल्लक राहिले आहे आणि ते म्हणजे परमयोग्याचे परिपूर्ण शरीर होय. असल्या शरीरातीलपेशीत स्पंदन करणारे गुणाणू परिपूर्ण गुणांनी प्रेरित राहतील म्हणून तो योगी सर्व उत्तम गुणांनी संपूर्ण असाच राहील. त्याच्या मेंदूतील सर्व पेशीकेंद्रे पूर्ण विकसित व कार्यरत झाल्याने असला योगी सर्वात उच्च बुद्धिमान व ज्ञानी राहील. सामान्य माणसातील पेशीगुणाणू व बुद्धिकेंद्रे अविकसित असतात. प्रकृतीने मानवास अगोदरच सर्व देऊन ठेवले आहे, पण त्याचा योग्य उपयोग मानव अज्ञानामुळे करू शकत नाही. त्यांचा योग्य उपयोग करण्याचा शास्त्रीय प्रयत्न म्हणजे कुंडलिनी जागृतीची साधना होय.


जडाच्या सर्व नियमांच्या वर जाऊन तो नित्य दिव्य अनुभव घेऊ शकतो. सर्व अनुभव घेऊन तृप्त झाल्यावर स्वेच्छेने तो देहत्याग करून या जड जगताचा निरोप घेतो. त्याचे जड शरीर पंचतत्त्वात विलीन होते आणि आत्मरूप परमात्मा रूपात विलीन होऊन शेवटी काहीच उरत नाही. नदी सागराला मिळते. एकरूप होते. यासाठी तिला आपले अस्तित्व सागरात विसर्जित करावे लागते. पण, आता ती सागर झालेली असते. यालाच ‘मुक्ती’ असे म्हणतात. इच्छित ध्येयात संपूर्ण समर्पण केल्याशिवाय ध्येय साध्य होत नसते. मनाच्या एकाग्रतेचे हेच रहस्य आहे. मूळ विश्व पूर्ण आहे ते पूर्णत्वास जन्म देते आणि शेवटी पूर्णत्वात विलीन होते. उपनिषदे सांगतात-


ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते । पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥ ॐ शांति : शांति : शांति :
कुंडलिनी जागृतीच्या विभिन्न साधना


कुंडलिनी जागृती म्हणजे आपल्या पिंडात बाहेरून काही नवीन संचारते असे नसून आपल्याच शरीरातील पेशीपेशीतून वर्तणार्‍या गुणाणूंची रचना पुन्हा उत्क्रांत दशेकरिता नवीनतम होऊन त्याद्वारे मेंदूतील सर्व केंद्रे विकसित झाल्याने दिव्य उत्क्रांत गुणांची व उच्च बुद्धीची जागृती आपल्यात होत असते. अनुक्रांत आचार विचारांमुळे पिंडातील असली उच्च उत्क्रांत गुणरचना पुन्हा अपक्रांत होऊन मानव खालील स्तरावर पुन्हा येऊ शकतो. म्हणून संत समागम व सत्प्रयास आणि तोही शास्त्रसंमत पद्धतीने करणे, हा सर्व साधनेचा गाभा होय. ध्यान व सद्विचार ही एकच साधना कुंडलिनी जागृतीसाठी पुरेशी आहे. ‘पिंडे पिंडे मतिर्भिन्न:’ या वचनानुसार प्रत्येकाच्या पिंड रचनेनुसार त्याची साधनासुद्धा विभिन्न असू शकते. परंतु, प्रत्येक साधनेचा परिणाम म्हणजे पेशीपेशीतील जुन्या अपक्रांत गुणाणूंची पूर्व रचना बदलून, त्या स्थानी उत्क्रांत गुणांना धरून गुण संस्कार पिंडातील गुणाणूंची पुनर्रचना होऊ देणे, हेच कुंडलिनी जागृतीचे रहस्य होय.

व्यक्ती पिंडधर्मानुसार मार्ग विभिन्न राहू शकतील. गुणाणूंच्या सापेक्ष रचनेप्रमाणे व्यक्तीत गुण उत्पन्न होत असतो, असे आता सिद्ध झाले आहे. मानवाचे विभिन्न स्वभावगुण त्याच्या कुंडल रचनेतील विभिन्न सापेक्ष गुणाणूंची रचना होय. बाहेरच्या प्राप्त संस्कारामुळे ही गुणाणूरचना अत्यंत धीम्या गतीने बदलत असते आणि यामुळे लक्षावधी कालानंतर जुन्या योनीतून नवीन योनी क्रमागत तयार होते. प्रकृतीत असले विवर्तन अतिशय मंद गतीने होत असल्याने त्यात बराच काल जातो. योग साधनेद्वारे हा कालावधी एकाच जन्माच्या कालावधीत लघु करता येतो. कुंडलिनी जागृती असलीच उत्क्रांतीची लघुसंधारणा होय.नवजन्म घेणारे बालक साधारणत: आपल्याच मातापित्यांचे गुण आपल्यात धारण करीत असते. हे गुण त्या बालकात त्याच्या पित्याच्या गुणसुत्राद्वारे आणि विशेषत: संस्कार केंद्राद्वारे (GENE) प्राप्त होत असतात. ही गुणसूत्र रचना अथवा संस्कार केंद्ररचना नवपिढीत जवळपास तशीच असते. नवजातावर जे बाह्य संस्कार होतात ते अतिमंद गतीने धारण केले जातात. त्यामुळे नवयोनी निर्माण होण्यात बराच म्हणजे लक्षावधी अथवा कोटी कोटी वर्षांचासुद्धा कालावधी लागतो. नवयोनींची गती इतकी विलक्षण मंद असते.

 
पृथ्वीवर दिसणार्‍या विभिन्न योनी म्हणजे अगणित काळातून शरीराची होणारी स्थित्यंतरे होत. ही स्थित्यंतरे जवळपास स्थायी स्वरूपाची असल्याने उत्क्रांतीच्या धोरणकाळाला धरून वागल्यास पूर्ण प्रगती करण्यास अगणित काल थांबावे लागले. परंतु, या प्रचंड उत्क्रांतीच्या कालौघात मानावाचे एक जीवन अतिशय लघु असल्याने ‘याचि देही याचि डोळा’ संपूर्ण उत्क्रांती मानवाला पाहता येणार नाही. या घोर निराशेतून वाचविण्याकरिता मानवाच्या साहाय्याकरिता कुंडलिनी जागृतीचे शास्त्र निर्माण झाले आहे. ते शास्त्र मूळचे भारतीय आहे, पण त्यात आता रस घेतला आहे पाश्चिमात्य लोकांनी. ते प्रयत्न करून त्यात प्रयोग करीत आहेत. त्यावर पाश्चिमात्य विद्वानांनी अनेक विशाल ग्रंथ लिहिले आहेत. परंतु, सत्य माहीत नसल्याने त्यांचा ग्रंथ प्रपंच व्यर्थ झाल्यासारखा वाटतो. कुंडलिनीचे स्वरूपच त्यांना माहीत नसल्यामुळे त्याच्या जागृतीबद्दलची कल्पनाही तितकीच व्यर्थ झाली आहे. या अनागोंदीचा लाभ उचलून भारतात काही तथाकथित बाबा, महात्मे, भगवान व माताजी उत्पन्न झाल्या आहेत. यांचा उद्योग एकच की, लोकांकडून धन उकळून व त्यासोबत मोठेपणाचा खोटा प्रचार करून कीर्तीचाही लाभ मिळवायचा.

कथित शक्तिपात करून ते कुंडलिनी जागृत करतात, असा त्यांचा अशास्त्रीय प्रचार असतो. भाबडे लोक त्यांच्या भूलथापांना बळी पडून आयुष्य व्यर्थ घालवितात आणि आपली कुंडलिनी जागृत झाली आहे, या व्यर्थ भ्रमात वावरत असतात. असे होत नसते. ज्याची कुंडलिनी त्यालाच स्वप्रयत्नाने जागृत करावी लागते. गुरू केवळ एक लहानसा झटका देऊन साधकाच्या पूर्वतयारीला व्यवस्थित आणीत असतो. कोणताही गुरू कुंडलिनी जागृत करीत नसतो. स्वप्रयत्न हाच कुंडलिनी जागृतीचा योग्य मार्ग आहे. भगवद्गीता स्पष्टच सांगते, ‘उद्धरेदात्मनाऽत्मानं नात्मानमवसादयेत्’ (श्रो.५ अ.६)

शक्तिपाताने कुंडलिनी जागृत करणार्‍यांना भगवद्गीता खालील दोन श्लोकांद्वारे स्पष्ट बजावून सांगते.
श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात्। स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः॥ (श्लोक. ३५ अ.३)
श्रेयान् स्वधर्मो विगुण: परधर्मात्स्वनुष्ठितात्।
स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ॥(श्लोक.४७ अ.१८)

 
 
अध्याय ६ मधील श्लोक ५चा आशय स्पष्ट आहे. स्वत:चा उद्धार स्वतःच्या प्रयत्नानेच करायचा असतो. दुसरा किंचित साहाय्य करेल, उद्धार नव्हे. डोक्यावर हात ठेवून अथवा पत्राद्वारे कुंडलिनी जागृत करण्याचा प्रयत्न अशास्त्रीय अतएव भ्रामक आहे. केवळ भावना विवशतेमुळे कुंडलिनी जागृत झाल्यासारखी वाटेल, पण खर्‍या अर्थाने ती जागृत होणार नाहीच. साधकांनी आपला विवेक सतत जागृत ठेवून साधना करावी.


 
-योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.