माध्यम‘कंटक’

    15-Mar-2023
Total Views |
Social Media


'समाजकंटक’ हा शब्द सगळ्यांनाच परिचित. त्यात हल्लीच्या ‘स्मार्ट’ युगात नवनवे तंत्र आणि प्रणाली येत असल्याने नवनव्या शब्दांचीही भर पडत आहे. यात ‘माध्यमकंटक’ हा एक नवा शब्द गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालत आहे. माध्यमकंटकाचे जनक काहीतरी आक्षेपार्ह मजकूर तयार करून किंवा फोटो अथवा व्हिडिओत फेरफार करून विविध प्रकारच्या समाजमाध्यमांत ते ‘व्हायरल’ करत असतात. असे केल्याने वातावरण चिघळविण्याचे प्रकार राजरोस घडू लागले. फेसबुक, ट्विटर आणि व्हाटॅसअ‍ॅप वापरकर्त्यांची संख्या आपल्याकडे लक्षणीय आहे. या माध्यमांवर टाकलेल्या आक्षेपार्ह मजकुरामुळे अनेकांना जीवानिशी फटका बसतो. काहींच्या नोकर्‍या, व्यवसाय किंवा जेथे कुठे सक्रिय आहेत, तेथून प्रतिमा मलीन झाल्यामुळे बाहेर पडावे लागते. समाजमाध्यमांवर बदनामी झाल्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाल्याच्याही घटना आपल्याकडे घडल्या आहेत. दुसर्‍यांच्या जीवाशी खेळणारी माध्यमकंटकांची टोळी कधी काय करेल, हे सांगता येत नाही. दंगेखोर किंवा अन्य समाजकंटक समोर दिसताच क्षणी त्यांच्यावर कारवाई केली जाते. मात्र, माध्यमकंटकात सक्रिय असलेले अदृश्य हात नेमके कुणाचे, हे शोधणे जिकरीचे होऊन जाते. दरम्यानच्या काळात त्याने किंवा त्याच्या समर्थकाने केलेल्या उपद्रवाची तीव्रता कमी-कमी होत जाते.अनेकदा महिला आणि मुलींनाही माध्यमकंटकांचा सामना करावा लागतो. यातील सर्वच प्रकार बाहेर येत नाहीत. अनेकदा बदनामी किंवा लाजेखातर महिलावर्ग माध्यमकंटकांचा फटका बसूनही शांत राहतात. त्यामुळे समाजमाध्यमांवर सक्रिय असलेल्या उपद्रवींचे फावते. वास्तविक, ज्या देशांतून या समाजमाध्यमांचा जन्म झाला आहे, तेथे असे प्रकार क्वचितच घडतात. आपल्याकडे मात्र सर्रासपणे आणि बिनदिक्कत समाजमाध्यमांतून बदनामी करण्याची कटकारस्थाने सुरूच आहेत. त्याचा फटका सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील मंडळींनाही बसतो.विरोधकांना नेस्तानाभूत करण्यासाठी समाजमाध्यमांतून बदनामी केली जाते. ज्याप्रमाणे विविध क्षेत्रांत साक्षरता चळवळ राबविल्या जातात, त्याचप्रमाणे माध्यमजगतात कसे वर्तन करावे, यासाठी माध्यमसाक्षरता ही आता काळाची गरज म्हणावी लागेल.
पालकांचे ओझे...


विद्यार्थ्यांच्या पाठीवर हल्ली दप्तराचे ओझे कायम दिसते. याबाबत पालकांची नेहमीच ओरड असते. त्यास प्रतिसाद देत शासन काहीना काही मार्ग काढायचाही जरुर प्रयत्न करते. मग पुन्हा काही दिवसांसाठी हा विषय थांबतो. पुन्हा दप्तराचे ओझे. पुन्हा शासनाचे परिपत्रक. असे हे चक्र सुरूच असते. वास्तविक, जे पालक आपल्या पाल्यासाठी दप्तराचे ओझे जास्त आहे, अशी ओरड करतात, त्यातील कितीतरी पालक आपल्या पाल्यांच्या मनावर अपेक्षांचे ओझे टाकतात. यावर पालकांनीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा सर्वत्र सुरू आहेत. परीक्षा कालावधीत पेपर कठीण जाणे किंवा कमी गुण मिळण्याच्या भीतीने काही विद्यार्थी आत्महत्येसारखा मार्ग अवलंबतात. विद्यार्थ्यांनी टोकाचा मार्ग स्वीकारण्याच्या घटना नववीपासूनच सुरू होत असतात. त्या पदवी परीक्षेपर्यंत सुरूच असतात. यात विद्यार्थ्यांपेक्षाही पालकांचाच अधिक दोष. आपल्या पाल्याने पुढे जाऊन डॉक्टर, इंजिनिअर व्हावे यासाठी पालक त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे लादतात. त्यासाठी महागड्या खासगी शिकवण्या, इंग्रजी माध्यमातील सुसज्ज शाळा यांसह मुलांवर नेहमीच असलेले अभ्यासाचे दडपण आणि आई-वडिलांच्या प्रचंड अपेक्षांचे ओझे, त्यातून दहावी-बारावीत असलेली ही निरागस मुलं मानसिकरित्या कमकुवत होतात. त्यातूनच नको ते प्रकार घडतात. ऐवढेच नाही, तर परीक्षेचा निकाल असतो, त्यादिवशीदेखील कमी गुण मिळाले म्हणून मुलं घर सोडून जाण्यापासून जीवनयात्रा संपविण्यापर्यंतचा मार्ग पत्करतात. यास कोण कारणीभूत? याचा सारासार विचार केल्यास पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखालीही कुमार वयातील मुलं आपलं आयुष्य संपवितात. मग त्याला जबाबदार कोण? याचा विचार पालकांनीच करायला हवा. पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्यामध्ये वाढणारी ही मुलं पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी मिळत नाही, यामुळेदेखील विचलित होतात. स्पर्धात्मक युग असले तरी पालकांनी अधिक सजग होऊन आपल्या पाल्यांवर अपेक्षांचे ओझे लादू नये, हीच सद्यःस्थितीची गरज आहे. एकीकडे दप्तराचे ओझे कमी करा, अशी ओरड करायची आणि दुसरीकडे पाल्यांवर अपेक्षांचे ओझे लादायचे, ही बाब प्रवाहाच्या विरुद्ध आहे. याची जाणीव पालकांना व्हायलाच हवी.
-मदन बडगुजर

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.