मुंबई : शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील उपाहारगृहात कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेचे बुधवारी विधिमंडळात तीव्र पडसाद उमटले. 'उबाठा' गटाने विधान परिषदेत आ. गायकवाड यांच्या निलंबनाची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेला 'चुकीचे' म्हटले असून, विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींनी यावर कारवाई करावी, असे सूचित केले आहे.
उबाठा गटाचे आमदार अनिल परब यांनी या घटनेवर तीव्र आक्षेप घेतला. "आमदार बनियन आणि टॉवेलवर येऊन कॅन्टिनमधील कर्मचाऱ्याला मारतो, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्ताधारी पक्षातील आमदारांवर काही वचक आहे की नाही?" असे सवाल करत त्यांनी संजय गायकवाड यांच्या तत्काळ निलंबनाची मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे राज्यातील जनता 'सुसंस्कृत मुख्यमंत्री' म्हणून पाहते, त्यामुळे त्यांच्याच सरकारमधील आमदारांकडून असे कृत्य होणे गंभीर आहे. आमदार हे काही गल्लीतील लोक आहेत का? ते टॉवेलवर येऊन कर्मचाऱ्याला मारतात, यांच्यात एवढी हिंमत आहे तर त्या खात्याच्या मंत्र्यांना मारा, असे परब म्हणाले.
मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे संकेत
अनिल परब यांच्या मागणीला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतल्याचे सांगितले. "अशा प्रकारामुळे सर्वच आमदारांची प्रतिष्ठा समाजात कमी होते. आमदार निवासात काही अनियमितता असेल तर त्याची स्वतंत्र चौकशी केली जाऊ शकते, मात्र लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे मारहाण करणे हे चुकीचे आहे," असे ते म्हणाले. अशा प्रकारांमुळे जनतेमध्ये आमदारांबद्दल चुकीची भावना निर्माण होते आणि 'आमदार सत्तेचा गैरवापर करतात' अशी समजूत होते, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. त्यामुळे अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या आमदारांबद्दल विधानसभा अध्यक्ष आणि सभापती यांनी या प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.