संजय गायकवाडांच्या कृतीचे समर्थन नाहीच! मंत्री उदय सामंत यांचा घरचा आहेर

    09-Jul-2025   
Total Views |

मुंबई : संजय गायकवाड यांच्या कृतीशी आम्ही कुणीही सहमत नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. आमदार निवासातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांना त्यांनी घरचा आहेर दिला.

विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, "संजय गायकवाड यांच्या कृतीशी आम्ही कुणीही सहमत नाही. अन्नात भेसळ होती, ते नसलेले होते, अन्न खाण्याजोगे नव्हते हे निर्विवाद सत्य आहे. परंतू, त्यावर काही कार्यपद्धती असते ती त्यांनी करायला हवी होती. त्यांनी जी मारहाणीची भूमिका घेतली त्याचे कुणीही समर्थन करणार नाही," असे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे समज देतील

"याबाबतीत स्वतः शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब त्यांना समज देतील. आम्हीसुद्धा यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करू. परंतू, त्यांनी केलेल्या मारहाणीचे समर्थन कुणीही करणार नाही. निकृष्ट अन्न देणे हे सर्वांच्याच प्रकृतीसाठी घातक असून त्याबाबत योग्य ती चौकशी करू," असेही ते म्हणाले.

प्रताप सरनाईक यांची भूमिका कौतुकास्पद

"प्रताप सरनाईक यांनी मीरा-भाईंदरमध्ये जाऊन मराठीबद्दल मांडलेली भूमिका कौतुकास्पद आहे. मराठी माणसाच्या मोर्चात ते स्वतः सहभागी झाले. त्यांनी स्वतःची आणि शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. परंतू, तिथे जो प्रकार घडवण्याचा प्रयत्न झाला ते उबाठाचे लोक होते. आम्ही चांगले काम केलेले त्यांना सहन होत नसल्याने त्यांनी हुल्लडबाजी केली," असेही मंत्री उदय सामंत म्हणाले.


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....