नकारात्मकतेला दूर करणारे सकारात्मकतेचे सूर

    14-Mar-2023
Total Views |
Negativity


सकारात्मक विचार मानसिक आरोग्य सुधारू शकतो, तणाव कमी करू शकतो आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्यदेखील चांगले करू शकतो, तरीही आपल्यापैकी बरेचजण नकारात्मक विचारांच्या जाळ्यात बर्‍याच वेळा अडकले आहेत.

तुम्हाला कदाचित काही व्यक्तींकडून सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा जाणवण्याचा अनुभव बर्‍याचवेळा आला असेल. काही संशोधकांचा असा विश्वास आहे की, अशी ऊर्जा खरंच असते आणि ती मोजण्यासारखी असते. इतरांचा असा विश्वास आहे की, लोक इतरांकडून राग, दुःख आणि इतर नकारात्मक भावना आपल्या शरीरात आणि मनात शोषून घेत असतात. या भावना उघडपणे जरी व्यक्त होत नसल्या, तरी काही मौखिक आणि शारीरिक संकेतांद्वारे जाणवत राहतात. नकारात्मक ऊर्जेचा प्रौढ, किशोरवयीन आणि मुलांवर खोलवर परिणाम होतो. अशी प्रतिकूल वृत्ती बाळगणारे लोक त्यांच्या अवतीभवती उपस्थितीत असलेल्या लोकांसाठी खूप सामर्थ्यवान दिसू शकतात. नकारात्मक ऊर्जा तुमच्या किंवा तुमच्या मित्रांचा अपमान करून व त्यांचे महत्त्व कमी करून व्यक्त केली जाते. या टीका-टिप्पण्या थेट तुमच्या तोंडावर किंवा तुमच्या पाठीमागे केल्या जातात.
‘नकारात्मक ऊर्जा’ म्हणजे नक्की काय?
 
 
आपल्याकडे नकारात्मक ऊर्जा मोजण्यासाठी तंत्रज्ञान नसेल, परंतु नकारात्मक ऊर्जा कशी वाटते, हे आपल्यापैकी सगळ्यांना कदाचित माहीत असेल. ही ऊर्जा नकारात्मक लोकांकडून, तुमच्या सभोवतालच्या वातावरणातून किंवा तुमच्या स्वतःच्या मानसिकतेतून येऊ शकते. नकारात्मक ऊर्जा म्हणजे मनातील नकारात्मक विचार, जे एखाद्या व्यक्तीच्या मनात ठाण मारून बसतात आणि नकारात्मक भावना आणि नकारात्मक कृती निर्माण करतात. या नकारात्मक भावना-भय, राग, मत्सर किंवा अगदी द्वेष अशा कोणत्याही प्रकारच्या असू शकतात, आणि लोकांना नकारात्मक वागण्यास प्रवृत्त करतात. तुम्हाला ही ऊर्जा मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही प्रकारे थकवू शकते. नकारात्मक ऊर्जा आपले अस्तित्व शाश्वत ठेवते म्हणून, अधिक नकारात्मकतेचे प्रसारण करते. आरोग्यासाठी आणि आनंदासाठी या नकारात्मक ऊर्जेचा सामना करायला शिकणे महत्त्वाचे आहे.

नकारात्मक ऊर्जेचे प्रकार


जोपर्यंत तुम्ही नकारात्मक ऊर्जेचे स्रोत जाणून घेत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या ऊर्जेचा सामना करू शकत नाही.
 
नकारात्मक लोक


अनेक वेळा तुमच्याशी प्रत्यक्ष संवाद करायला नकार दिल्याने एखाद्याकडून तुमच्याबद्दलची नकारात्मक ऊर्जा व्यक्त होऊ शकते. तुम्ही प्रश्न विचारून त्याला बोलायला भाग पाडायचा प्रयत्नही कराल, पण तो एकतर तुमच्याकडे दुर्लक्ष करेल किंवा काहीही, मला त्याची पर्वा नाही किंवा मला त्यात स्वारस्य नाही, अशा टिप्पण्या देत राहील. तो तुम्हाला तिरसटासारखी वागणूक देऊन आणि तुम्ही त्याच्यासाठी खरोखरच अस्तित्वात नाही, असा आभास करूनही तो आपली नाराजी व्यक्त करू शकेल. हे नकारात्मक लोक सहसा कोणत्याही गोष्टीबद्दल किंवा कोणाबद्दल जास्त उत्साह दर्शवत नाहीत. ते उदास आणि क्षुब्ध असतात. नकारात्मक ऊर्जा अनेकांना जबरदस्त आणि भयावह वाटण्याची अनेक कारणे आहेत. आपल्या समाजात आपल्याला हा संदेश नेहमी दिला जातो की, यशस्वी होण्यासाठी आपण इतरांपेक्षा अनेक पटीने चांगले असले पाहिजे. म्हणून ही अशी मानसिकता एक रोगट स्पर्धा निर्माण करते. त्यामुळे अशा परिस्थितीत सहकार्याची भावना नक्कीच लोकांच्या मनात वाढणार नाही.
 
जे लोक नकारात्मक ऊर्जेने भरलेले असतात. त्यांच्या स्वतःच्या वेगळ्या समस्या असतात. त्यांच्याकडे सहसा जास्त आत्मविश्वास नसतो आणि ते शारीरिकदृष्ट्या आकर्षक, हुशार किंवा प्रतिभावान आहेत, असे त्यांना स्वतःलाच वाटत नाही. म्हणून ते स्वतःबद्दलची निंदाजनक वृत्ती उंचावण्याच्या प्रयत्नात इतरांची कुचेष्टा करतात. एखाद्या व्यक्तीमध्ये नकारात्मक ऊर्जा नक्की काय करते, तर ती नकारात्मक भावना नकारात्मक क्रियांद्वारे मुक्त होईपर्यंत काही काळ साठवून ठेवते. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमचा राग मनात धरून काही काळ ठेवत असाल, तर तुम्ही शेवटी नियंत्रण गमावून कोणावर तरी ओरडत सुटत नाही, तोपर्यंत तो वाढतच जाईल. बहुतेक लोकांना याची जाणीव नसतानाही नकारात्मक ऊर्जेचा सामना करावा लागतो. तुम्ही तुमच्या आयुष्यातील अशा टप्प्यांतून गेला आहात का, जेथे तुम्ही सतत नकारात्मक भावना अनुभवत असाल? जर होय, तर तुम्हाला स्वतःला नकारात्मक ऊर्जा जाणवली आहे.

काही नकारात्मक ऊर्जा उत्सर्जकांना ते नक्की काय करत आहेत, याची कदाचित जाणीव असू शकते. परंतु, इतरांना बर्‍याचदा हे माहिती नसते. एखाद्या व्यक्तीची अशी सूक्ष्म अव्यक्त नकारात्मक ऊर्जा असते, ती त्यांच्या स्पष्ट दिसणार्‍या नकारात्मक वर्तनापेक्षा अधिक हानिकारक असते.बहुतेक लोकांना याची जाणीव नसतानाही नकारात्मक ऊर्जेचा सामना करावा लागतो. तुम्ही तुमच्या आयुष्यातील अशा टप्प्यातून गेला आहात का, जेथे तुम्ही सतत संताप द्वेष यांसारख्या नकारात्मक भावना अनुभवत असाल? जर होय, तर तुम्हाला स्वतःला ती नकारात्मक ऊर्जा अंतरंगात जाणवली आहे. बहुतेक लोकांना याची जाणीव नसतानाही नकारात्मक ऊर्जेचासामना करावा लागतो. नकारात्मक विचार ही एक गोष्ट आहे, जी आपण सर्वच वेळोवेळी करत असतो. परंतु, दीर्घकाळ व सातत्याने बाळगलेली नकारात्मकता आपले मानसिक आरोग्य नष्ट करू शकते, ज्यामुळे आपण निराश आणि चिंताग्रस्त होऊ शकता.
 
विज्ञान सांगते की, सकारात्मक विचार मानसिक आरोग्य सुधारू शकतो, तणाव कमी करू शकतो आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यदेखील चांगले करू शकतो, तरीही आपल्यापैकी बरेचजण नकारात्मक विचारांच्या जाळ्यात बर्‍याच वेळा अडकले आहेत. जर तुम्ही तुमच्या विचारांचे विश्लेषण करणारी व्यक्ती असाल, तर प्रत्येकाच्या नेहमीच्या चिंतांपेक्षा नकारात्मक विचार वेगळे करणे बर्‍याचदा आव्हानात्मक असू शकते. एखाद्या अस्वस्थ करणार्‍या घटनेबद्दल दुःखी वाटणे, हे सर्वसामान्य आहे, ज्याप्रमाणे आर्थिक ओझे किंवा नातेसंबंधातील समस्यांबद्दल काळजी करणे, हे आपण सर्व वेळोवेळी करतो. जेव्हा त्या भावना पुनरावृत्ती करणार्‍या आणि व्यापक असतात, तेव्हा मात्र खूप समस्या उद्भवतात. अशावेळी माणसाला प्रश्न पडतो की, मी इतका नकारात्मक आणि रागावलेला आणि उदास का आहे? नकारात्मक विचारसरणी तुमच्या स्वतःबद्दल आणि जगाबद्दल विचार करण्याच्या पद्धतींवर गंभीरपणे परिणाम करते आणि दैनंदिन जगण्यात व कामकाजात व्यत्यय आणते. यासाठी नकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जेने पुसली जाणे आवश्यक आहे. जीवनकौशल्याशी निगडित एका संशोधकाने छान सुचविले आहे की, इतरांच्या नकारात्मक ऊर्जेच्या वर राहावयाचा प्रयत्न करा. त्यांच्या नकारात्मकतेचा तुमच्यावर परिणाम होऊ देण्यास पूर्णपणे नकार द्या. त्याऐवजी तुमच्या सकारात्मक ऊर्जेला त्यांची नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याची संधी द्या.-डॉ. शुभांगी पारकर

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.