राहुल गांधींना देशाची माफी मागावीच लागेल!

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बरसले

    13-Mar-2023
Total Views |
speculation-on-rahul-gandhi-statements-in-parliament-rajnath-singh-said-rahul-insulted-the-country-in-london


नवी दिल्ली
: परदेशात जाऊन भारताची आणि भारताच्या लोकशाहीची बदनामी करणाऱ्या राहुल गांधी यांना देशाची माफी मागावीच लागेल, असे अतिशय सौम्य मात्र धारदार शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितले. त्यानंतर केंद्र सरकारला घेरण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेस पक्षाचे नेते शब्दश: गपगार पडल्याचे दिसून आले.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यास सोमवारपासून प्रारंभ झाला. यावेळी केंद्र सरकारला घेरण्याची काँग्रससह विरोधी पक्षांनी पूर्ण तयारी केली होती. गेल्या काही दिवसात लालूप्रसाद यादव यांच्यासह अन्य नेत्यांवर पडलेल्या ईडीच्या धाडी, मनीष सिसोदिया यांची अटक, सीबीआयच्या कथित गैरवापर, अदानी आणि हिंडनबर्ग प्रकरण आदी मुद्द्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा पूर्ण प्लॅन तयार होता. त्यानुसार, सकाळी ११ वाजता लोकसभेच्या कामकाजास प्रारंभ झाला. प्रारंभी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अनेक नेत्यांच्या निधनाबद्दल शोकसंदेश वाचले. त्यावेळी वातावरण शांत होते. सर्व सदस्यांनी उभे राहून श्रध्दांजली वाहिली.

आणि राजनाथ सिंह बरसले

 
श्रद्धांजली वाहून झाल्यानंतर काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष गदारोळ करण्याच्या तयारीत होते. मात्र, विरोधकांनी सूत्रे हाती घेण्यापूर्वीच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उभे राहिले आणि त्यांनी आपल्या खास सौम्य मात्र धारदार शैलीत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर सडकून टिका केली.

राजनाथ सिंह म्हणाले, राहुल गांधी हे लोकसभेचे सदस्य आहेत. त्यांनी लंडनमध्ये जाऊन भारताची बदनामी करण्याच प्रयत्न चालविला आहे, भारतातील लोकशाही व्यवस्था पूर्णपणे उध्वस्त होत असल्याचा अतिशय लाजिरवाणा आरोप त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे परदेशी शक्तींनी भारतामध्ये हस्तक्षेप करून येथील लोकशाही वाचवावी, असे सांगून राहुल गांधी यांनी भारताच्या प्रतिष्ठेस तडा दिला आहे. हे अतिशय गंभीर कृत्य असून संपूर्ण सभागृहाने त्यांच्या वक्तव्यांचा निषेध करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांना सभागृहात येऊन संसदेची आणि देशाची माफी मागावीच लागेल, असेही राजनाथ सिंह यांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितले.

पंतप्रधानांचा अध्यादेश फाडला, तेव्हा लोकशाही धोक्यात होती – गोयल


लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही सभागृह नेते पियुष गोयल यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला झोडपले. ते म्हणाले, राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारताची लोकशाही, न्यायव्यवस्था, सैन्य, केंद्रीय निवडणूक आयोग आणि प्रसारमाध्यमांवर खोटे आरोप लावले आहेत. काँग्रेससह विरोधी पक्षांनी भारताची बदनामी करण्याचे ठरविले आहे. देशात लोकशाही धोक्यात असल्याचे आरोप करणाऱ्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी आणिबाणी लादणे, पंतप्रधानांनी मंजुर केलेला अध्यादेश फाडून टाकणे, विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त करणे असे प्रकार करून लोकशाही धोक्यात आणली होती. त्यामुळे राहुल गांधी यांनी सभागृहात येऊन देशाची माफी मागावी, असे केंद्रीय मंत्री गोयल यांनी म्हटले आहे.

दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पियुष गोयल यांच्या आक्रमकतेने काँग्रेस पक्ष चांगलाच घायाळ झाला. तरीदेखील राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारवर टिका करण्याच क्षीण प्रयत्न केला.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.