महिलांना सक्षम करणारी रुमा देवी

    12-Mar-2023   
Total Views |
Ruma Devi

राजस्थानच्या बारमेर खेड्यातून एक संस्था हस्तशिल्प तसेच तत्सम गृहोद्योग करून शेकडो घरे चालवते. तसे म्हटले तर राजस्थानात हस्तशिल्प आणि कलाकुसर काही नवीन नाही. घराघरातून स्त्रिया हेच करताना दिसतात. मग ‘ग्रामीण विकास एवं चेतना संस्थान’चे कार्य काय वेगळे? राजस्थानातील रुमा देवी यांनी अत्यंत संघर्षमय वातावरणात आपले स्वतःचे स्थान निर्माण केले. त्यांच्याविषयी..

१९७१ च्या सालात निर्वासित भारतभर पसरले तेव्हा राजस्थानात आलेल्या निर्वासितांनी ही कला येथील लोकांना विकून आपला चरितार्थ चालवला. त्यावेळेपासून स्त्रिया पडद्याआड राहून कलाकुसर करायची कामे करत, तर या वस्तू बाजारात घेऊन जाऊन विक्रीचे काम पुरुष करत. आपसूकच येणार पैसे पुरुषांच्या हातात राहिला. व्यसने, बेरोजगारीची शिकार झालेले काही पुरुष मिळालेले पैसे घरी न देता स्त्रियांना मारहाण करत. अशावेळी दुर्बल आणि गरीब स्त्रियांना मुलाबाळांचे घर व चरितार्थ कसा चालवावा, हे समजत नाही. या स्त्रियांसाठी गावातल्या गावात बाजारपेठ, प्रशिक्षण व संधी उपलब्ध करून दिली, ती मूळ ‘फॅशन डिझायनर’ असलेल्या डॉ. रुमा देवी यांनी.

रुमा लहान असताना घरोघरी पाणी नेऊन देई. त्याबदल्यात तिला पैसे मिळत. एका फेरीचे २० रुपये मिळाल्याशिवाय रुमी तिथून निघत नसे. कामाचे बरोबर पैसे मिळाले की ती पुढच्या घरी जाई. रुमाचे शिक्षण आठवीपर्यंत झाले आणि तिला शाळा सोडावी लागली. तिचे लग्न झाले होते. आता तिची रुमा देवी झाली होती. परंतु, घरात फार पैसे नसत. कमी मिळकतीत चरितार्थ कसा चालवावा, हा प्रश्न तिला रोजच पडे. नवर्‍याचे शिक्षण झाले नव्हते, अशातच तिला बाळ झाले व ते गेले. खचून गेलेली रुमा देवी आता कामाच्या विवंचनेत अडकली. घराबाहेर पडणे सोडाच पदर वर करून आपल्या पतीकडेही दिवसा पाहू शकत नसलेली रुमा देवी करणार काय?

घरातून, समाजातून विरोध होत असताना रुमा बाहेर पडली. कपडे व्यापार्‍यांकडून कापड आणून त्यावर कशिदा करून देण्याचे काम ती करू लागली. त्यात तिला फारच कमी पैसे मिळत. विरोध होता तो होताच. घरातले सर्व काम आटपून वेळ मिळेल, तसे ती काम करत असे व मिळालेल्या तुटपुंज्या कमाईत अर्धा भाग जमवून ठेवत असे. वर्षभर काम केल्यानंतर बाजूच्या घरातील ललिता आली तिच्या मदतीला. दोघी मिळून काम करू लागल्या. पैसेही थोडे जास्त मिळू लागले. आता तिने इतर स्त्रियांना मदतीला घेऊन काम करण्यास सुरुवात केली.

आजीकडून शिकलेली कला अशी उपयोगाला येईल, हा विचारच कधी केला नव्हता. बाहेरच्या जगाशी टक्कर घ्यायची म्हटली तर घरातून खंबीर आधार लागतो. घर सुटलं होताच, सर्वांकडून विरोध होताच. समाजातील इतर स्त्रियाही रुमाला पाहिल्यावर नाके मुरडीत. पण गरज तिला स्वस्थ बसू देत नव्हती. कधी अचानक बाजारात जाऊन सामान घेऊन यावे लागे. अनेक प्रश्न पाठ सोडत नसत. लोकांच्या नजरा प्रश्न करत.

७ जुलै, १९९८ या दिवशी या आगळ्या समाजकार्याचे बीज प्रथम रोवले गेले. स्त्रियांना समृद्ध करायचे, तर समाजाशी वाकडे घेऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करणे, समाजव्यवस्था विस्कळीत करण्यासाठी कारणीभूत ठरेल. अशावेळी गावातल्या गावात त्यांना प्रशिक्षण देऊन कच्च माळ पुरवून त्यांच्याकडून सुंदर वस्तू बनवून घेतल्या जातात. त्यांना बाजारपेठ देऊन त्यांच्या हातातच मोबदल्याचे पैसे मिळतात. ग्रामीण भागात आजही जिथे वीज, पाणी आणि जीवनोपयोगी वस्तूंसाठी घेऊन संघर्ष करावा लागतो, त्या खेडवळ भागात कलाकार महिलांना हस्तकलांच्या जोरावर रोजगार मिळवून देण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. एकूण सात सदस्य आणि २० जणांचा चमू एकत्रितपणे हे कार्य २४ वर्षे अविरत करीत आहे. २५० गावांतील ३० हजारांहून जास्त महिलांना रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या महिलांकडून ५० हून अधिक प्रकारच्या कला आणि २५ हून अधिक कुसरी करवून घेतल्या जातात.

या उपक्रमाअंतर्गत महिलांसाठी मोफत जागरूकता कार्यशाळा राबवल्या जातात. शिलाई मशीन तसेच सौरऊर्जेवर चालणार्‍या दिव्यांचे वाटप केले जाते. किमान शिक्षण असावे, यासाठी गरजेपुरते वाचता व लिहिता यावे, इतके शिक्षण दिले जाते. संपर्क वाढवण्यासाठी विपणन कार्यशाळा तसेच ‘स्मार्टफोन’चेही वाटप केले जाते. सर्व प्रकारच्या मोफत प्रशिक्षणासोबत आरोग्य तपासणीसुद्धा केली जाते. कोरोना महामारीच्या काळातही या स्त्रियांनी अनेक उपक्रम हाती घेऊन अनेक उत्पादने बनवली.
 
रुमा देवी यांच्या कार्यासाठी व महिला सशक्तीकरण, रोजगारवर्धन, क्राफ्ट उत्थान, कला आणि संस्कृती संवर्धन इत्यादी उपक्रमांमुळे १०० हून अधिक पुरस्कार राष्टीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळाले आहेत. विशेष म्हणजे, हे सर्व पुरस्कार २०१९ ते २०२१ या तीन वर्षांच्या काळात जाहीर झाले आहेत. महिला सबलीकरण व सशक्तीकरणासोबतच त्यांना ‘डिजिटली’ साक्षर करून जगाच्या बाजारपेठेत आपल्या कलेच्या जोरावर उभे राहण्याचा आत्मविश्वास प्रदान केला तो रुमा देवी यांच्या प्रयत्नातून. त्यांच्या कारकिर्दीला आणि व्यक्तिमत्त्वाला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून अनेकानेक शुभेच्छा!आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.