कराडमध्ये दोन महिन्यांच्या बिबट्याच्या पिल्लाला वनविभागाने दिले जीवदान

विहिरीत पडलेल्या पिल्लाला वाचवत पुन्हा केले आईच्या स्वाधीन

    03-Dec-2023
Total Views | 111
karad leopard



मुंबई (विशेष प्रतिनिधी):
कराडमधील गमेवाडी गावातील एका शेतातील विहिरीत शनिवार दि. २ डिसेंबर रोजी बिबट्याचे पिल्लू पडले होते. गमेवाडीतील म्हसोबा शिवारात उत्तम शंकर जाधव यांच्या शेतातील विहिरीत हे बिबट्याचे पिल्लू पडले असल्याचे लक्षात येताच त्यांनी या घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील शंकर जाधव यांना दिली. त्यानंतर कराडचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार नवले यांना या घटनेबाबत माहिती देण्यात आली.

या पिल्लाचे बचावकार्य करण्यासाठी वनविभागाचे पथक तसेच रेस्क्यू सीटीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सकाळी १० च्या सुमारास बिबट्याचे पिल्लू विहीरीतुन बाहेर काढल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दोन महिन्यांचे नर जातीचे हे बछडे असून वैद्यकीय तपासणीमध्ये ते सुखरुप असल्याचे लक्षात आले. सुस्थीतीत असलेल्या या पिल्लाला मादी बिबट्यासोबत पुनर्भेट घडवुन आणण्यासाठी लगेचच तयारी करण्यात आली. मादी फिरत असलेल्या ठिकाणी या पिल्लाचा पिंजरा लावण्यात आला. त्याच रात्री ९:३० वाजता मादी बिबट आपल्या बछड्याला सुखरुपपणे सोबत घेऊन गेली.

दरम्यान, सुरक्षित अंतरावर राहुन पुलीच्या सहाय्याने अशाप्रकारचे पुनर्मिलन घडवुन आणले जाते. पिंजऱ्याच्या भवताली काही अंतरावर कॅमेरे लावण्यात येत असून त्यामध्ये मादीची हालचाल दिसून आल्यानंतरच पिल्लाला दोरीच्या सहाय्याने पिंजऱ्याचे दार उघडत आईच्या स्वाधीन केले जाते. रेस्क्यू मोहिमेत कराड वनविभागाचे वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल बाबुराव कदम, वनरक्षक कविता रासवे, वनरक्षक राठोड, वनमजूर मयूर, शिबे, योगेश बेडेकर, प्राणीमित्र अजय महाडीक, रोहीत कुलकर्णी, गणेश काळे, मयुर लोहाना, मयुरेश शानबाग, पोलीस पाटील शंकर जाधव यांनी सहकार्य केले असून रेस्क्यूचे नरेश चांडक, सिधी पांचारीया हे ही सहभागी होते. दोन महिन्यांच्या या बिबट्याच्या बछड्याचे आणखी एक यशस्वी रेस्क्यू वनविभाग आणि रेस्क्यू टीमच्या सक्रियतेवर शिक्कामोर्तब करणारे आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121