वृद्धाश्रम नव्हे, वानप्रस्थाश्रम!

    27-Dec-2023
Total Views | 137
 Old age home and Vanprastashram

वानप्रस्थी होणे म्हणजे प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे वळण्याचा प्रयत्न होय. किती दिवस भोग भोगणार किती काळ भौतिकतेच्या वातावरणात राहणार इतकी वर्षे पारिवारिक सुखाचा उपयोग घेतला. म्हणूनच आता यातून निवृत्त व्हावयास हवे.स्वतःची आदर्श दिनचर्या हवी. धार्मिक व आध्यात्मिक अशा श्रेष्ठ ग्रंथांचे वाचन हवे. आपल्याकडील विद्या व सद्गुणांना संवर्धित करण्याचा प्रयत्न करणे व तसेच त्यांचे समाजाला वितरण करणे नको का?

प्राचीन वैदिक संस्कृतीत त्याग व भोग हे जीवनाचे प्रमुख मार्ग वर्णिले आहेत. यालाच ‘प्रेय’ व ‘श्रेय’ मार्ग असे म्हटले जाते. आयुष्यभर विवेकपूर्वक विषयांचे उपभोग घेतल्यानंतर त्यातून मुक्त होण्याचा त्यागमार्ग अनुसरणे हे इष्ट ठरते. यालाच ‘प्रवृत्तीतून निवृत्तीकडे वळणे’ असेही म्हटले जाते. यासाठीच तर यजुर्वेदातील अंतिम अध्यायाच्या पहिल्याच मंत्रात ‘तेन त्यक्तेन भुंजीथा:!’ हा मंत्रांश आला आहे. म्हणजेच प्रत्येकाने त्यागपूर्वक भोग भोगावेत.यादृष्टीने वैदिक आश्रम व्यवस्थेत चार आश्रमांची मांडणी केली आहे. गुरुकुलात राहून शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आत्मिक विकास साधल्यानंतर कठोर परिश्रमातून ब्रह्मचर्याचे पालन करीत विद्यार्थी हा सर्वांगाने पात्र ठरल्यानंतर तो विधिवत गृहस्थ आश्रमात प्रवेश करतो. मानव जीवनाच्या विकासात गृहस्थाश्रम हा एक महत्त्वाचा आश्रम.

या आश्रमात धर्मपूर्वक अर्थार्जन, संयमपूर्वक विषयांचा उपभोग घेणे, पितृऋणातून मुक्त होण्याकरिता आदर्श संतती जन्माला घालणे इतर आश्रमींची सेवा करणे, आतिथ्य सत्कार, दानधर्म इत्यादी कर्तव्यांचा समावेश आहे. आता या विषयसेवनात व कौटुंबिक मायामोहात, स्वार्थ जंजाळात आणि नातलगांच्या गोतावळ्यात किती दिवस अडकून राहणार, यातून आता दूर व्हावयास हवे. आपल्या गृहस्थाश्रमाच्या यशस्वी कालखंडाची २५ ते ३० वर्षे पूर्ण झाली म्हणजेच गृहस्थाश्रमाची ५०, ५५ किंवा ६० वर्षे संपली की आता वनाकडे गमन करणे इष्ट! वनस्थळीकडे प्रस्थान करण्याच्या या क्रियेलाच ‘वानप्रस्थाश्रम प्रवेश’ म्हटले जाते. वानप्रस्थ आश्रम कधी घ्यावा? या संदर्भात मनुस्मृतीत म्हटले आहे.

गृहस्थस्तु यदा पश्येद् वलीपलितमात्मन: । अपत्यस्यैव चापत्यं तदारण्यं समाश्रयेत्॥
(मनुस्मृती -६/२)

म्हणजेच गृहस्थाने जेव्हा आपल्या शरीराची कातडी शिथिल झाल्यावर व केस पांढरे झाले असे लक्षात आले आणि आपल्या मुलांसही मुलगा अथवा मुलगी झाली की वनाचा आश्रय घ्यावा.मानवी जीवन म्हणजे एक प्रकारचा प्रवास आहे. आम्हाला पुढे पुढेच जायचे आहे. एके ठिकाणी थांबावयाचे नाही. एका आश्रमानंतर दुसरा आश्रम हा ठरलेला आहे. गृहस्थाश्रम संपला, तर आता वानप्रस्थाश्रमात जावे. आपल्या या जीवनयात्रेत नेहमी मान मर्यादा टिकवून आणि प्रतिष्ठेने जगावयाचे असते. योग्यवेळी योग्य आश्रमात प्रवेश करणे सर्वांच्या दृष्टीने अतिशय हितकारक असते.भारतीय संस्कृतीत समाजव्यवस्थेचे दूरगामी चित्रण झाल्याचे दिसते. गृहस्थाश्रम संपला की, घरातच न थांबता पुढल्या आश्रमात जाणे हे आपल्यासाठी व आपल्या मुला-बाळांसाठी अतिशय योग्य मानले जाते. उगीच घरात राहून मुले व सुनांकरिता ओझे बनून राहण्यापेक्षा स्वतःचाआध्यात्मिक विकास साधण्याकरिता वनगमन करणे हेच योग्य!
 
आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी सामाजिक समस्येचे निराकरण करण्यासाठी वानप्रस्थाश्रमाची संकल्पना मांडली होती. वानप्रस्थ आश्रम स्वीकारणे म्हणजे रडत रडत घर सोडणे नव्हे, तर हसतमुखाने आपल्या प्रवृत्तीला निवृत्तीकडे घेऊन जाणे. प्रेय मार्गाकडून श्रेय मार्गाचा अंगीकार करणे. सांसारिक जीवनाचा आस्वाद घेतल्यानंतर अध्यात्मसाधनेसाठी वानप्रस्थ आश्रमाची संकल्पना होती. घरादाराला चिकटून राहणे हे ना आपल्यासाठी हिताचे? ना आपल्या मुलां व नातवांच्या कल्याणाचे! आपल्या घराची संपूर्ण जबाबदारी सांभाळण्याचे सामर्थ्य नव्या पिढीत येण्याकरिता त्यांना कार्यतत्पर करणे आणि स्वतःही एक निरीक्षक बनून त्यांना मार्गदर्शन करीत राहणे, हे वानप्रस्थी व्यक्तीचे कर्तव्य यासाठी प्राचीन काळी गाव व नगराच्या शेजारीच काही अंतरावर जंगलामध्ये वयस्क मंडळी कुटी (आश्रमे) तयार करून राहत असत. सामूहिकरित्या लघु आश्रमे स्थापून ही वयस्कर (वृद्ध) मंडळी तपश्चर्येचे जीवन जगत असत.
 
ब्रह्मचर्य आश्रमात शिकलेली विद्या गृहस्थाश्रमात विस्मृत झाली असेल, तर त्या विद्येचा पुन्हा अभ्यास आरंभिणे विषयांच्या मोहात गुरफटलेल्या इंद्रियांचे दमन करण्यासाठी योगमार्गाचा अंगीकार करणे त्यासोबतच सतत ध्यानधारणा, चिंतन, मनन व उपासना करण्याचा कालावधी म्हणजेच वानप्रस्थाश्रम होय.जुन्या काळची ही वानप्रस्थाश्रमे ही गुरुकुल आश्रमे म्हणूनदेखील ओळखली जात असत. वानप्रस्थ मंडळी आचार्य व शिक्षक बनून अध्यापनाचेही कार्य करीत असत. महाभारतात उज्जैन नगरीजवळील सांदीपनी मुनींच्या आश्रमात कृष्ण- सुदामासारखे शिष्य अगदी आनंदात विद्याग्रहण करीत असत. ज्ञानोपार्जन व विद्याध्ययनासोबतच असे हे मुनिजन अधूनमधून गावी येत व आपल्या गृहस्थ आश्रमी मुलां व सुनांना जीवन जगण्याची तत्वे शिकवित. लहान नातवंडांना सुसंस्कारांचे धडे देत, तर गावकर्‍यांनादेखील योग्य ते मार्गदर्शन करीत. एक-दोन दिवसांचे कार्य संपन्न करून पुन्हा आपल्या आश्रमात जाऊन आपल्या कार्यात व्यस्त राहत. एखादेवेळी गावात राहणार्‍या गृहस्थाश्रमींसमोर जीवनविषयक काही प्रश्न उद्भवले, तर त्यांचे निराकरण करण्यासाठी ते अशा वानप्रस्थीमंडळींकडे जात आणि त्याकडे मार्गदर्शन करण्याविषयी विनंती करीत. अशा वेळी हे मुनिजन त्यांना अगदी पित्याप्रमाणे उपदेश देत असत. इतकी उपयुक्तता त्या काळात वानप्रस्थाश्रमाची होती.

आजच्या बदलत्या युगात सर्वांत मोठी समस्या उद्भवत आहे, ती आई-वडिलांच्या सेवेची व त्यांना सांभाळण्याची तथाकथित सुशिक्षित उच्चपदस्थ मुलांना व सुनांना आपल्या आई-वडिलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आपले म्हातारे आई-वडील हे नव्या पिढीला ओझे बनत चालले आहेत. वृद्ध आई-वडीलदेखील आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या मुला व सुनांना नातवांना वागवण्याच्या मनोवृत्तीत आहेत. त्यामुळे दोन पिढ्यांमध्ये संघर्ष निर्माण होतोय. एकूणच कलहाचे व दुःखाचे वातावरण पसरत चालले आहे. सध्याच्या दुरवस्थेत वृद्धाश्रम हा पर्याय म्हणून पडला तरी तो पूर्णपणे उपयुक्त नाही. कारण त्यात कोणत्याही नियमांचे विशेष पालन नसते. अशा आश्रमी बळजबरीने आलेले व मुला व सुनांच्या वागणुकीने कंटाळलेले वृद्ध माता-पिता दुःखाचे जीवन जगतात. घरात भांडण तंटे होऊन, दुःखाच्या आवेगातून व क्षणिक वैराग्यातून घर सोडून वृद्धाश्रमी दाखल झालेली ही वृद्ध मंडळी नैराशाचे जीवन जगतात.. घराकडील आठवणीमुळे व कौटुंबिक मोहामुळे वृद्धाश्रमात मन लागत नाही. इथेही कोणता आध्यात्मिक प्रबोधनाचा कार्यक्रम नाही. एक प्रकारची दिशाहीनता सध्याच्या व्यवस्थेत दिसून येतेय, अशा प्रसंगी ‘वानप्रस्थ आश्रम’ ही संकल्पना अतिशय उपयुक्त व मौलिक स्वरूपाची भासते.

वानप्रस्थी होणे म्हणजे प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे वळण्याचा प्रयत्न होय. किती दिवस भोग भोगणार किती काळ भौतिकतेच्या वातावरणात राहणार इतकी वर्षे पारिवारिक सुखाचा उपयोग घेतला. म्हणूनच आता यातून निवृत्त व्हावयास हवे. स्वतःची आदर्श दिनचर्या हवी. धार्मिक व आध्यात्मिक अशा श्रेष्ठ ग्रंथांचे वाचन हवे. आपल्याकडील विद्या व सद्गुणांना संवर्धित करण्याचा प्रयत्न करणे व तसेच त्यांचे समाजाला वितरण करणे नको का? वानप्रस्थी बनणे म्हणजे घराची ताटातूट नव्हे, तर वेळप्रसंगी त्यांना उपकारक असे मार्गदर्शनदेखील करणे व त्यांच्यात योग्यता आणि कार्यक्षमतादेखील वाढवण्यास प्रोत्साहन देणे होय. सद्ययुगात कौटुंबिक व सामाजिक त्यावर रामबाण औषधी म्हणजेच वैदिक वानप्रस्थाश्रम व्यवस्था होय. सध्याच्या शासन व्यवस्थेने वृद्धाश्रम उपक्रमाऐवजी एक उत्तम पर्याय म्हणून वानप्रस्थाश्रमया प्राचीन वैदिक परंपरेचा अंगीकार केला, तर सर्वदृष्टीने लाभदायक ठरेल! (क्रमश:)

प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121