मुंबई : बदलती जीवनशैली, धकाधकीचे जीवन, नोकरीसाठी होणारी धावपळ, ताणतणाव, बैठे कामाच्या पद्धती, व्यायामाकडे होणारे दुर्लक्ष आदी कारणांमुळे महिलांमध्ये आरोग्य विषयक समस्या वाढू लागल्या आहेत. ही बाब ध्यानात घेऊन मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी झोपडपट्टीतील महिलांसाठी फिरती व्यायामशाळा (जिम ऑन व्हील) ही नवी संकल्पना पुढे आणली आहे.
झोपडपट्टीतील महिलांमध्ये फिटनेसची सुविधा प्राप्त व्हावी आणि त्यांना याबाबतची माहिती व्हावी म्हणून ही संकल्पना राबवली जात आहे. घरोघरी फिटनेस उपक्रम घेणे, महिलांमध्ये व्यायामाबाबत जागरुकता आणण्यासह निरोगी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता ही नाविन्यपूर्ण योजना आखण्यात आली आहे.
मोठ्या आकाराच्या बसमध्ये या जिमची रचना केली जाणार आहे. प्रायोगिक टप्प्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याची निवड करण्यात आली असून, एका फिरत्या व्यायामशाळेची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या व्यायामशाळेला मिळणारा प्रतिसाद पाहून अन्य ठिकाणी अशाप्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला जाईल. यासाठी सुमारे ७५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, पुढील तीन वर्षे देखभाल दुरुस्ती करिता १ कोटी ४२ लाख रुपये इतका खर्च केला जाणार आहे. 'बी द चेंज' ही कंपनी फिरत्या व्यायामशाळेसाठी पात्र ठरली आहे.
अशी असेल फिरती व्यायामशाळा
एका बसमध्ये व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून दिले जाईल. त्यात बस चालक, ट्रेनर व इतर एका व्यक्तींचा समावेश असेल. उपनगरातील प्रत्येक झोपडपट्टीत नेमून दिलेल्या वेळेत जावून त्या भागातील महिलांना फिटनेसची माहिती देऊन त्यांना शिकवले जाईल. अशाप्रकारची एक फिरती व्यायामशाळा खरेदी करण्यासाठी उपनगर जिल्हा नियोजन विभागाकडून निधी उपलब्ध झाला आहे. त्यानुसार महापालिकेच्यावतीने या फिरत्या व्यायामशाळेची बांधणी बस सांगाडा घेऊन त्यात केली जाणार आहे.
महिला सशक्तीकरणाला प्राधान्य
महिला सक्षमीकरण, सबलीकरण आणि सशक्तीकरणाला महायुती सरकारने विशेष प्राधान्य दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून झोपडपट्यांमधील महिलांना 'जिम ऑन व्हील' उपलब्ध करून दिली जाणार आहे. व्यापक पातळीवर ही संकल्पना राबविण्याचा आमचा मानस आहे.- मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री, मुंबई उपनगर