मुंबई : मुंबईची हवेची पातळी उत्तम आणण्यासाठी १५ डिसेंबरनंतर येत्या कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील असून, त्यासाठी आठवडाभरात निविदा काढण्यात येईल, अशी महिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी म्हटले आहे. हवेची गुणवत्ता खालावत असताना दिवाळसणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे वायू प्रदूषणात वाढ होत हवेची गुणवत्ता अधिक खालावली गेली आहे. त्यामुळे श्वसनाच्या आजारात वाढ दिसून येत आहे. अजूनही मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) १०० च्या वरती म्हणजेच मध्यम स्थितीत आहे.
हवेची स्थिती सुधारण्यासाठी मुंबई महापालिकेकडून आधीच प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी मार्गदर्शक तत्वांचे पालन न केल्याप्रकरणी बांधकामांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. रस्ते, मैदानात धुळीवर उपाय म्हणून पाण्याची फवारणी त्याचबरोबर वाहनावरील मिस्ट मशीन्सद्वारे हवेची गुणवत्ता पातळी नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना मुंबई महानगरपालिका करत आहे.दरम्यान, कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी जवळपास ५० लाख रुपयांपर्यंत खर्च असून, पाऊस पडण्याची फक्त ५० टक्केच खात्री असते. कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाल्यास १५ दिवसांपर्यंत प्रदूषणापासून सुटका मिळते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.