मीरा बोरवणकर अशा लेडी सिंघम ज्यांचा अंडरवर्ल्ड डॉननेही घेतला होता धसका
16-Oct-2023
Total Views | 77
मुंबई : आपल्या 'मॅडम कमिशनर' (The Extraordinary Life of an Indian Police Chief) या पुस्तकामुळे चर्चेत आलेल्या मीरा बोरवणकर यांची ओळख पोलीस दलात लेडी सिंघम, अशी निर्माण झाली होती. मूळच्या पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यातील मीरा या १९८१ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी होऊन मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागात पोलीस उपायुक्त म्हणून रुजू झाल्या होत्या. त्यांचे वडील BSFमध्ये अधिकारी होते. पती अभय बोरवणकर हे माजी आयएएस अधिकारी आहेत. त्यामुळे लहानपणापासून आतापर्यंत त्यांच्या अवतीभोवती प्रशासकीय अधिकारी क्षेत्राचे वातावरण राहीले आहे.
IPS बनल्यानंतर पहिल्यांदा त्या १९९४ मध्ये प्रामुख्याने चर्चेत आल्या. यामागे कारण होते, सेक्सरॅकेट तपास. जळगावमध्ये शाळा-कॉलेजच्या मुलींना वेश्या व्यवसायात ढकलण्याचे सेक्स रॅकेट त्यांनी उघडकीला आणले. त्यांची बदली महाराष्ट्रातील अनेक मोठ्या शहरात झाली. परंतू, मुंबईतील त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. कारण मुंबईत असताना त्यांनी गुन्हेगारी जगातील मोस्ट वॉंटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या तसेच छोटा राजन टोळीच्या अनेक सदस्यांना त्यांनी तुरुंगात पाठवले. तर दाऊदची बहीण हसीना भावाच्या नावाने वसुली करत आहे, अशा बातम्या मुंबई गुन्हे शाखेकडे अनेकदा येत होत्या. त्यावेळी दाऊद इब्राहिमची बहीण त्यांना एवढी घाबरली होती की, त्यांच्या बदलीसाठी तिने विशेष नमाज अदा केली होती.
यासोबतच मीरा जेव्हा तुरुंग महानिरीक्षक होत्या त्यावेळी संजय दत्त, अजमल कसाब, याकूब मेमन यांच्या गुन्ह्यांसंबंधी अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले. संजय दत्तला त्यांनी तुरुंगातीलच जेवण अनिवार्य केले. तसेच अजमल कसाब आणि याकूब मेमनला त्यांच्या निगराणीतच फाशी देण्यात आली. लेडी सुपरकॉम नावाने प्रसिद्ध असलेल्या मीरा बोरवणकर ३६ वर्षाच्या कारकिर्दीनंतर ऑक्टोबर २०१७ मध्ये रिटायर्ड झाल्या आहेत. यावेळी त्यांनी ‘लीव्ह्ज ऑफ लाईफ’ नावाचे इंग्रजी पुस्तक लिहिले. पुण्यातील विश्वकर्मा पब्लिकेशन्सने ९ सप्टेंबर २०१७ रोजी हे पुस्तक प्रकाशित केले.
मीरा बोरवणकर यांच्या यशस्वी कारकीर्दीत त्यांना अनेक पदके आणि पुरस्कार जाहीर झाले. २००६ मध्ये विशिष्ट सेवांसाठी भारताचे राष्ट्रपती पोलीस पदक मिळालं, २०१४ मध्ये गोल्डन महाराष्ट्र ‘वुमन अचिव्हर्स अवॉर्ड’या पुरस्काराने त्यांचा गौरव झाला. २००८ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा, यू.एस.ए.कडून 'आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठित नेतृत्व पुरस्कार' प्राप्त झाला. २००४ मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक कडून पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेसाठी रुक्मणी पुरस्कारही जाहीर झाला होता.
