लक्ष मालदीव निवडणुकांकडे!

    24-Jan-2023
Total Views |
Abdulla Yameen and Ibrahim Mohamed Solih
महाराष्ट्रात, विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या निवडणुकांचे वेध सर्वांना लागले आहेत. मग महापालिकेच्या निवडणुका असो किंवा पदवीधर निवडणुका; सर्वांचं लक्ष या निवडणुकांनी वेधून घेतलयं. राज्यात जरी या निवडणुकांच्या वारंवार चर्चा होत असल्या तरी जागतिक पातळीवर चर्चा होतेयं ती मालदीव येथे होणार्‍या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकांची. ही निवडणूक जरी मालदीवमध्ये होत असली तरी भारतासाठी आणि भारत-मालदीव संबंधासाठी ती अत्यंत महत्त्वाची आहे.

दक्षिण आशियातील मालदीव हे भारताच्या मित्रराष्ट्रांपैकी एक. भारताची सागरी सुरक्षा किंवा भारतीय परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीनेही मालदीव एक महत्त्वाची भूमिका बजावते. सध्या मालदीव डेमोक्रेटिक पक्षाचे इब्राहिम मोहम्मद सोलिह हे मालदीवच्या राष्ट्राध्यक्ष पदावर आहेत. २०१८ साली ते राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान झाले. येत्या सप्टेंबर महिन्यात राष्ट्राध्यक्ष पदासाठी नव्याने निवडणुका होणार आहेत. मालदीव डेमोक्रेटिक पक्षाकडून इब्राहिम सोलिह हे जरी या निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवार असले, तरी याच पक्षातील मोहम्मद नाशीद हेसुद्धा या निवडणुकीत उतरणार आहेत, तर दुसरीकडे ’मालदीव प्रोग्रेसिव्ह पार्टी’चे नेते आणि मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन हे या स्पर्धेत उतरण्याच्या तयारीत आहेत. मात्र, ते सध्या एका भ्रष्टाचार प्रकरणी ११ वर्षांचा तुरुंगवास भोगत आहेत.

ही निवडणूक लढता यावी याकरिता यामीन सुटण्याचा अतोनात प्रयत्न करताना दिसतात. त्यातच सध्याचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम सोलिह हे निवडणुकीत जिंकले, तर ही भारतासाठी नक्कीच आनंदाची गोष्ट असेल. मात्र, मोहम्मद नाशीद किंवा अब्दुल्ला यामीन यांचा जर या निवडणुकीत विजय झाला, तर भारतासाठी ती एक चिंतेची बाब ठरू शकते. कारण, अब्दुल्ला हे कट्टर चीन समर्थक मानले जातात. त्यातच भ्रष्टाचारात अडकलेल्या अब्दुल्ला यामीन यांच्या समर्थकांकडून प्रचंड आरोप-प्रत्यारोप, घोषणाबाजी मालदीवमध्ये होताना दिसते. अब्दुल्ला यांनी तुरुंगातून निर्दोष बाहेर पडावं आणि पुन्हा राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक लढावी, यासाठी त्यांचे बरेच प्रयत्न सुरू आहेत.

२०१८ मध्ये अब्दुल्ला यामीन यांचा पराभव करत इब्राहिम सोलिह मालदीवच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी काही दिवसांपूर्वी मालदीवचा दौराही केला होता. मालदीवच्या ‘हा दहालू अटूल’ येथील हानिमाडूमध्ये भारताच्या मदतीने एक आंतरराष्ट्रीय विमानतळदेखील उभारण्यात येते आहे. याठिकाणी झालेल्या कार्यक्रमात इब्राहिम सोलिह यांनी जयशंकर यांची भेट घेतली. या भेटीत ’‘मालदीव एक प्रगतीशील राष्ट्र व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारत मालदीवच्या प्रगती आणि परिवर्तनाच्या प्रवासात एक वचनबद्ध भागीदाराची भूमिका निभावेल”, असा विश्वास एस. जयशंकर यांनी दर्शविला होता. याचवेळी भारताने मालदीवसोबत तीन महत्त्वाचे मोठे करारही केले होते. भारत-मालदीव संबंधातील हा एक ऐतिहासिक टप्पा ओळखला जातो. या द्विपक्षीय भागीदारीचा फायदा भारत आणि मालदीवच्या लोकांना येत्या काळात नक्कीच होईल. इतकेच नव्हे, तर भारताच्या ’नेबरहूड फर्स्ट पॉलिसी’ आणि ’सागर पॉलिसी’मुळे भारत आणि मालदीवचे संबंधही अधिक सुधारले आहेत.

मालदीवच्या आगामी निवडणुकांचा विचार केल्यास सध्याचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम सोलिह यांचं पुन्हा निवडून येणं भारतासाठी जितकं फायदेशीर आहे, तितकचं आव्हानात्मकही आहे. कारण, हल्लीच सोलिह यांच्या डेमोक्रेटिक पक्षातील नाशीद यांनी चीन समर्थक वृत्तीच्या अब्दुल्ला यामीन यांचे गुणगान गायले होते. मालदीवमध्ये मोहम्मद नाशीद यांचे बरेच समर्थक आहेत. त्यामुळे जर नाशीद सत्तेत आले, तर भारतासाठी हे नक्कीच आव्हानात्मक ठरू शकेल.

मालदीवच्या पायाभूत सुविधांच्या उन्नत्तीसाठी भारताने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल. त्यापैकी एक म्हणजे इथे तयार होणारे विमानतळ. मालदीवची बहुतांश अर्थव्यवस्था पर्यटन क्षेत्रावर अवलंबून असल्याने भारताने घेतलेला पुढाकार पर्यटन क्षेत्राच्या उन्नतीसाठी निश्चितच लाभदायी ठरेल. मात्र, भारताने केलेल्या या सर्व गोष्टींना टक्कर देण्याचा प्रयत्न चीनकडून वारंवार होताना दिसतो. चीनही मालदीवमध्ये विविध क्षेत्रांत गुंतवणूक करुन या द्वीपराष्ट्राला कर्जसापळ्यात अडकवतोय. त्यामुळे येत्या निवडणुकीत मालदीवमध्ये काय घडते, त्याकडे भारताचेही बारकाईने लक्ष असेल, यात दुमत नाही.-ओंकार मुळये


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.