संघर्षाचा सामाजिक न्यास

    22-Jan-2023   
Total Views |
 अर्चना अरविंद मोहिते


महिलांवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गेल्या १७ वर्षांपासून अर्चना अरविंद मोहिते काम करीत आहे. त्यासाठी त्यांना अनेकदा संघर्षही करावा लागला, पण त्यांनी आपले ध्येय कधीच सोडले नाही. त्यांचा हा प्रवास कसा होता, याविषयी जाणून घेऊया.


 
अर्चना यांचे बालपण मुंबईतील वांद्रे याठिकाणी गेले. त्याचे शालेय शिक्षण बी. पी. एम हायस्कूल येथे झाले. त्यानंतर सिद्धार्थ महाविद्यालयातून बी.कॉमची पदवी संपादन केली. नानावटी हायस्कूलमध्ये ‘होम सायन्स’ पूर्ण केले. मुंबई विद्यापीठातून समुपदेशनाची त्यांनी पदविका आणि पदवी असे दोन्ही (मास्टर इन सोशल वर्क कौन्सिलिंग) अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. त्यांचे वडील वसंत दळवी हे पोस्ट ऑफीसमध्ये पोस्ट मास्तर म्हणून कार्यरत होते. आई सुलभा या गृहिणी आहेत. २००७ ला लग्न झाल्यानंतर त्या डोंबिवलीकर झाल्या. त्यांचे पती अरविंद हे गायक आहेत. सध्या त्या डोंबिवलीतील दत्तनगर येथे त्या वास्तव्यास आहेत.

अर्चना यांना लहानपणापासूनच स्वत:वर व इतरांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय झालेला सहन होत नव्हता. अकरावीला असताना त्यांच्या वाचनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र वाचनात आले. त्यात ‘अन्याय करणार्‍यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो’ या वाक्याने त्यांच्यात स्फूर्ती निर्माण झाली. समाजासाठी विशेषत: स्त्रियांसाठी काहीतरी करावे, ही भावना मनात रूजू लागली. त्याच प्रेरणोतून अर्चना यांनी वयाच्या अवघ्या १७व्या वर्षापासून महिलांच्या समस्या, त्यांच्यावर होणारा अन्याय, अत्याचाराची कारणे जाणून घ्यायला सुरूवात केली त्यासाठी त्या वेगवेगळ्या विभागात जाऊन महिलांना भेटत होत्या.

महिलांच्या भेटीदरम्यान महिला बेरोजगार असल्याची बाब त्यांच्या निर्दशनास आली. त्यामुळे महिलांना छोटया छोटया खर्चासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते. तिला मान-सन्मान मिळत नाही. उलट त्यांच्यावर हक्क गाजविला जातो. तसेच महिलांना त्यांचे कुटुंब व मुले यांचीही देखभाल करावी लागते. या कारणांमुळे त्या घराबाहेर जाऊ शकत नाही. ही सर्व परिस्थिती लक्षात आल्यावर अर्चना यांनी महिलांनी स्वावलंबी व्हावे, स्वत:च्या पायावर उभे राहावे व त्यांच्यावर होणारे अन्याय-अत्याचार दूर करण्यासाठी वयाच्या १९व्या वर्षी त्यांनी स्वत:ची ‘अर्चना आर्ट अकादमी’ या संस्थेची स्थापना केली. ही संस्था नोंदणीकृत आहे.

अर्चना यांनी संस्थेची स्थापना करण्याचा विचार केला, तेव्हा त्यांना त्यांच्या आई-वडिलांनी प्रचंड विरोध केला. त्यावेळी त्या स्वत:च्या पायावर उभ्या नव्हत्या. त्यामुळे ‘तू स्वत:च स्वत:च्या पायावर उभी नाहीस, तर तू इतरांना काय स्वावलंबी करणार?’ असा प्रश्न त्यांच्या आईवडिलांनी त्यांना केला. आईवडिलांच्या बोलण्याने अर्चना नाराज झाल्या. परंतु, त्यांना स्वत:वर पूर्ण विश्वास होता. इतर महिलांच्या विकासाबरोबर मी स्वत:चाही विकास करीन आणि त्या जिद्दीने त्यांनी सगळ्यांचा विरोध पत्कारून २००५ साली ‘अर्चना आर्ट अकॅडमी’ची स्थापना केली.

गरजू महिलांना त्यांचे कुटुंब आणि मुले सांभाळून काहीतरी करता यावे यासाठी अर्चना यांनी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून मोफत रोजगार प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली. घर सांभाळून त्यांना स्वावलंबी बनविण्याच्या हेतूने त्यांनी अगरबत्ती, मेणबत्ती, इमिटेशन ज्वेलरी, परफ्यूम, फिनाईल, मुखवासाचे पदार्थ, चॉकलेट असे बरेच लघुउद्योग शिकवायला सुरूवात केली. पण त्यात एक प्रमुख समस्या होती, ती म्हणजे कच्च्या मालासाठी लागणारा पैसा कसा उभा करावा ? त्यासाठी अनेकदा त्यांनी आपला ‘पॉकेटमनी’ वापरला आहे. कधी त्या स्थानिक नगरसेवकांना भेटून कच्च्या मालासाठी लागणारे पैसे जमा करीत होत्या. वेगवेगळ्या विभागात जाऊन तिथल्या महिलांना रोजगार प्रशिक्षण देऊन स्वावलंबी करत होत्या.

वयाच्या १९ व्या वर्षी रोजगार प्रशिक्षण देऊन घरच्या घरी राहून महिलांना स्वावलंबी करण्याचे हाती घेतलेले कार्य आजतागायत अविरतपणे सुरू आहे. या १७ वर्षांच्या प्रवासात त्यांना अनेक अडचणी, समस्या आल्या तरीदेखील त्यांनी त्यावर जिद्दीने मात करत त्यांना मुंबईतच नाही, तर नाशिक, चिपळूण, सातारा येथील पाच हजारांहून अधिक महिलांना त्यांनी स्वावलंबी बनवलेले आहे. तसेच त्या जेलमध्ये जाऊन कैदी महिलांना ही रोजगार प्रशिक्षण देतात. इतर महिलांसोबत स्वत:चा ही विकास करीन असे अर्चना यांनी ठरविले होते, त्याप्रमाणे त्यांनी करून दाखविले. इतर महिलांना स्वावलंबी करता-करता त्यादेखील स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या. वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी ‘ग्रीन्स इंग्लिश स्कूल, डोंबिवली या शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.

डॉ. आंबेडकरांचे विचार, त्यांची चळवळ समाजात पोहोचावी. यासाठी समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्या व त्यांचे पती यांच्या साथीने ‘धम्मपद एक धम्मदेसना’ या प्रबोधनात्मक वाद्यवृंदाची निर्मिती करून समाजात जनजागृती करीत आहेत. मराठी संस्कृती जपण्यासाठी त्यांनी लोकरंग महाराष्ट्राचा या मराठी वाद्यवृंदाची निर्मिती केली आहे. त्या एक उत्तम निवेदिका आणि सूत्रसंचालिका आहेत. उत्तम व्याख्यात्या असल्याने त्यांना महापुरूषांचे विचार सांगण्यासाठी अनेक ठिकाणी बोलविले जाते. संपूर्ण महाराष्ट्रभर त्या प्रबोधनाचे कार्यक्रम करतात. मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी त्यांनी ब्रेन स्पार्कल हे ‘कौन्सिलिंग सेंटर’ही सुरू केले आहे. त्यांच्या कामामुळे त्यांना आतापर्यंत ४० हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!






आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.