जेव्हा समाज आत्मविस्मृत होतो, तेव्हा त्या समाजात अनेक प्रकारचे दोष उत्पन्न होतात. आपसात स्वार्थभाव निर्माण होऊन कलह होतो आणि या परिस्थितीचा परकीयांनाच लाभ होतो आणि सर्वसामान्य रयतेचे जगणे कठीण होत. अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने सुलतान आणि परकीय सत्तांशी संघर्ष करत भारताच्या इतिहासात प्रदीर्घ काळाने हिंदूपदपातशाहीचे स्वतंत्र सिंहासन निर्माण केले. हिंदू समाजामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. ‘दिल्लीश्वरोवा जगदीश्वरोवा’ अर्थात दिल्लीचा बादशाह हाच ईश्वर ही मानसिकता धुळीला मिळवली.
भारतात सम्राट भरत, भगवान श्रीराम, सम्राट युधिष्ठीर ते गौतमीपुत्र सातकर्णी, सम्राट हर्षवर्धन, सम्राट अशोक, पृथ्वीराज चौहान, महाराणा प्रताप असे अनेक पराक्रमी आणि लोककल्याणकारी राजे होऊन गेले. अशा महान राज्यकर्त्यांच्या परंपरेतील राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! आपला इतिहास पराजयाचा नाही, तर अनवरत संघर्षाचा आहे. इसवी सन 712 मध्ये मुहम्मद बीन कासीमच्या इस्लामी आक्रमणापासून आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्याच्या रक्षणार्थ सतत संघर्ष केला, त्यासाठी लाखोंनी बलिदान दिले. अटलबिहारी वाजपेयी म्हणतात, “आमचा इतिहास पराक्रमाचा पण हौतात्म्याचा आहे.” पण, छत्रपती शिवाजी महाराजांपासून आमच्या देशात पुन्हा एकदा विजयाची परंपरा सुरू झाली.
शिवकाळापूर्वी विजयनगर हिंदू साम्राज्य हे जगातील सुसंस्कृत, संपन्न आणि वैभवशाली राज्य होते. या साम्राज्याची राजधानी हंपी शहरात होती. ’हरिहर व बुक्क’ या दोन भावांनी विजयनगरच्या साम्राज्याची पायाभरणी केली. राजा हरिहर आणि राजा बुक्क यांनी मुहम्मद तुघलकाला पराभूत करून नामोहरम केले होते. मुहम्मद तुघलकाच्या पराभवानंतर कृष्णा आणि तुंगभद्रा नद्यांच्या दरम्यान स्वतंत्र हिंदू राज्य स्थापन केले. लवकरच त्यांनी उत्तरेकडील कृष्णा नदी आणि दक्षिणेस कावेरी नदीच्या दरम्यान संपूर्ण प्रदेशावर आपले साम्राज्य तयार केले. विजयनगर साम्राज्याच्या वाढत्या शक्तीमुळे या तत्कालीन इस्लामी आक्रमकांना पराभूत व्हावे लागले आणि तेथून त्यांना पळ काढावा लागला. विजयनगरने बहामनी राज्यांशी वारंवार युद्ध करून पराजित केले. हिंदुत्वाचे पुनरुज्जीवन हे विजयनगरच्या राजांचे ध्येय होते आणि त्यात ते यशस्वी झाले.
प्रजेसाठी सुखसोयी, शेती, व्यापार, कालवे, विद्यावंतांना प्रोत्साहन यासाठी विजयनगर प्रसिद्ध होते. विजयनगरविषयी पर्शियन प्रवासी अब्दुल रझाक याने वर्णन केल्याप्रमाणे विजयनगर हे जगातील सर्वात भव्य शहरांपैकी एक असल्याचे दिसते.
विजयनगरचे तुळुववंशीय राजे कृष्णदेवराय हे प्रजावत्सल, विद्वान आणि कुशल प्रशासक होते. वयाच्या एकविसाव्या वर्षी इ. स. 1509 साली ते सिंहासनावर बसले. रायचूरच्या लढाईत त्यांना मोठा विजय मिळाल्यामुळे उत्तरेकडील मुघल राजांवर त्यांचा चांगलाच वचक बसला. ओरिसावर आक्रमण करून त्यांनी राजा गजपतीचाही पराभव केला होता. त्यांनी ‘महाराजाधिराज’, ‘सिंहासनाधीश्वर’ इत्यादी पदव्या धारण केल्या होत्या. कृष्णदेवरायांनी जमीनसुधारणा करून मुबलक पाणीपुरवठ्यासाठी धरणे व पाटबंधारे बांधले होते. कृष्णदेवराय स्वतः कवी आणि पंडित होते. त्यांनी तेलुगू व संस्कृत भाषेत अनेक काव्यग्रंथ रचलेले आहेत. ‘आमुक्तमाल्यदा’ हा त्यांचा तेलुगू भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ‘मदालसाचरित्र’, ‘सत्यभामापरिणय’, ‘जांबवतीपरिणय’, ‘सकलकथासारसंग्रह’, ‘ज्ञानचिंतामणी‘ इत्यादी ग्रंथ त्यांनी संस्कृत भाषेत रचलेले आहेत.
साहजिकच हे लोककल्याणकारी हिंदू राज्य मुस्लीम सुलतांनाच्या डोळ्यात खुपत होते. त्यामुळे या राज्याचा नाश करण्यासाठी आदिलशाह, निजामशाह, बेरीदशाह आणि कुतुबशाह हे मुसलमान सुलतान एकत्र आले. लाखोंच्या सुलतानी फौजांनी विजयनगरवर आक्रमण केले. यावेळी विजयनगरचा राजा होता रामराय! त्याचा दळभारही प्रचंड होता. राक्षसतागडीजवळ प्रचंड युद्ध प्रारंभ झाले. रामराय हा वयाने अतिशय वृद्ध होता. परंतु, 30 वर्षांच्या तरुणासारखा तडफेने लढत होता. कुटो नावाच्या फिरंगी माणसाने त्याचा पराक्रम प्रत्यक्ष पाहिलेला आहे. दख्खनच्या इतिहासात एक महाभारत घडत होते. पण, या युद्धात कौरवांचा नव्हे, तर पांडवांचा पराभव झाला! राजा रामराया अचानकपणे सुलतानांच्या चक्रव्युहात सापडला. निजामशाहाने रामरायाचा शिरच्छेद केला आणि मस्तक भाल्यावर मिरवले. तालिकोट राक्षसतागडीच्या त्या रणयज्ञात विजयनगरच्या राजाची, राजवैभवाची आणि स्वाधिनतेचीही आहुती पडली. (दि. 7 जानेवारी, 1565 शुक्रवार) हिंदूंचे राज्य संपले! विजयनगरचा पराभव झाला. आमच्या एक लाख सैन्याची कत्तल झाली!!
पुढे सहा महिने मुस्लीम सुलतांनाच्या फौजा विजयनगरचा सत्यानाश करत होत्या. सौंदर्याने समृद्ध मंदिरे, इमारती आणि ज्ञानकेंद्रे मुसलमानांनी अक्षरश: जाळून टाकली. त्यावेळी जगात विजयनगरच्या तोडीचे एकही शहर नव्हते. कुटो, फर्नाओ, डोमिंगो पेस अशा कितीतरी परकीय प्रवाशांनी या वैभवशाली शहराचे वर्णन लिहून ठेवले आहे.
विजयनगरचा राजा रामरायाचे मस्तक विजापूरच्या अली आदिलशहाने पोखरुन काढले आणि विजापुरातील एका घाणेरड्या मोरीच्या तोंडाशी असे बसवले की, मोरीतील घाण रामरायाच्या तोंडातून बाहेर पडावी, अशी राक्षसी वृत्ती असणार्या सुलतानांच्या टाचाखाली अवघा दख्खन भरडून निघत होता. यापुढे हिंदू राजाच होऊ शकत नाही, अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली होती. सगळीकडे निराशा दाटली होती. समाजाने आपला आत्मविश्वास गमावला होता. स्वाभिमान संपला आणि लोकांना गुलामीचेच कौतुक वाटू लागले. मोठमोठ्या सरदारांचा पराक्रम बादशाहाच्या पायाशी गहाण पडला होता. गोव्यात पोर्तुगीज आणि कोकण किनारपट्टीवर सिद्दींचा हैदोस सुरू होता. मंदिरे भंगली जात होती, मूर्त्या फोडल्या जात होत्या. लेकीसुनांवर अत्याचार होत होते. सुलतानी आणि आस्मानी संकटे महाराष्ट्राच्या छाताडावर नाचत होती. हिंदूंना कोणी वाली उरला नव्हता!!
जेव्हा समाज आत्मविस्मृत होतो, तेव्हा त्या समाजात अनेक प्रकारचे दोष उत्पन्न होतात. आपसात स्वार्थभाव निर्माण होऊन कलह होतो आणि या परिस्थितीचा परकीयांनाच लाभ होतो आणि सर्वसामान्य रयतेचे जगणे कठीण होत. अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने सुलतान आणि परकीय सत्तांशी संघर्ष करत भारताच्या इतिहासात प्रदीर्घ काळाने हिंदूपदपातशाहीचे स्वतंत्र सिंहासन निर्माण केले. हिंदू समाजामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. ‘दिल्लीश्वरोवा जगदीश्वरोवा’ अर्थात दिल्लीचा बादशाह हाच ईश्वर ही मानसिकता धुळीला मिळवली.
शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने हिंदू जनतेत आत्मविश्वास निर्माण झाला. त्यामुळे राजस्थानच्या भूमीवर कुठल्याही तुर्काचे, मुघलाचे पाय ’शासक’ म्हणून पडले नाहीत. छत्रसाल हा बुंदेलखंडाचा युवराज! छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याने प्रभावित होऊन त्याने बुंदेलखंडात स्वतंत्र राज्यच स्थापन केले. इसवी सन 1672 साली छत्रसाल शिवरायांना भेटायला आला. तो म्हणाला, “मी मुघलांची चाकरी केली; पण मला त्याचा काही उपयोग झाला नाही.” पुढे तो म्हणाला, “तुर्कांचा आणि आपला कधी मिलाफ झाला आहे का? मला तुमच्याकडे नोकरी द्या.”
शिवरायांनी छत्रसालाला उपदेश केला, “तुम्ही क्षत्रियांचे मुकुटमणी आहात. तुम्ही आपली मायभूमी स्वतंत्र करा. मुघलांना मारुन काढा. अंत:करणात ब्रजराज श्रीकृष्णांना आठवा आणि हाती तलवार घ्या! मी माझी तलवार तुम्हाला देतो,” असे म्हणत शिवरायांनी आपली तलवार छत्रसालाला दिली. छत्रसाल परत गेला आणि त्याने आपली भूमी स्वतंत्र केली. ही शिवरायांच्या हिंदूपदपातशाहीचीच प्रेरणा होती.
आसामचे राजे चक्रध्वजसिंह म्हणायचे की, “शिवाजी महाराजांनी ज्या नीतीने महाराष्ट्रात परचक्राला पराभूत केले, त्याच नीतीने लढत आम्ही आसामच्या भूमीला परकीयांचे पाय लागू देणार नाही.” परिणामत: मुघलांना आसाम कधीही जिंकता आला नाही. सराईघाटच्या युद्धात लाचित बडफुकन या आसामच्या तरुण सेनानीने मुघलांचा दारुण पराभव केला. अशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेत अनेक वीरांनी आपल्या मायभूमीच्या स्वातंत्र्याचे रक्षण केले. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे प्रयोजन हेच होते. हिंदवी स्वराज्य त्यांनी स्वत:च्या व्यक्तिगत सुखासाठी निर्माण केलेले नव्हते अथवा कीर्ती, सन्मान आणि सत्तेसाठीही केलेले नव्हते. आपल्या देशाचे, धर्माचे रक्षण करून रयतेची सर्वांगीण उन्नती साधणे हेच त्यांचे लक्ष्य होते.
शिवरायांच्या हिंदूपदपातशाहीचा उत्कर्षबिंदू म्हणजे राज्याभिषेकाचा क्षण! शिवरायांच्या मातोश्री जिजाऊ आऊसाहेब यांनी पाहिलेल्या स्वप्नांच्या पूर्तीचा क्षण! शिवाजी महाराज हे मातृभक्त होते. बाबासाहेब पुरंदरे लिहितात, “जगाच्या पाठीवर एकमेव उदाहरण ठरावे, अशी ती माता होती, असा तो पुत्र होता, अशी त्याची भक्ती होती.”
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शनिवारी म्हणजे दि. 6 जून, 1674 रोजी राज्याभिषेकाच्या मुख्यविधीची सुरुवात झाली. श्रीगणेशपूजन, स्वस्तिवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, नारायणपूजन आणि आज्या होम आदी विधी संपन्न झाले. आज्याहुतीनंतर राज्याभिषेकाला प्रारंभ झाला.
महाराज सोयराबाईसाहेब यांच्यासह येताच प्रथम मंडपपूजन झाले. सप्तसरितांच्या कुंभाचे पूजन झाले. वेदमंत्राच्या घोषात विधी संपन्न होत होते. पूर्णाहूतीनंतर महाराजांना सुगंधी तेल आणि चूर्ण यांनी तसेच उष्णोदकाने समंत्रक स्नान घालण्यात आले. नंतर वेदमंत्राच्या घोषात महाराजांनी औदुंबराच्या आसंदीवर गुडघे टेकून तळपाय लागू न देता विधीपूर्वक आरोहण केले. त्यानंतर आचार्यगण आणि पुरोहितांनी मंत्रघोषात महाराजांना अभिषेक करण्यास सुरुवात केली. अभिषेक समाप्तीनंतर महाराज आसंदीखाली उतरले. त्यांनी अग्निनारायणाची प्रार्थना करून आशीर्वाद घेतले. महाराज आता ’प्रति इंद्र’ झाले होते. पवित्र वेदमंत्रघोषात महाराजांनी सुवर्णसिंहासनावर आरोहण केले. यानंतर महाराज पुन्हा अभिषेकशालेत गेले.
सोबत सोयराबाई आणि शंभुराजे होते. महाराज, महाराणी आणि युवराज यांचे अभिसिंचन झाले. सर्वांच्या किती नेत्रात आनंदाश्रू दाटले असतील? हिंदूंचा राजा आज अभिषिक्त होत होता. भारतातील सर्व पुण्यसलीला नद्या आणि समुद्र महाराजांना स्नान घालत होते. काय वर्णावा तो आनंद? आजि सोनियाचा दिनू असाच तो दिवस !! आनंदाचे डोही आनंदाचे तरंग आले होते. चौघडे, दुंंदुभी, वाद्ये वाजत होती. सुवासिनींनी महाराजांचे औक्षण केले. यानंतर महाराजांना पुन्हा स्नान घालण्यात आले. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे दि. 6 जून, 1674ची पहाट झाली.
राजसभेतील सिंहासनारोहणाची घटीका समीप आली होती. सगळीकडे मांगल्य आणि पावित्र्य ओसंडून वाहत होते. नगारखान्यावर भगवा झेंडा फडकत होता. सुवर्णालंकारांनी सजवलेले दोन हत्ती प्रवेशद्वाराजवळ उभे होते. हाती धनुष्य घेऊन महाराज सिंहासनाकडे निघाले. त्यांनी प्रथम कुलदेवता, गागाभट्ट, आचार्यगण आणि जिजाऊ आऊसाहेबांचे दर्शन घेतले. रायगडावर गुलामीचा अंधकार संपून स्वातंत्र्यसूर्याचा उदय होत होता.
महाराज राजसभेत आले, सारी सभा आदराने उठून उभी राहिली. महाराजांनी सिंहासनाला वंदन केले. महाराज सिंहासनाधिश्वर छत्रपती झाले. सर्वांनी क्षत्रिय राजा अभिषिक्त झाल्याचे घोषित केले. ’क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधिश्वर श्री राजा शिवछत्रपती,’ असा जयघोष झाला. नगारखान्यात मंगलवाद्ये दणाणू लागली. तोफांचे आवाज झाले. सर्वांच्या आनंदाला उधाण आले होते. भाट चारण गाऊ लागले. सारा आसमंत दुमदुमून गेला. सुवासिनी आणि कुमारिकांनी महाराजांचे औक्षण केले.
हेन्री ऑक्झिंडेन राजसभेत आला. सिंहासनासमोर 20 हातावर तो उभा राहिला. त्यांनी ब्रिटिश पद्धतीने महाराजांना अभिवादन केले व आणलेल्या नजराण्यांपैकी हिर्याची अंगठी महाराजासमोर अदबीने धरली. महाराजांनी त्याला सिंहासनाजवळ बोलावून त्याला मानाची वस्त्रे दिली.
महाराजांना आता शोभायात्रेला निघायचे होते. महाराज एका हत्तीवरील आसनावर बसले. हत्ती चालवण्यासाठी माहूत म्हणून हंबीरराव मोहिते होते. महाराजांच्या मागे सुवर्णाचे मोरचैल घेऊन मोरोपंत बसले होते. सर्वत्र जयजयकार सुरू होता. एका हत्तीवर भगवा झेंडा डौलाने फडकत होता. महाराजांनी मिरवणुकीने जाऊन श्रीजगदीश्वराचे दर्शन घेतले. देवदर्शन घेऊन महाराज पुन्हा मिरवणुकीने परत आले. याच दिवशी हिंदू समाजाचे सुतक फिटले. विजयनगरसह हिंदू सिंहासनाच्या जखमा आज बुजल्या होत्या. हिंदूंचा सार्वभौम राजा आणि स्वतंत्र सिंहासन निर्माण झाले होते.
सभासद लिहितो, “या युगी सर्व म्लेंच्छ बादशाह. मराठा बादशाह एवढा छत्रपती झाला. ही गोष्ट सामान्य झाली नाही.”
छत्रपती शिवरायांच्या हिंदूपदपातशाहीने प्रजेला परकीय जाचापासून मुक्त केलेच. परंतु, सुराज्याचीही मुहूर्तमेढ रोवली. शेतकरी, सामान्य प्रजाजनासाठी शिवरायांनी लोककल्याणकारी प्रशासन निर्माण केले. शेती, व्यापार उद्योग अशा विविध क्षेत्रात महाराजांनी विविध प्रयोग केले. त्याचप्रमाणे भाषा, संस्कृती, मंदिरांची पुनर्बांधणी याद्वारे हिंदू जनतेची अस्मिता जपण्याचाही प्रयत्न केला.
सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून शिवाजी महाराजांनी स्वतःच्या मस्तकावर छत्र धारण करून स्वतः ‘छत्रपती’ म्हणविले. राज्याभिषेकाच्या दिवसापासून ‘राज्याभिषेक शक’ ही कालगणना सुरू केली. महाराज शककर्ते राजे झाले. स्वतःच्या नावाने ‘श्री राजा शिवछत्रपती’ ही अक्षरे असलेली सोन्याची नाणी पाडली. हिंदू समाजाचे नवचैतन्य शिवराज्याभिषेकाने जागृत झाले. त्यातूनच पुढे आसेतूहिमाचल संघर्ष करून मराठ्यांनी मुघल सत्तेचे निर्दालन केले. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवला. जेव्हा जेव्हा आपल्या देशावर आणि धर्मावर संकटे येतील, आक्रमणे होतील तेव्हा तेव्हा शिवरायांचा हा अपूर्व सोहळा आम्हाला प्रेरणा देत राहील. एवढे या राज्याभिषेकाचे महत्त्व आहे. छत्रपती शिवरायांनी रायगडावर हिंदूपदपातशाहीचे पुनरुत्थान केले. रायगडावरील हिंदूपदपातशाहीने देशभरातील हिंदूमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. लोककल्याणकारी राज्याचा आदर्श या हिंदूपदपातशाहीने संपूर्ण जगासमोर प्रस्तुत केला.
- रवींद्र सासमकर 8698543254