मुंबई : सेल्फ डेव्हलपमेंटच्या माध्यमातून शासन क्लस्टर डेव्हलपमेंटचा विचार करणार का, असा प्रश्न भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी सभागृहातील प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला.
आ. निरंजन डावखरे यांनी म्हाडा अंतर्गत गृहनिर्माण प्रकल्पांबाबत प्रश्न मांडला. यावर चर्चेत सहभागी होत आ. दरेकर म्हणाले, “अभ्युदय नगर येथे प्रत्येक घराला एक पार्किंग दिले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. नव्या प्रकल्पांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध असतात, परंतु जुन्या रहिवाशांना त्या मिळत नाहीत. क्लस्टर डेव्हलपमेंटद्वारे जुन्या रहिवाशांनाही या सुविधा मिळाव्यात, यासाठी शासन भूमिका घेणार का? तसेच, स्वयंपुनर्विकासात क्लस्टर डेव्हलपमेंटला प्राधान्य देण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. ८-१० इमारतींचे क्लस्टर विकसित केल्यास सर्व सुविधा पुरवता येतील. यासाठी शासन सेल्फ डेव्हलपमेंटद्वारे क्लस्टर डेव्हलपमेंटचा विचार करणार का?”
दरेकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पंकज भोयर यांनी सांगितले की, दरेकर यांनी दिलेली माहिती मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून चर्चा केली जाईल. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार कार्यवाही होईल आणि याबाबत दरेकर यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.