मुंबई: गणपती आणि कोकण हे एक वेगळेच नाते.गणेशोत्सवासाठी दरवर्षी लाखो चाकरमानी मुंबईसह राज्यभरातून एसटी प्रवासाने कोकणात दाखल होतात. याच चाकरमान्यासांठी आता एक आंनदवार्ता आहे. एसटी प्रवासाच्या एकेरी आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ ही रद्द करण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबतची घोषणा केली.
गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येने चाकरमानी एसटी प्रवासासाठी प्राधान्य देतात. पण यावर्षी, एसटी प्रवासासाठी ३० टक्के भाडेवाढ झाल्यानंतर चाकरमान्यांमध्ये कमालीची नाराजी दिसून आली होती. दरम्यान, चाकरमान्यांच्या भावना लक्षात घेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार एसटी प्रवासाच्या एकेरी आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ ही मागे घेत असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. यामुळे चाकरमान्यांना दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले कि, "एसटी महामंडळ गेली ७७ वर्ष महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरीकांना सुरक्षित आणि स्वस्त प्रवास सेवा देत आहे. कोकणातील प्रमुख सणांच्या काळात विशेषतः गणेशोत्सव आणि होळी यासाठी प्रवाशांच्या मागणीनुसार विविध गट आरक्षण करत मोठ्या प्रमाणात एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या जातात. यावर्षी सुध्दा मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नवी मुंबईतील प्रवाशांच्या आरक्षण मागणीनुसार जवळपास ५ हजार अधिकच्या एसटी बसेस गणपती उत्सवासाठी सोडण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे. गणेशोत्सव दरम्यानच्या, राज्य सरकारच्या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी असलेल्या सर्व सवलती लागू असतील." असे ते म्हणाले.