४,०७८ ही केवळ संख्या नव्हे तर...; पंतप्रधान मोदींच्या नव्या विक्रमावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

    25-Jul-2025
Total Views |


मुंबई : ४,०७८ ही केवळ संख्या नव्हे, मोदी का काम, हर पल देश के नाम..' या ध्येयाची ही विक्रमी फलश्रुती आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचा विक्रम मोडीत काढत सर्वाधिक काळ भारताचे पंतप्रधानपद भूषवणारे नरेंद्र मोदी हे दुसरे नेते ठरले आहेत.

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "४,०७८ हा अंक नाहीच. जगात भारताचे पराक्रमी वर्तमान आणि तेजस्वी भविष्य प्रस्थापित करणारी, विकसित भारताचे स्वप्न मनामनांत रुजविणारी ही विक्रमी नोंद आहे. इंदिरा गांधी यांची पंतप्रधानपदाची कारकीर्द ४ हजार ७७ दिवसांची होती. आज ४ हजार ७८ या संख्येने मोदीजींच्या कारकीर्दीने विक्रमी पाऊल टाकले. मोदीजींचा २४/ ७ हा दिनक्रम नसून विकसित भारताचे २०४७ चे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने आगेकूच आहे," असे ते म्हणाले.


माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७ असे सलग ४०७७ दिवस म्हणजेच ११ वर्षे ५९ दिवस भारताच्या पंतप्रधान म्हणून कारभार पाहिला होता. तर नरेंद्र मोदी हे २६ मे २०१४ पासून या पंतप्रधान पदावर आहेत. २५ जुलै २०२५ रोजी त्यांनी पंतप्रधान म्हणून ४०७८ दिवस म्हणजेच ११ वर्षे ६० दिवस पूर्ण केले आहेत.