डायघर कल्याण फाटा येथे वाहतूक सिग्नलची आवश्यकता भूमीपुत्र धर्माभिमानी संघटनेची मागणी

    24-Jul-2025   
Total Views | 11

डोंबिवली : कल्याण फाटा-डायघर चौक हा अत्यंत रहदारीचा चौक आहे. या मार्गावरून नोकरी आणि कामधंदानिमित्त जाणाऱ्या वाहनांची दिवस रात्र वर्दळ असते. विशेषत: सकाळी आणि रात्री येथे नियमित वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहनचालकांचा अमूल्य वेळ वाया जातो. भूमीपुत्र धर्माभिमानी संघटनेने कल्याण फाटा चौकात स्वयंचलित वाहतूक नियंत्रण यंत्रणा बसविण्याची मागणी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सदर मागणीचे पत्र लिहिले असून त्याची प्रत राज्यपाल, उच्च न्यायालय, मानवी हक्क आयोग, ठाणे जिल्हाधिकारी आणि ठाणो पोलिस आयुक्तांना पाठविली आहे.

कल्याण शीळ महापे, पनवेल मुंब्रा चे हे जंक्शन आहे. मुंबई, वाशी, पनवेल, ठाणे, मुंब्रा या मार्गावर नोकरी आणि कामधंदा निमित्ताने जाणाऱ्या लाखो वाहनांची येथे दिवसरात्र वर्दळ असते. विशेषत: सकाळी आणि रात्री येथे नियमित वाहतूक कोंडी होते. डोंबिवलीकडील निळजे, काटई, घारीवली, मानपाडा चौकामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. तर ठाण्याकडील बाजूस देसाई, डायघर, पडले, कल्याण फाटा चौकांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. या कोंडीच्या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींचे पाठपुरावे केले मात्र त्याला फारसे यश आले नाही. आता सामाजिक संघटनेने यासाठी पुढाकार घेतला आहे.

भूमीपुत्र धर्माभिमानी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कल्याण फाटा चौक, हा कल्याण शीळ महापे रस्ता व पनवेल मुंब्रा रस्ता यावरील अत्यंत रहदारीचा व महत्त्वाचा चौक आहे. कल्याण शीळ महापे मार्गे मुंबई, वाशी, नवी मुंबई येथे नोकरी धंदयानिमित्त लाखो प्रवासी व वाहने दैनंदिन प्रवास करत असतात. त्यामुळे सकाळ सायंकाळ कल्याण फाटा, डायघर चौक येथे तासन्तास वाहतूक कोंडी अनुभवायला लागत आहे व सामान्य जनतेचा अमूल्य वेळ व आयुष्य वाया जात आहे. त्यातच पनवेल मुंब्रा बाजूने येणारी बेशिस्त वाहने कल्याण शीळ रस्त्याकडे जाणारी मार्गिका अडवून ठेवत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

उड्डाणपूल त्वरीत बांधण्याची मागणी

कल्याण फाटा चौकात होणाऱ्या दैनंदिन वाहतूक कोंडीबाबत विविध संघटना व स्थानिक सामाजिक कार्यकर्ते यांनी वेळोवेळी सदर ठिकाणी उड्डाणपूल निर्मितीची मागणी केली आहे. परंतु आजतागायत तेथे उड्डाणपूल बांधण्यात आलेला नाही. उलट शिळफाटा चौक शीळ गाव येथे दिवा महापे रस्ता मोकळा राहण्यासाठी पनवेल, मुंब्रा रस्त्यावर उड्डाणपूल बांधून वापरात ही आलेला आहे. व जनतेचा अमूल्य वेळ वाचून राष्ट्राला फायदा ही होत आहे. तरी कल्याण फाटा चौक - डायघर येथे त्वरीत स्वयंचलित वाहतूक नियंत्रण बसवून लवकरात लवकर उड्डाणपूल बांधण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी केली आहे.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121