इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचा मानस : मंत्री संजय शिरसाट
08-Oct-2025
Total Views |
मुंबई : दादर येथील इंदू मिल परिसरात उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारक आणि पुतळा उभारणीच्या कामाचा आढावा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी घेतला. या बैठकीस आनंदराज आंबेडकर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
स्मारकातील पुतळा उभारणीसंदर्भात शिल्पकार राम सुतार यांच्या महत्त्वपूर्ण सूचनांचा विचार करण्यात आला असून, पुतळ्याच्या तांत्रिक बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. स्मारकाचे काम विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला असल्याचे मंत्री शिरसाट यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, डिसेंबर २०२६ पर्यंत स्मारकाचे संपूर्ण काम पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे. या कामाच्या वेग आणि गुणवत्तेवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येईल, तसेच सर्व संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी नमूद केले.